पालघर सेनेकडे, उमेदवार राजेंद्र गावित !

    दिनांक  26-Mar-2019मुंबई : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीच्या जागावाटपात शिवसेनेला अधिकची देण्यात आलेली २३ वी जागा अखेर पालघरचीच असणार आहे. मंगळवारी या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विशेष म्हणजे, जागा शिवसेनेची असली तरी युतीचा उमेदवार मात्र येथील भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित असणार आहेत.

 

राजेंद्र गावित यांनी मंगळवारी शिवसेना व भाजप नेत्यांच्या उपस्थितीत अधिकृतरीत्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम व आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा आदींसह शिवसेना व भाजपमधील नेते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यानंतर पालघरमधून सेनेतर्फे राजेंद्र गावित यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात येत असल्याची घोषणाही उद्धव ठाकरे यांनी केली. जागावाटपात जागाही मिळाली आणि उमेदवारही मिळाला, असे पहिल्यांदाच घडले असल्याची टिप्पणीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

 

भाजपचे ज्येष्ठ नेते व पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर पालघरच्या जागेसाठी गेल्यावर्षी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांनी भाजपमधून बंडखोरी करत शिवसेनेतर्फे ही निवडणूक लढवली तर भाजपने राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या पोटनिवडणुकीत राजेंद्र गावित यांनी श्रीनिवास यांचा २९ हजार मतांनी पराभव केला. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीची घोषणा झाली त्यावेळी शिवसेनेला २२ ऐवजी २३ जागा देण्याचा निर्णय झाला. ही २३ वी जागा पालघरची असणार अशी चर्चा होती. तथापि, येथून उमेदवारी कुणाला मिळणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. भाजपचे खासदार राजेंद्र गावित यांनी भाजपच्या संमतीने शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेची उमेदवारीही मिळवली. तसेच, श्रीनिवास वनगा यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात येईल, असेही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. या सर्व घडामोडींमुळे पालघरचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चतुराई आणि सामंजस्याने सोडवल्याचे दिसत आहे. तसेच, राजेंद्र गावित आणि श्रीनिवास वनगा यांचेही मनोमिलन झाल्याने पालघरमध्ये युतीची बाजू भलतीच भक्कम झाल्याचे दिसत आहे. 

 
उमेदवार अदलाबदल शिवसेना-भाजपमध्ये नवी नाही. आमच्यापैकी सुभाष भामरे व सुरेश प्रभू भाजपमध्ये गेले आहेत. हे पार्टनर एक्स्चेंज आहे. श्रीनिवास वनगा यांना कोणत्याही परिस्थितीत विधानसभेत पाठवण्यात येईल.” 

- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat