मित्रों...

    दिनांक  25-Mar-2019   भय इथले संपत नाही,

सत्तेशिवाय अंधार दाटला,

कुणा कुणा घालू साकडे,

४४ चे ४ होतील का आकडे?

झाकण्यासाठी माझे व्याप, मोदींना देतो शिव्याशाप

भय इथले संपत नाही!

खरेच इथले भय संपत नाही, इतक्या वर्षांची सत्तासम्राज्ञी अशी रूसून कमळावर बसली. तिला सांगितले, ये, हा पंजा बघ पण ती ऐकायला तयार नाही. तिला म्हटले, “हिंदी सिनेमाच्या भयपटावर जाऊ नकोस गं.” (खुलासा : मनगट नसलेला पंजा भूतप्रेतावर आधारित सिनेमामध्ये निष्पाप लोकांचे गळे आवळताना दाखवतात.) पण सत्ताराणीचे हूं नाही की चूं नाही. अशी निसटून गेली. तिला पुन्हा आपल्या कंपूत आणण्यासाठी काय नाही केले? त्या कमळवाल्यांचे नसलेले घोटाळे, भ्रष्टाचार उकरून काढतो. माझ्या आवाक्यात नसलेल्या अगदी माझ्या विचारकक्षेच्या बाहेर असलेल्या गोष्टी पण बोलतो. पण छे... आलूपासून सोना बनविण्याची सर्जनशीलता कल्पकता दाखवली. पण प्रत्येकवेळी तिने मला ठेंगा दाखवला.

का इतकी कोपली ती? २०१४ सालापूर्वी ‘ए’ पासून ‘झेड’ या इंग्रजी अक्षरांची बाराखडी पूर्ण होईल, या स्वरूपाचे भ्रष्टाचार आमच्या पक्षाच्या राजवटीत आमच्या नेत्यांनी केला. अशी कल्पकता, असे निराळेपण कोणी दाखवले का? पण सत्ताराणीला याची किंमतच नाही. ‘गरिबी हटाव, गरिबी हटाव’ बोलताना गरीबालाच गरीब ठेवण्याचा पंचवार्षिक कार्यक्रम पक्षाने स्वातंत्र्याच्या ७० वर्षांत कायम राखला. त्याचीही कदर या सत्ताराणीला नाही. काय करावे? दुसरीकडे ते मित्रों, मित्रों म्हणत सत्ताराणीला कमळाची भेटही देऊन गेले. काय करावे? लोकांना सांगितले की, त्यांनी मित्रों, मित्रों म्हणतच जनतेचा पैसा अनिल अंबानीसारख्या ’भाईं’च्या खिशात घातला. असे म्हटले खरे, पण भय इथले संपत नाही. कारण कुणी या वाक्याचे पुराव्यासह सत्यासहीत स्पष्टीकरण विचारले तर? ते मी देऊ शकत नाही. दुसरे ते मित्रों म्हणतायत पण मला भास होतो की, त्यांना घाबरून बनवलेल्या आमच्या ५६ पक्षांच्या आघाड्यांना ते म्हणतात, ‘भित्रों...!’ खरंच, भय इथले संपत नाही.

 

दगड मारणारे...

 

धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) आमदार असलेले शिवलिंगे गौडा एका जाहीर सभेत म्हणाले, “पंतप्रधान मोदी यांनी कर्नाटकात येऊ नये. जर ते कर्नाटकाच्या भूमीवर पाय ठेवतील तर त्यांना दगडांनी मारण्यात येईल. तसेच कोणी ‘मोदी-मोदी’ करेल तर त्यांच्या कानाखाली देण्यात येईल.” वा वा! हीच ती धर्मनिरपेक्षता, हीच ती सहिष्णूता. जनता दल झाले आणि इतरही अनेक विरोधी राजकीय पक्ष काय त्यांनी मोदींना शिव्याशाप हा एककलमी अजेंडा ठेवला आहे. जनतेचे कल्याण, आपआपल्या कार्यक्षेत्रातील विकास किंवा समस्या सोडवणे, या गोष्टी तमाम विरोधी पक्ष विसरून गेला आहे. त्यांना माहिती आहे, सत्ताधारी घटकांकडून हे काम करून घ्यायला अष्टौप्रहर पंतप्रधान मोदी बसलेत. जो स्वतःही खात नाही आणि आम्हाला पण खाऊ देत नाही. त्यामुळे सर्व विरोधी पक्ष, त्यांचे तमाम छोटे-मोठे नेते आणि या नेत्यांच्या माध्यमातून काही ना काही पदरात पाडून घेतलेले काही नामधारी विचारवंत, साहित्यिक भांबावले आहेत. त्यांना एकमेकांचा कितीही जीव घ्यावासा वाटला तरी, एकमेकांना तूच माझा बाप म्हणत हे सारे एकत्र आले आहेत. ५६ इंच हे शब्द विरोधकांच्या मनात कानीकपाळी इतके गोंदले आहे की, आघाडीही ५६ जणांना घेऊन ५६ नखर्‍याची बिघाडी केली आहे. असो. गेली पाच वर्षे देशात तथाकथित धर्मनिरपेक्ष का काय लोकांनी, देश जणू रौ रौ नरकात बुडत चालला आहे, असा थयथयाट चालवला होता. अर्थात त्यांचे बोलवते धनी कोण होते, हे जगजाहीर आहे. सत्तेचे बस्तान पुन्हा एकदा बसविण्यासाठी सामान्य जनतेच्या लक्षात न येण्यासारखे खूप काही प्रकार देशात घडवले गेले. पण हे सगळे चाळे खुलेआम करण्याचे स्वातंत्र्य उपभोगत असताना ते म्हणतात, “देशात अभिव्यक्तिस्वातंत्र्य नाही.” खरे तर अभिव्यक्तिस्वातंत्र्याची मर्यादा ओळखण्याची कुवत शुद्धीवरच्या लोकांना असते. आता शिवलिंगे गौडा मोदींना दगड मारण्याचे मनसुबे रचत आहेत. जगाला माहिती आहे की, विनाकारण निष्पापांना दगड कोण मारतो? तोच मारतो, ज्याची रवानगी ठाण्याच्या किंवा पुण्याच्या वेड्याच्या इस्पितळात करण्याची गरज असते. वेडाचा बाजार मांडत, सत्तेसाठी येड घेऊन पेडगावला जाणार्‍यांना जनतेने ओळखले आहे. त्यामुळे दगड मारा किंवा फुले उधळा, जनतेला बरोबर कळले आहे की, देशाला दगड मारणारे नाहीत तर देशाचा विकास करणारे हवे आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat