बालाकोटचे रहस्य

    दिनांक  29-Mar-2019   

भारताने पाकिस्तानच्या खैबर-पख्तुनवॉं प्रांतातील बालाकोट येथे जी हवाई कारवाई केली, तिला रहस्यमयतेत झाकून ठेवण्याची गरज खरेतर पाकिस्तानला आहे. परंतु, आमच्या भारतातीलच लोकांनी या घटनेला अधिकाधिक रहस्यमयतेचा गडद रंग देण्याचा प्रयत्न चालविला आहे. हे भारताचे दुर्दैव आहे. भारत हा जगातील सर्वांत दुर्दैवी देश असला पाहिजे, असे माझे मत आहे. त्यात आता हे एक आणखी दुर्दैव जोडले गेले, इतकेच. भारताच्या लढाऊ विमानांनी केवळ गुलाम काश्मीरच ओलांडले नाही, तर पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन, जैश-ए-मोहम्मद या अत्यंत घातक दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण शिबिराच्या चार इमारती उद्ध्वस्त केल्यात. खरेतर, या कारवाईने पाकिस्तान हबकून गेला आहे. इतका हबकला आहे की, त्याने भारतीय लढाऊ विमानांच्या भीतीपोटी आपले आकाश सर्व प्रकारच्या विमान वाहतुकीसाठी बंद ठेवले होते. जवळपास एक महिन्यानंतर आता कुठे ते खुले करण्यात आले आहे. या घटना कुठल्याही भारतीयासाठी अत्यंत अभिमानाच्या असतात/असायला हव्यात. परंतु, भारतातील तथाकथित विचार-विश्व मात्र संतप्त झाले आहे. त्यांना भारत पाकिस्तानपेक्षा अधिक प्रबळ झालेला नको आहे, असे वाटते. त्यामुळे स्वाभाविकच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा, पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्याचा निर्णय, या लोकांना पसंत पडलेला नाही. पुलवामा हल्ला झाल्यानंतर, याच लोकांनी नरेंद्र मोदींना ‘आता कुठे गेली 56 इंचाची छाती’ असे प्रश्न विचारून, लक्ष्य केले होते. त्यांना वाटले, मोदी काही असे धाडस करणार नाही आणि मग आपल्याला निवडणुकीपर्यंत मोदींची चांगलीच टर उडविता येईल. पण झाले उलटेच.
 
निवडणुका तोंडावर आल्या असताना, नरेंद्र मोदी असे धाडस करूच कसे शकतात? निवडणुकीत बहुमत मिळण्यासाठीच त्यांनी हे घडवून आणले इत्यादी आरोप मोदींवर करण्यात आले. माझा अंदाज आहे की, ही वैचारिक मंडळी, जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला मनातल्या मनात शिव्या घालत असतील. कशाला त्याला पुलवामा येथे हल्ला करण्याची अवदसा आठवली? थोडा थांबला असता आणि निवडणुकीनंतर हा हल्ला केला असता तर काय आभाळ कोसळले असते? कदाचित असले संदेश गुप्तपणे मसूद अझहरपर्यंत पोहचलेही असतील. काय सांगावे?
 
एवढ्यातच, केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी, झी टीव्हीचे झुंजार पत्रकार सुधीर चौधरी यांना मुलाखतीत सांगितले की, पुलवामाचा हल्ला झाला नसता तरीही बालाकोटवरील हवाई कारवाई झाली असती. कारण, आपल्याला बालाकोटच्या संदर्भात जी अत्यंत खात्रीची गुप्त माहिती मिळाली होती, ती दडवून ठेवणे, देशाचा विश्वासघात केल्यासारखे झाले असते. या ठिकाणी 300 ते 350 दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येत असून, नजीकच्या काळात हे सर्व दहशतवादी भारतात घुसवून तिथे प्रचंड प्रमाणात हल्ले करण्याची त्यांची योजना होती. इतकी खात्रीची माहिती मिळाल्यावर, भारत आणि त्यातही नरेंद्र मोदी शांत बसणे शक्यतच नव्हते. अरुण जेटली यांचा हा खुलासा अत्यंत महत्त्वाचा आहे. बालाकोट हवाई कारवाईनंतर सर्वप्रथम भारताकडून अधिकृत माहिती देताना परराष्ट्र व्यवहार सचिव विजय गोखले म्हणाले होते- इट वॉज ए नॉन मिलिटरी प्रीअॅम्टिव्ह स्ट्राईक. म्हणजे ही एक गैरलष्करी सावधगिरीची कारवाई होती. सावधगिरी कशाची? तर, भारतात पुन्हा दहशतवादी हल्ले होऊ नये याची.
 
 
 
बालाकोटवरील हल्ल्याने जैश-ए-मोहम्मद संघटनेचे कंबरडेच मोडले आहे. तशातच, अमेरिका व फ्रान्स हे दोन देश, मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्यासाठी व या संघटनेला काळ्या यादीत टाकण्यासाठी, एका वेगळ्या मार्गाचा अवलंब करीत आहेत आणि ते तसे घडले तर, या संघटनेचे नजीकच्या काळात पुन्हा उभे होणे शक्य वाटत नाही. भारतीयांना किती आनंद व्हायला हवा? तसा तो झालाही. परंतु, भारताचे कथित विचार-विश्व मात्र शोकसागरात बुडून गेले आहे.
नीतीन गोखले नावाचे एक अत्यंत विश्वसनीय संरक्षण विषयावरील तज्ज्ञ आहेत. त्यांनी बालाकोटवरील या हल्ल्याचा तपशील दिला आहे. या कारवाईला पंतप्रधानांकडून होकार मिळताच, आपले संपूर्ण लष्कर या कारवाईचा सूक्ष्म तपशील तयार करण्यात गुंतले. एकूण बारा मिराज-2000 विमानांचा यात वापर करण्यात आला. त्यापैकी केवळ सहा विमानांंवर स्पाईस बॉम्ब लावण्यात आले होते. कारवाईच्या दिवसाच्या चार दिवसआधीपासून, भारत-पाक सीमेवर जैसलमेर ते श्रीनगर भारतीय लढाऊ विमानांनी रात्री वारंवार उड्डाण घेत, पाकिस्तानी हवाई दलाला तिकडेच गुंतवून ठेवले. पाकिस्तानला वाटले की, भारत पंजाब अथवा सिंध प्रांतात काहीतरी गडबड करण्याच्या तयारीत आहे. कारवाईच्या दिवशी ग्वाल्हेरच्या लष्करी तळावरून मध्यरात्रीनंतर ही बारा विमाने सरळ उत्तर दिशेकडे हिमालयाच्या पर्वतरांगांकडे उडाली. पर्वत रांगा समोर येताच ही विमाने एकदम पश्चिमेकडे जम्मू-काश्मीरकडे वळलीत. बालाकोटपासून 50 कि.मी. अंतरावरून या विमानांनी हे सहा स्पाईस बॉम्ब लक्ष्याच्या दिशेने सोडले. हे बॉम्ब इस्रालयकडून आपण घेतले आहेत. या बॉम्बमध्ये लक्ष्याची छायाचित्रे व अचून नकाशे फीड केलेले असतात. त्यामुळे लांबून सोडलेले हे बॉम्ब अचूकपणे लक्ष्यभेद करतात. या बॉम्बचे आणखी वैशिष्ट्य असे की, हे बॉम्ब छताला छिद्र पाडून आत जातात. अगदी 80 सेंटिमीटर जाड क्रॉंक्रिटचे छत असले तरीही. आत गेल्यावर त्यातील 70 ते 80 किलो स्फोटके फुटतात आणि त्याने ‘शॉक वेव्हज’ तयार होतात. एवढेच नाही तर, काही विशिष्ट द्रव्यांमुळे आतील तापमान सुमारे 1 हजार अंश सेल्सिअस इतके वाढते. त्यामुळे इमारतीत कुणीही वाचण्याची शक्यता राहात नाही. आपले लक्ष्य बालाकोटमधील चार इमारती होत्या. बालाकोटजवळील डोंगरावर या चार इमारती होत्या आणि त्यात वेगवेगळ्या स्तराचे प्रशिक्षण सुरू असल्याची खात्रीलायक माहिती होती. हवाई दलाच्या म्हणण्यानुसार आम्ही लक्ष्याचा अचूक भेद केला आहे. याचाच अर्थ असा की, या चार इमारतीतील एकही जण जिवंत राहिलेला नाही. बॉम्बमुळे जे तापमान वाढले त्याने इमारतीच्या आतील प्रत्येक गोष्ट जळून खाक झाली असणार.
 
इतका सर्व धुमाकुळ घालून आपली विमान 8 ते 10 मिनिटांत तेथून परतली. भारताने किंवा नरेंद्र मोदी यांनी ही कारवाई जाहीर केली नाही. पहाटे 5.35 ला पाकी लष्कराने सर्वप्रथम टि्वट करून जाहीर केले की, काही भारतीय विमानांनी आमची हद्द ओलांडली. पाक विमानांनी त्यांचा पाठलाग केला असता, बालाकोटच्या परिसरात त्यांनी घाईघाईत काही बॉम्ब फेकले. त्यामुळे काही झाडे फक्त तुटली. त्यानंतर भारतासह सर्व जगाला भारताच्या या धाडसी मोहिमेची माहिती झाली. पाकिस्तान म्हणते की, काहीच नुकसान झाले नाही. मग आता एक महिना झाला तरी, बालाकोट परिसराची छायाचित्रे त्यांनी दाखविली का नाही? तसेच तिथे पत्रकारांना का नेण्यात आले नाही? प्रेतांची विल्हेवाट वगैरेच फक्त लावायची होती तर, आठवड्यात हे काम पूर्ण व्हायला हवे होते. परंतु, अजूनही तिथे कुणाला जाऊ देण्यात येत नाही. याचाच अर्थ, तिथे फक्त दहशतवाद्यांचे प्रशिक्षणच होत होते असे नाही तर, अजूनही बरेच काही घडत असले पाहिजे, जे जगाला दाखविण्याची पाकिस्तानची हिंमत नाही. बालाकोटचे हे रहस्य उघड करण्याची जबाबदारी पत्रकारांवर, विशेषत: भारतीय पत्रकारांवर आहे. भारतीय पत्रकारांनी आपले कौशल्य व विविध देशांतील संपर्क पणाला लावून ही माहिती भारतीय जनतेसमोर आणायला हवी होती. पण जिथे आपले पत्रकारच, देशाच्या लष्करावर शंका घेत आहेत, तिथे ते काय शोध घेणार? एखादी विदेशी संस्था तिथे जाऊन बालाकोटचा रहस्यभेद करेल, तेव्हाच ते भारतीय जनतेला समजेल. पण हे मात्र निश्चित की, बालाकोटवर हल्ला करून भारताने केवळ दहशतवादीच ठार केले नाहीत, तर अजूनही बरेच काही भयंकर नष्ट केले आहे. या रहस्यावरील पडदा केव्हा उठेल माहीत नाही.