हा कोणता धर्म?

    दिनांक  27-Mar-2019   जगातही या ना त्या कारणाने इस्लाम धर्माभोवतीचे नव्हे, तर त्या शब्दाभोवतीचे वादळ सातत्याने उठते आहे. सध्या युरोपियन देशांमध्ये याबाबत मंथन होताना दिसते. त्यातही बेल्जियममधून आलेली एक बातमी तर विचार करण्यासारखी आहे. बेल्जियम सरकारने साधारण वर्षभरापूर्वी एक कायदा पारित केला. ज्यानुसार त्या देशात ‘हलाल’ किंवा ‘कोशर मटन विक्री’वर बंदी होती. आता ‘हलाल’ किंवा ‘कोशर’ या अनुक्रमे मुस्लीम आणि ज्यू धर्मातील रूढी. बकरा किंवा पशूला खाण्यासाठी कापण्याची ती एक विशिष्ट पद्धत. कोणत्याही प्रकारची भूल न दिलेल्या प्राण्याच्या मानेवर धारदार शस्त्र फिरवायचे. रक्त ओघळू द्यायचे, अशी ती पद्धत. माणूस नावाच्या सजीवाने जीवंत राहावे म्हणून जंगल कायदा जपावाच लागतो. पण, पर्यावरणातील आपल्यासारख्याच सजीवाला स्वत:च्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी मारताना किमान माणुसकी दाखवायला हवी, हा विचार करून बेल्जियममध्ये कायदा पारित करण्यात आला की, मारण्याआधी पशूला भूल दिली जावी. जेणेकरून त्याला यातनांची जाणीव होणार नाही. अर्थात, हेसुद्धा एक पाखंडच म्हणावे लागेल. कारण, त्या प्राण्याला भूल दिल्यामुळे मरणयातना कळणार नाहीत. पण समोरच्या माणसाला तर माहिती आहे ना की आपण ज्याला खाण्यासाठी कापतो आहोत तोही सजीवच आहे. असो, तर बेल्जियमने पशुप्रेमामुळे आणि करूणेमुळे हा कायदा पारित केला. पण, या कायद्याला बेल्जियममध्ये लोकसंख्येबाबत दुसर्‍या क्रमांकावर असणार्‍या मुस्लीम समुदायाने आणि ज्यूनींही तीव्र विरोध केला.

 

नेहमीप्रमाणे मुस्लीम समुदाय अतिआक्रमक होऊन रस्त्यावर उतरला. त्यांचे म्हणणे आहे की, बेल्जियममध्ये इसाई लोक बहुसंख्येने आहेत आणि त्यांना प्राणिप्रेम, भूतदया वगैरे नाही, तर मुस्लिमांच्या धर्मरूढींना धक्का द्यायचा आहे. मुस्लीम हलालशिवाय मटण खात नाहीत. मुस्लिमांना असे हलाल केलेले मटण मिळू नये, त्यांना त्रास व्हावा म्हणून बेल्जियम सरकारने मुद्दाम केलेला हा कायदा. या कायद्यामुळे सध्या बेल्जियमचे राजकारण ढवळून निघाले आहे. अर्थात, बेल्जियमच कशाला? आपल्या देशातही गोमांसावर बंदी आण्णल्यानंतर काही लोकांनी प्रचंड थयथयाट केलाच ना! या सगळ्या गोष्टी पाहिल्या की वाटते की, धर्माची मूळ शिकवण विसरून केवळ प्रतीकांच्या चक्रात रमल्याने काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे धार्मिक कट्टरतावाद. याबाबत न्यूझीलंडमध्ये काय चालले आहे, याचा आढावा घ्यायला हवा. काही दिवसांपूर्वी ख्राइस्ट चर्च येथील मशिदीवर अतिरेक्यांनी हल्ला केला. हल्ल्यात अनेक मुस्लीम मारले गेले. या हल्ल्यात मारल्या गेलेल्या एका व्यक्तीच्या घरी न्यूझीलंडच्या पंतप्रधान गेल्या. त्याही मुस्लीम पद्धतीचा हिजाब (विशिष्ट पद्धतीचा बुरखा) घालून. त्यानंतर ऑकलंडच्या डॉ. थायाने एक उपक्रमच चालवला की, मुस्लीम महिला या हल्ल्याने घाबरल्या आहेत. त्या घाबरू नयेत, आम्ही देशवासीय त्यांच्या सोबत आहोत हे दाखवण्यासाठी मुस्लिमेतर महिलांनीही हिजाब घालावा. या आवाहनाला न्यूझीलंडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कदाचित मानवतावादी भावना असावी. याच पार्श्वभूमीवर हिजाब घालून पंतप्रधान ज्या मृत व्यक्तीच्या घरी गेल्या होत्या, तिथे एकाने त्यांना विचारले की, “तुम्ही इस्लाम धर्म का स्वीकारत नाहीत?” हा जो आहे तो कट्टरपणा आहे. समोरचा व्यक्ती आपली रूढी-परंपरा सारे त्यागून तुमच्या सांत्वनासाठी तुमच्या दारात आला. तुम्हाला त्याचे काही नाही. तर घरी कोणी मेलेले असताना, दु:खात असतानाही त्या माणसाला वाटले की, पंतप्रधानांनी हिजाब घातला आहे, तर त्यांनीही मुस्लीम धर्मही स्वीकारायला हवा.

 

यावर वाटते की धर्म म्हणजे काय? जो ‘समाजाची धारणा करतो तो धर्म,’ असे म्हणतात. हिंदू समाजाच्या विविध गटांची, जातीसमूहांची आणि वैयक्तिक मतप्रणाली असणार्‍यांची तर याबाबत इतकी वेगवेगळी उत्तरं असतील की, आपण स्वत:च विसरू की, आपण ‘धर्म म्हणजे काय’ हा प्रश्न विचारलाहोता म्हणून. असो, हेच तर हिंदू समाजमतप्रणालीचे सौंदर्य आणि सामर्थ्य आहे की, प्रत्येकाला आपल्या मतानुसार धर्माची व्याख्या ठरवण्याचा अधिकार आहे. पण, तरीही आज जगाच्या पाठीवर धर्माच्या नावावर जे चालले आहे, ते पाहून शाश्वत मूल्यांची चाड असणार्‍या कोणाही व्यक्तीला चिंताच वाटेल. धर्म म्हणजे काय? समोरच्या व्यक्तीचे जगणे माझ्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचे आहे, तर त्याने मरून तरी जावे किंवा माझ्यासारखे व्हावे, याला धर्म म्हणावे का?

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat