खुर्शीदांची खुशी

    दिनांक  03-Mar-2019   

 

 
 
 
 
काँग्रेसमध्ये डोक्यावर पडलेल्यांची संख्या नेमकी किती, असा प्रश्न विचारल्यास काय उत्तर देता येईल? देशाच्या लोकशाहीचा, परराष्ट्र संबंधाचा वा सुरक्षेचा विषय आला की, काँग्रेसी गुलाम स्थळ-काळ-वेळ विसरून पक्षस्तुती, घराणेस्तुती करण्यात रममाण होतात. आपल्या भोवतालच्या डबक्यात गिरक्या घेतल्या की, मग या लोकांना देशात जे काही केले ते काँग्रेसने वा गांधी कुटुंबीयांनीच केल्याचे ज्ञान प्राप्त होते. पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर भारतीय वायुसेनेने एअरस्ट्राईक केला, त्यात केंद्र सरकारची कोणतीही भूमिका नसल्याचे घसा खरवडून सांगणारी ही मंडळी देशातल्या एखाद्या भागात कधीकाळी बांधलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचे व लाभार्थ्यांच्या कल्याणाचे श्रेयही नेहरू-गांधींना द्यायला मागेपुढे पाहत नाहीत. अर्थात तीच तर त्यांना गुलामगिरी दाखवून देण्यासाठी मिळालेल्या अनेक संधींपैकी एक असते ना! नुकतेच पाकिस्तानने अमेरिकेकडून घेतलेल्या अत्याधुनिक अशा ‘एफ-१६’ लढाऊ विमानाला आसमानातून जमीन दाखविणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका झाली. विमान पाडल्यानंतर ते पॅराशूटच्या साहाय्याने सदैव शत्रुत्व पत्करलेल्या देशात उतरले होते. ते मायदेशात आल्यानंतर अटारी बॉर्डरपासून सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण असताना काँग्रेस नेते व माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी मात्र वेगळेच तारे तोडले. पंतप्रधान मोदींनी सैन्यदलांना दिलेल्या खुल्या अधिकारात पाकिस्तानवर एअरस्ट्राईक करणे शक्य झाले व पाकी विमानांच्या घुसखोरीलाही आक्रमकपणे प्रत्युत्तर देता आले. मात्र, गांधी-नेहरू व काँग्रेसचे नाव काढल्याशिवाय घासही न गिळणाऱ्या खुर्शीदांना विद्यमान केंद्र सरकारची या कारवाईतली भूमिका काही पचनी पडली नाही. परिणामी काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात २००४ साली अभिनंदन वर्धमान वायुसेनेत सहभागी झाले व आताच्या त्यांच्या पराक्रमामागे काँग्रेसचेच कर्तृत्व असल्याचा अचाट दावा सलमान खुर्शीदांनी केला. म्हणजेच जे काही केले ते काँग्रेसनेच, हे सांगण्याचा हा सगळा आटापिटा. पण २००४ ते २०१४ ही दहा वर्षे काँग्रेसचेच सरकार सत्तेवर होते व तेव्हाही दहशतवादी हल्ले झाले. यावेळी का काँग्रेसने कधी पाकिस्तानच्या नाकी दम आणला नाही? ते काम मोदींनाच का करावे लागले? याचे उत्तर सलमान खुर्शीद यांनी द्यावे. पण तोपर्यंत नुसते हत्यार वा सैनिक असून चालत नाही तर ते वापरायचे कसब व धमकही अंगी असावी लागते व ती मोदींकडेच आहे, ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी.
 

अध्यक्ष तसा पक्ष

 

देशातली आपली व आपल्या पक्षाची नेमकी स्थिती काय? जनतेत आपण गेलो तर आपल्याभोवती चार टाळकी तरी चांगल्या भावनेने जमा होतात का? अशी बिकट अवस्था झालेल्या काँग्रेसमध्ये एकापेक्षा एक नग भरल्याची प्रचिती तमाम नागरिकांना वेळोवेळी येते. दिग्विजय सिंग, मणिशंकर अय्यर, शशी थरुर आणि आता सलमान खुर्शीद, या लोकांना राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवर बोलून पक्षाची उरली-सुरली घालवण्यात चांगलीच मजा वाटते. म्हणूनच आज वर उल्लेखलेल्या नेत्यांची नावे जरी घेतली तरी लोक तोंड वाकडे करताना दिसतात. कधीकाळी काँग्रेस पक्ष देशाच्या केंद्रस्थानी होता. बरे-वाईट कसे का होईना, देशावर प्रदीर्घ काळापर्यंत याच पक्षाने सत्ताधिकारही गाजवला. आज मात्र या पक्षाच्या दारुण अवस्थेला गोटात सामील झालेले हवशे-नवशे-गवशे आणि खुशमस्करेही जबाबदार आहेतच. अर्थात जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येत जाईल, तसतशी गांधी-नेहरुशरणपरायणांची पळापळ, धावाधाव सुरू होईल अन् अशा परिस्थितीतच या लोकांच्या पोटातल्या गोष्टी ओठावर येतील. इथल्या जनतेलाही याचमुळे तर काँग्रेसी संस्कृतीचा व वारशाचा नियमितपणे आणि नव्याने परिचय होत असतो ना! आज सलमान खुर्शीद जे काही बोललेत, त्यामागे ही काँग्रेसी प्रवृत्तीच आहे. अशीच मानसिकता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही नेहमीच दाखवत असतात. म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांवर निरनिराळे आरोप करताना ते दिसतात. मात्र, सूर्यावर कितीही थुंकले तरी शिंतोडे स्वतःच्या अंगावर उडतात, याचे भान काही त्यांना राहत नाही. पक्षाचा अध्यक्षच असा असल्यावर नेते तरी कसे मागे राहतील? अध्यक्षांची री ओढत वा नक्कल करत मग ही नेते-कार्यकर्ते मंडळी काहीबाही बरळण्याची हौस भागवून घेतात. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान आमच्या कार्यकाळात वायुसेनेत भरती झाल्याच्या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्यांची सोशल मीडियावर मात्र छान धुलाई झाली. सलमान खुर्शीद यांना नेटकऱ्यांनी चांगलेच खडे बोल ऐकवले. उद्या भारताला फाळणीनंतर स्वातंत्र्य मिळाले, ते काँग्रेसचेच श्रेय; परिणामी आताच्या केंद्र सरकारला पाकिस्तानविरोधात कारवाई करण्यासाठी आधी त्या देशाचे अस्तित्वच मुळी आमच्या स्वातंत्र्यचळवळीमुळे व म्हणून सर्जिकल स्ट्राईक असो वा एअरस्ट्राईक तेही आमच्याचमुळे झाल्याचे ही मंडळी म्हणू शकतात. कारण एकाच घराण्याच्या, पक्षाच्या दावणीपुढे लोटांगण घातले की, वैचारिक पात्रता रसातळाला जाते; मग याशिवाय निराळे काय होणार, म्हणा?

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat