भिकेचे स्वप्न देऊ नका

    दिनांक  26-Mar-2019   
येत्या निवडणूकीमध्ये चुकून माकून भुलेसे काँग्रेस पक्ष निवडून आला तर राजकुमार राहुल गांधी देशातील २० टक्के गरीबांना वर्षाला ७२००० रूपये वाटणार आहेत. बरं हे फुकट वाटण्याचे पैसे कुठून येणार? हा प्रश्न काही नतद्रष्ट विचारतील. तर अशा नतद्रष्टांना खडसाऊन सांगितले पाहिजे की राहुल गांधीना कुणी काहीही विचारू नये. उद्या म्हणतील की देशातच का अख्ख्या जगात काँग्रेसचे सरकार येईल. ते आले रे आले की जगातल्या २० टक्के गरीबांना ७२००० रूपये का? प्रत्येकाला ७२००० डॉलर्सही प्रत्येक वर्षी वाटतील. ते असे म्हणतीलही कारण असे फुकाचे बोल उधळायला काय जाते हे राहुल गांधीना माहिती आहे. ज्याचे त्याचे कार्यक्षेत्र असते, तसे राहुल गांधींचे कार्यक्षेत्र जनतेच्या भावनांची कुचेष्टा करण्याचे आहे. त्यामुळे एरवी हिंदू धर्माला डावलून निधर्मीपणाचा टेंभा मिरवणाऱ्या राहुल गांधीनी फक्त मताच्या भिकेसाठी हिंदूत्वाचा बुरखा पांघरला. ती सुद्धा धार्मिक जनतेची कुचेष्टाच होती. आता राहुल गांधीना गरीब जनतेची कुचेष्टा करण्याची हुक्की आली आहे. गरीबी हटवणे इतके सोपे आहे का? की परिस्थितीमुळे लाचार असलेल्या गरजूच्या तोंडावर काही दमड्या फेकून ती संपेल? एक लोककथेमध्ये गरजूला मासे देऊ नका तर मासे पकडण्याचे जाळे द्या, कला द्या, त्यामुळे त्या गरजूला पुन्हा कधिही मासे द्यायची वेळ येणार नाही. तर तो स्वाभिमानाने स्वताच्या बळावर जगेल. असा संदेश आहे. राहुल गांधी या कथेतील सत्य जाणू शकतील का? आता कुणी म्हणेल की पोगोमध्ये ही कथा दाखवा, म्हणजे कदाचित राजकुमारांना कथा समजेल. पण तसे नाही,गरीबी सांगून समजत नाही, त्यासाठी मनात संवेदना असाव्या लागतात. दलित म्हणून एखाद्या व्यक्तिची किंमत जातीनुसार ठरवून त्याच्या घरी भाकरी खाल्ल्याने गरीबीचे भिषण वास्तव संपत नाही. ती भिषणता पैसे वाटून नाही तर गरीबाला त्याच्या स्वत्वाची जाणिव देऊन होते. २०१४ साली जेव्हा त्यांच्या सारखाच गरीब घरचा चहावाला पोर स्वकतृत्वाने पंतप्रधान झाला तेव्हा ती स्वत्वाची जाणिव गरीब जनतेला झाली. तेव्हा जनतेने जाणले की कतृत्वाला गरीबीचे बांध बांधू शकत नाहीत. त्यामुळे फुकटचे पैसे वाटण्याचे भिकेचे स्वप्न जनतेला दिले तरी जनता यांना निवडणूकीमध्ये वाटाण्याच्या अक्षता देणार हे नक्की.

 

गरीब लाचार नाहीत..

 

गरीबातल्या गरीब आणि श्रिमंतातल्या श्रिमंत पालकांना विचारा की त्यांच्या मुलाला समर्थ आणि बलवान बनवण्यासाठी काय कराल? ते असे नाही म्हणणार की, मुलाला दर महिन्याला अमुक एक रक्कम उचलून देईन, मग त्याने काहीका करेना. त्यातून तो समर्थ होईल. नाही कुणीही पालक असे म्हणणार नाहीत. तर ते म्हणतील की अशी पार्श्वभूमी तयार करीन की पाल्य त्याच्या बळावर जगेल. असो,सध्या लोकशाही राज्यात लोकांचे लोकांसाठीचे राज्य आहे. असे जरी असले तरी सत्तेचे स्वरूप लोककल्याणकारी आणि सत्ताधाऱ्याचे स्वरूप लोककल्याणाच्या पालकत्वाचे आहे. जनतेला सर्वच आघाड्यांवर सक्षम बनवण्याचे काम सत्ताधाऱ्याने करावे हा सध्याचा संकेत. त्यामुळे गरीबांना फुकट पैसे वाटणारे राहुल गांधी जनतेबाबत काय विचार करतात हा प्रश्न पडतो. तसेही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या राहुल गांधीना गरीबांचे दुख कळणार नाही. त्यांना फुकटात मिळणारी खैरात नको. तर स्वाभिमानाचे स्वावंलबी जीणे हवे. पण हेही राहुल गांधीना कसे कळणार, कारण स्वाभिमान कुणाला असतो? ज्याला आयुष्यात संघर्ष करायला लागतो. ज्याच्या आयुष्यात असंख्य नकारात्मक घटक असतात आणि त्या साऱ्या नकारात्मकतेला पुरून उरून जो मुकद्दर का सिंकदर बनतो. राहुल गांधीचे सगळेच आयुष्य सगळेच वैभव, सगळेच मानमरतब वंशपरंपरेने मिळालेले. दिवसाच्या चोविस तासात स्वकष्टाने कमावलेले त्यांच्याकडे काय आहे असा विचार करून पाहा, म्हणजे त्याचे उत्तर कळेल. आता कुणी म्हणेल की ते सत्ताधारी खानदानीमध्ये जन्मले त त्यांचे नशिब. तुम्ही का जळता. तर आम्ही यासाठी जळतो की तुमचे सगळे ऑलबेल असताना जे परिस्थितीने किंवा नशिबाने म्हणा गरीबीचे जीणे जगत आहेत. त्यांचा तरी अपमान करू नका. राहूल असतील मोठे दानशूर. मोठे गरीबांचे कैवारी. पण म्हणून त्यांनी भारतीय जनतेला लालची भिकारी समजू नये.गरीबी हटावच्या मागण्या राहुल यांच्या पणजोबांपासून सुरू आहेत. त्यांच्या आजी, पिता यांच्या कारकिर्दीमध्येही हेच पालुपद होते. तसेच मतदान आले की गरीबांना दोन चार दमड्या फुकट देण्याची लालच द्यायची हा खेळ राहुल गांधी यांच्या आधीही काँग्रेसने बराच काळ सातत्याने खेळला आहे. गरीबांना कितीकाळ लाचार समजणार?

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat