त्याला जीवन ऐसे नाव...

    दिनांक  26-Mar-2019मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त व्हावेत आणि मुंबईकरांचा प्रवास सुखाचा व्हावा, यासाठी नवीन लादे या युवकाकडे एक ध्येय आहे. त्यांच्या ध्येयाची, अथक परिश्रमाची ही कहाणी...

 

श्रीलंकेमध्ये लोक स्वत:हून नेत्रदान करतात. कारण, तिथे गौतम बुद्धांच्या अंगतूर निकायया ग्रंथामध्ये सांगितलेली देहदानाची संकल्पना लोकांनी पवित्र संकल्पना म्हणून स्वीकारली आहे. आपल्या देशात मात्र आपण या जन्मी नेत्रदान केले, तर पुढील जन्मी माझ्या डोळ्यांच्या जागी खड्डे पडलेले असतील, असे आजही लोकांना वाटते. जर समाजाने जबाबदारीने मरणोत्तर नेत्रदान तसेच अवयवदान संकल्पना स्वीकारली, तर दिव्यांगांची समस्या सुटण्यास मदत होईल,” नवीन लादे सांगत होते. अंधेरी येथील व्यावसायिक आणि चिंतनशील समाजसेवक म्हणून नवीन लादे सुपरिचित आहेत. त्यांनी आजपर्यंत त्यांच्या पंचशील संस्थेद्वारे पाच हजारांच्या वर लोकांचे नेत्रदान संकल्पपत्र भरून घेतले आहे. नवीन यांचे नाव गेल्या वर्षी चांगलेच गाजले. त्यांनी गेल्या पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवरचे खड्डे मोजले होते. त्यांनी मोजलेल्या एकूण २७ हजार, ९३४ खड्ड्यांची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डवर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेतली गेली. नवीन यांना खड्ड्यांवर इतके प्रेम का? कारण, ड्रायव्हिंग करताना आणि भ्रमंतीदरम्यान त्या त्या ठिकाणची वैशिष्ट्ये समजून घेणे, लोक संस्कृती अभ्यासणे, समस्या जाणून घेणे ही नवीन लादे यांची सवय. या भ्रमंतीतून त्यांना जाणवले की, रस्त्यांवरील खड्ड्यांचा माणसावर किती भयानक परिणाम होतो. यातूनच मग खड्डेमुक्त मुंबईहा विचार त्यांच्या मनात आला.

 

विविध संकल्पना, विविध प्रश्न यांचा पाठपुरावा करत राहणे हेही नवीन यांचे वैशिष्ट्य. त्यामुळेच जेव्हा देशात आधार कार्ड सुरू झाले, तेव्हा त्यावर आधार आम आदमी की पेहचानअशी टॅगलाईन होती. त्यांनी या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आवाज उठवला. काही काळाने आधार कार्डची टॅगलाईन बदलली गेली. ती मेरा आधार मेरी पेहचानअशी झाली. याचबरोबर राजमुद्रेचा प्रश्नही नवीन यांनी उचलला. त्यालाही यश आले आणि न्यायालयाचा निर्णय आला की, राजमुद्रेचा शिक्का पूर्ण आणि व्यवस्थितच उमटवला गेला पाहिजे. नवीन यांना हे करावेसे वाटले. कारण, त्यांचे म्हणणे आहे की, देशाच्या अस्मितेशी निगडित असलेली कोणतीही प्रतीके ही सन्माननीय आहेत. नवीन लादे हे सामान्य माणसाच्या जीवनापलीकडचे विषय निवडून काम करत आहेत. त्यांच्या आयुष्यात काही प्रश्नच नाहीत म्हणून का? त्यांच्याही आयुष्यात प्रतिकूल आणि नकारात्मकच बरेच काही घडले. पण, या सार्‍या जीवन प्रवासात सातत्याने मेहनत करत नवीन लादेंनी आयुष्याला एक वेगळे परिमाण दिले आहे.

 

मूळ सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्याच्या शिरसगावचे रहिवासी असलेले लादे कुटुंबीय पुढे मुंबईत स्थायिक झाले. रामचंद्र लादे आणि वत्सला लादे यांना दोन मुले आणि एक मुलगी. त्यापैकी सगळ्यात लहान नवीन. वयाच्या १६व्या वर्षीच नवीन यांच्या घरची परिस्थिती पालटत गेली. वडील महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रामध्ये कामाला होते. पण, समाजात सर्वत्रच दिसणार्‍या व्यसनाधिनतेने त्यांनाही गाठले होते. अशाच विफल अवस्थेने आई मनोरूग्ण झाली. त्यामुळे नवीनला दहावीचा अभ्यास करताच आला नाही. घरदार सांभाळता सांभाळता, आईचे उपचार करण्यातच दिवस जाई. त्या क्षणाने आयुष्याचा अर्थ गवसला. नवीनच्या मनात आले, असे कितीतरी रूग्ण असतील की ज्यांना कोणीच नसेल. त्यांचे काय होत असेल? यातूनच मग समाजासाठी काम करण्याचे त्यांनी ठरवले. खिशात पैसे नव्हते पण, मन हरहुन्नरी होते. महानगरपालिका आणि प्रशासनातील कागदपत्रांची पूर्ण माहिती होती. ते कमी शुल्कात लोकांना ही कागदपत्र काढण्यास मदत करू लागले. त्यातच प्रेमविवाह झाला. सहचारिणही त्यांच्यासोबत समाजकार्य करणारी. समाजकार्याला वेळ देता यावा म्हणून दोघांनी ठरवले की, खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर पोळ्या लागतात. त्या पोळ्या पुरवायच्या. दोघेही पहाटे ४ वाजता उठून ६ वाजेपर्यंत ५०० पोळ्या करायचे. ७ पर्यंत ते स्टॉल्सवर पोहोचवायचे. पुढे समाजकार्य आणि संस्थेच्या कामासाठी वेळ मिळे. यातूनच नवीन यांचा जनसंपर्क वाढत गेला. त्यांनी लायझनिंगचा व्यवसाय सुरू केला.

 

२०१८ साली कोरेगाव-भीमाच्या निमित्ताने उद्भवू पाहणारी दरी समाजाने पाहिली. त्यावेळी नवीन यांनी खूप वेगळे कार्य केले. ते मोर्चासोबत गेले. पण, स्वत:सोबत त्यांनी पोलीस आणि काही समाजसेवकही घेतले. ते यासाठी की, आंदोलन शांततेने चालावे, या मोर्चाच्या आडून कोणीही स्वार्थासाठी हिंसा करू नये. नवीन म्हणतात, “बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करासांगितले आहे. यातील संघर्ष करायाचा अर्थ बदलला आहे. कारण, आज संघर्षासाठी बाबासाहेबांनी दिलेले संविधानात्मक कायदे आहेत. हिंसेने संघर्ष करणे हा संविधानाचा अपमान आहे.आज नवीन माथाडी आणि रोजगारासंदर्भात भरीव काम करत आहेत. त्यांना भारत सरकार क्रीडा विभागाद्वारे राष्ट्रीय युवा पुरस्कार,’ महाराष्ट्र शासनाचा राज्य युवा पुरस्कारआणि इतर ८० पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. नवीन म्हणतात, स्वत:साठी सगळेच जगतात. दुसर्‍यांसाठीही जगले पाहिजे. त्याला जीवन ऐसे नाव...

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat