रंगोत्सवात रंगत आणणारी रहाड संस्कृती

    दिनांक  25-Mar-2019   
होळीनंतर पाच दिवसांनी येणारा रंगपंचमीचा सण नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. नाशिकमध्ये असलेल्या रहाड संस्कृतीमुळे या रंगांच्या सणाची रंगत अधिकच खुलत असते. त्यातच शनी चौक, दिल्ली दरवाजा, तांबट लेन व तिवंधा येथील रहाड हे तर नाशिकचे भूषण म्हणून प्रसिद्ध आहेत.

 

संपूर्ण भारतात फाल्गुन पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी अर्थात धुलिवंदन या दिवशी रंगोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. तर काही ठिकाणी फाल्गुन कृष्णपंचमीला अर्थात रंगपंचमीला रंगोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. त्यातील एक ठिकाण म्हणून नाशिकचा उल्लेख करावा लागेल. हा सण साजरा करण्यात नाशिकचे खास वेगळेपण आहे आणि ते म्हणजे पेशवेकालीन परंपरा लाभलेली रहाड संस्कृती. विविध नैसर्गिक रंगांनी युक्त असे रंगीत पाणी येथील काही ठरविक चौकात हौदात साठवले जाते. साधारणतः ८ ते ९ फूट खोल या हौदाची विधिवत पूजा केली जाते व त्यानंतर मानाची उडी पार पडते. यानंतर नाशिककर नागरिक या पाण्यात उडी घेऊन रंगपंचमीचा आनंद घेत असतात. होळीनंतर वातावरणात वाढणारा उष्मा सहन करण्याची क्षमता प्राप्त व्हावी व अंगाची होणारी लाहीलाही कमी व्हावी याकरिता शरीराला थंडावा देणारे नैसर्गिक रंग या रहाडीत वापरले जात असतात. याबाबत असादेखील समज आहे की, लहान बाळास या रहाडीत आंघोळ घातल्यास त्याचे उष्णतेच्या विकारांपासून रक्षण होते. त्यामुळे अनेक पालक या रहाडीत आपल्या लहानग्यांना आंघोळ घालतात.

 

या रहाडीची निर्मिती ही मुळात पेशवेकाळात झाल्याचे येथील ज्येष्ठ नागरिक सांगतात. पेशवे हे खरे रहाडींचे जनक. पेशव्यांनीच २५० ते ३०० वर्षांपूर्वी दगड आणि चुन्यात या रहाडींचे बांधकाम केले आहे. वास्तुरचनेच्या दृष्टीने या रहाडींच्या रचनेचा विचार केल्यास असे दिसते की, एक चौरसाकार हौद असतो. तसेच, काही रहाडींची लांबी व रुंदी ही सारखीच असते. नाशिकमध्ये आधी एकूण १८ रहाडी अस्तित्वात होत्या. मात्र आजमितीस केवळ चार रहाडी या वापरायोग्य आहेत. त्यातील १) काळाराम मंदिराच्या उत्तर दरवाजाला असणार्‍या शनी चौकात २) गाडगेमहाराज पुलाजवळील दिल्ली दरवाजाजवळ ३) तिवंधा येथील बुधा हलवाईजवळ ४)जुन्या तांबट लेनमधली रहाड तसेच, तांबट आळी व मधली होळी या परिसरातदेखील रहाडी आहेत. या प्रत्येक रहाडीचा स्वतःचा एक इतिहास आहे. तो असा की, मधली होळीमधली रहाड पेशवेकाळात पेशव्यांच्या सरदारांच्या अखत्यारित होत्या. त्यानंतर त्या विविध तालमींच्या अखत्यारित आल्या व आजमितीस त्यांची देखभाल स्थानिक मंडळांमार्फत केली जात आहे. शनी चौकातील रहाड पेशवेकाळापासून आहे. आज शनी चौकातील शनी चौक मित्रमंडळ आणि सरदार रास्ते आखाडा अतिशय परंपरेने या रहाडीची जपणूक करत आहे. शनी चौकातील रहाडीचा रंग हा गुलाबी ठरलेला आहे. त्याच पद्धतीने इतर रहाडींचेही रंग ठरलेले आहेत. त्यामुळे कुठला इसम कुठल्या रहाडीतून नुकताच डुंबून आला, हे लगेच कळते.

 

वर्षभर या रहाडी जमिनीखाली असतात. त्यावरून मार्गक्रमण केले जात असते. मात्र, रंगपंचमीच्या आदल्या दिवसापासून रहाडीचे उत्खनन करण्यास सुरुवात होते. नंतर रंग बनविण्यास सुरुवात होते. रंग हा पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने बनवला जातो. नाशिक शहरातील रहाडीसाठीचा रंग हा झाडांची पाने, फुले, हळद, कुंकू आदी पदार्थांच्या एकत्रीकरणातून तयार करण्यात येतोया रहाडीचे वैशिष्ट्य म्हणजे रंगपंचमीच्या सणानंतर ती बुजविण्यासाठी प्राचीन अशा असणार्‍या बल्याचा (सागवानी लाकडाचे मोठमोठे ओंडके) वापर केला जातो व रहाडीत आधीच्या रंगाचे पाणी अर्धी रहाड भरलेली अशा पद्धतीने ठेवून त्यावर उसाचे चिपाड व त्यावर माती या पद्धतीने बुजविण्यात येते. रंगपंचमीच्या दिवशी रंग बनवून झाल्यावर व संपूर्ण रहाड सजवल्यानंतर रंगाची पूजा केली जाते. तो पहिला रंग सर्वप्रथम शनी चौकातील शनी देवावर व रास्ते तालमीच्या मारुतीवर टाकला जातो व त्यानंतर दीक्षित घराण्यातील ज्येष्ठ व्यक्ती पहिली उडी पूर्व दिशेकडून या रहाडीत टाकतात. या रहाडीचा रंग पक्का असतो व तो दोन ते तीन दिवस जात नाही, हे विशेष.

 

दिल्लीदरवाजा रहाड

पेशवेकालीन या रहाडीची देखभाल आणि मान समस्त तुरेवाले पंच मंडळ यांच्याकडे आहे. येथील बेळे गुरुजी यांच्या घराण्याकडून विधिवत पूजा करून झाल्यावर ही रहाड सर्वांसाठी खुली केली जाते. या रहाडीचा आकार हा तुलनेने लहान असून त्या रहाडीपासून रंगपंचमीच्या दिवशी मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. या रहाडीचा रंग हा केशरी (लाल) ठरलेला असून त्यासाठी पळसाच्या फुलांचा उपयोग केला जातो. तिवंधामधली रहाड पेशवेकालीन आहे. तसेच या रहाडीची देखभाल आणि सांभाळ कलाविश्व मंडळ आणि हिंदमाता मंडळ यांच्याद्वारे केली जाते. रहाडीची उंची १२ फूट खोल आहे. रहाडीचा रंग पूर्णपणे नैसर्गिकरित्या बनवला जातो. या रहाडीचा रंग पिवळा असतो. रहाडीची सगळी धुरा येथील स्थानिक मंडळाकडे आहे.

 

तांबट लेनमधली रहाड

ही रहाड उंचीला १५ फूट खोल आहे. येथील रंग हा केशरी किंवा लालसर असतो. विविध कारणास्तव इतर रहाडी आता उघडण्यात येत नाही. रहाडमध्ये आंघोळ करणे याला ‘धप्पा’ असेही नाशिकमध्ये संबोधले जाते. एकाला धप्पा मारला की, आजूबाजूचे सर्व नागरिक हे उडालेल्या पाण्यामुळे रंगून जात असतात. उत्तम सूर मारणारा म्हणजे धप्पा मारणारा व्यक्ती रहाडमध्ये मनसोक्तपणे आनंद घेऊ शकतो. एका आख्यायिकेनुसार पूर्वी गल्लीतील तालमीच्या पेहेलवान मंडळींच्या गटातटाची शक्ती प्रदर्शनची जागा म्हणजे रहाड असे. येथे कधीकाळी कुस्तीचे सामने होत असत. कुस्तीच्या या आयोजनामुळे येथे वादंग होत असत. त्यामुळे रहाडा हा शब्दप्रयोग प्रचलित झाला असावा आणि त्याच्यावरून रहाड हा शब्द अस्तित्वात आला असावा. नाशिककर नागरिकांसाठी रंगपंचमीच्या दिवशी रहाडीत धप्पा न मारणे म्हणजे रंगच न खेळल्यासारखे आहे. येथील रहाडींची ख्याती ही विदेशातदेखील असून तेथील पर्यटकदेखील यात धप्पा मारत असतात. असा हा रंगपंचमीचा दिवस नाशिककर नागरिक मोठ्या आनंदात रंगात न्हाऊन साजरा करत असतात.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat