जीवन फुलवणारी ‘पूजा’

    दिनांक  26-Mar-2019   शहरांत राहणाऱ्यांना आपल्या जवळपास हिरवीगार अशी जागा मिळणे तसे अवघडच. पण, पुण्याच्या पूजा भाले यांनी अशा लोकांची ही अडचण दूर केली आहे. कोण आहे पूजा भाले आणि काय केलेय त्यांनी? जाणून घेऊया...


कोणत्याही मोठ्या शहरात राहणारी माणसे गगनचुंबी इमारतींनी वेढलेली असतात. हजारो वर्षांपासून माणूस निसर्गाच्या सान्निध्यात राहत आला. पण, गेल्या काही वर्षांपासून त्यात प्रचंड बदल झाला. परिणामी, आपण सध्या एका अशा युगात वावरत आहोत, ज्यात निसर्गाशी असलेला संबंध दिवसेंदिवस कमी होताना दिसतो आणि आपले आयुष्य तंत्रज्ञान व इंटरनेटद्वारे मिळणाऱ्या सोयी-सुविधांमध्येच अडकल्याचे दिसते. अर्थात, तरीही कित्येकांना निसर्गाची ओढ ही असतेच. म्हणूनच अशी लोकं प्रवासाच्या, पर्यटनाच्या निमित्ताने इकडे-तिकडे भटकताना दिसतात. अशा एखाद्या ठिकाणी जाऊन आनंदाचे, सुखाचे दोन निवांत क्षण घालवावे, असे बहुतेकांना वाटते. सभोवती हिरवीगार झाडी असावी, पक्ष्यांचा किलबिलाट असावा आणि तंत्रज्ञानाला सोडचिठ्ठी देऊन निसर्गाच्या मुक्तहस्ते होणाऱ्या उधळणीची लयलूट करावी, असेही बऱ्याचदा मनात येते. शहरांत राहणाऱ्यांना आपल्या जवळपास अशी एखादी जागा मिळणे तसे अवघडच. पण, पुण्याच्या पूजा भाले यांनी अशा लोकांची ही अडचण दूर केली आहे. कोण आहे पूजा भाले आणि काय केलेय त्यांनी? जाणून घेऊया त्यांच्याबद्दल...

 

पूजा भाले यांनी पुण्यामध्येद फार्मनावाने एका जैवविविधता केंद्राची उभारणी केली असून तिथे कितीतरी प्रजातींच्या चिमण्या, पक्षी, छोटे छोटे कीटक, पतंग आहेत, जिथे शहरातील प्रदूषणाचा लवलेशही दिसत नाही. विशेष म्हणजे, या संपूर्ण परिसराची देखरेख जीवशास्त्रज्ञ असलेल्या पूजा भाले एकट्याच करतात. इथे तुम्हाला केवळ हिरव्याच वनश्रीचे पारणे फेडणारे रूपच दिसत नाही, तर असे कितीतरी उपक्रमही आहेत, ज्यांच्याशी तुम्ही जुळू शकता. पूजा भाले यांच्या कौटुंबिक मालकीची ही जमीन असून ती सुरुवातीला ओसाड माळरानासारखी किंवा पडिक होती. पण, आता जर तुम्ही तिथे गेलात तर जिद्द आणि दृढसंकल्पाच्या साहाय्याने कोणत्याही गोष्टीला गवसणी घालता येते, यावर तुमचा नक्कीच विश्वास बसेल. इथे काही झोपड्या-कुटी आहेत, हजारो झाडे आहेत, विशेष म्हणजे या जागेला सजवण्यात, फुलवण्यात ज्या गोष्टींचा वापर केला, त्या बहुतेक करून दानात मिळालेल्या आहेत. पूजा भाले यांनी इथे कितीतरी तळी तयार केली आहेत, जिथे पशु-प्राणी आणि पक्षी पाणी पिण्यासाठी नियमितपणे येतात. आपल्या ‘द फार्म’ या प्रकल्पाबद्दल पूजा सांगतात की, “मी स्वतः जीवशास्त्रज्ञ असल्याने नेहमीच पर्यावरण हा माझा जिव्हाळ्याचा विषय होता. पण, मला सुरुवातीला हे कळत नव्हते की, मी माझ्या या पर्यावरणप्रेमाला लोकांपर्यंत कसे घेऊन जाऊ, कुठून सुरुवात करू? त्याचवेळी एका शैक्षणिक उपक्रमादरम्यान एका मुलाने मला एक प्रश्न विचारला व माझे आयुष्यच बदलून गेले.”

 

पूजा यांना विचारलेला प्रश्न कोणता होता? म्हटले तर तो अगदी साधासुधा प्रश्न होता. पर्यावरणाच्या सुधारणेसाठी, बदलांसाठी मी काय केले पाहिजे, असा प्रश्न त्या मुलाने विचारला होता. बस्स, या एका प्रश्नाने पूजा यांचे आयुष्यच बदलून गेले. कसे? तर २००८ च्या आधी पूजा लंडनमध्ये राहत असत आणि त्यांनी त्यांचे शिक्षणही तिथेच घेतले. पण, नंतर त्या पुन्हा भारतात परतल्या. २००८ अथवा २००९च्या मध्यात कधीतरी स्वीडनच्या एका कुटुंबाशी पूजा यांची भेट झाली. ते दोघेही ‘ओपन वर्ल्ड’ नावाने एक संस्था चालवत होते. ते दोघेही लोकांसाठी एका अशा जागेची निर्मिती करू इच्छित होते, जिथे ते निसर्गाच्या जवळ राहू शकतील. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊनच पूजा यांनी आपल्या इथे काही करता येईल का, असा विचार केला. पूजा भाले यांच्या कौटुंबिक मालकीची साडेतीन एकर जमीन कित्येक वर्षांपासून पडिक होती. तिथे लोकांची ये-जाही कमीच होती, तिथे अशी कोणतीही गोष्ट नव्हती, ज्याच्या आकर्षणाने प्राणी, पक्षी येतील. तेव्हाच पूजा यांनी ध्येय ठेवले की, कशाप्रकारे या जमिनीच्या परिसरात जैवविविधता पुन्हा एकदा वावरू शकेल? तसे ठरवून त्यासाठी एकट्याने काम करण्याचीही त्यांनी तयारी केली. नंतर पुढची पाच वर्षे पूजा यांनी जमिनीचे ‘द फार्म’ या प्रकल्पात रूपांतर करण्यासाठी मेहनत केली, पण त्याने केवळ त्या जमिनीत परिवर्तन झाले असे नाही, तर पूजा यांच्यातही बदल झाला.

 

साडेचार वर्षांपूर्वी काम सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पात सध्या एक मोठा तलाव आहे, ज्यात ४०० हजार लिटर पाणी साठवले जाते. इथे १ हजार, ४०० निरनिराळ्या प्रकारांची झाडे आहेत, तसेच ६२ पेक्षा अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आहेत आणि फुलपाखरांच्याही आठ प्रजाती आहेत. इथे इतर अनेक प्राणीही येतात. सोबतच ९ कुत्रे, २२ मांजरी आणि काही शेळ्याही आहेत. ‘द फार्म’च्या प्रवेशठिकाणी कोणताही दरवाजा नाही, तर केवळ एक पडदा आहे जो गायीच्या शेणाने तयार केलेला आहे. इथे वृक्षारोपण करणे, खड्डे खणणे आदी सगळीच कामे स्वयंसेवकांच्या मदतीने पूर्ण झाली आहेत. या संपूर्ण प्रकल्पाच्या उभारणीसाठी अडगळीत पडलेल्या साहित्याचा किंवा देणगी म्हणून मिळालेल्या सामानाचा वापर केलेला आहे. इतकेच नव्हे, तर मद्याच्या बाटल्यांपासून ते रबरी टायरपर्यंत प्रत्येक वस्तूचा इथे वापर करण्यात आला आहे. झोपड्या आणि कुंपणे बांबूपासून तयार केलेली आहेत. इथे पशुचिकित्सेबरोबरच जैविक शेतीचीही माहिती मिळते. अशा या निसर्गाच्या संपन्नतेचा अनुभव करून देणाऱ्या प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या पूजा भाले, त्यांना भावी उपक्रम व कार्यक्रमासाठी शुभेच्छा!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat