आधुनिक कर्ताकरविता नारायण!

    दिनांक  25-Mar-2019विवाह जुळवणे आणि तो सिद्धीस नेणे, हा प्रा. प्रीतिश कुलकर्णी या माणसाचा छंद आहे. आपला व्यवसाय सांभाळून त्यांनी छंद जोपासत आतापर्यंत सुमारे १०० विवाहसोहळे थाटात पार पाडले आहेत. यंदा पुलंचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांच्याच 'व्यक्ती आणि वल्ली'मधील नारायण म्हणजे एक सार्वजनिक नमुना! लग्नसोहळ्यात त्याची उपस्थिती विशेष लक्षवेधी नसली तरी त्याच्यावाचून लग्नकार्यात सगळ्यांचेच गाडे अडते. नारायण ही केवळ व्यक्ती नसून संस्थाच आहे. अशा व्यक्ती निरपेक्ष वृत्तीने व स्वयंस्फूर्तीने कामाला वाहून घेतात. त्यांचा स्वयंसेवकाचा बाणा असतो. मात्र, अलीकडे समाजात अशी निरलस वृत्ती कमी होतानाच एक 'आधुनिक कर्ताकरविता नारायण' मला एका लग्नातच भेटला.

नाशिकमध्ये 'बाबाज थिएटर्स'चे संचालक प्रशांत जुन्नरे यांची कन्या श्वेता हिचा नुकताच विवाहसोहळा संपन्न झाला. यावेळी एका व्यक्तीने माझे लक्ष वेधून घेतले. ते होते प्रा. प्रीतिश कुलकर्णी. विवाह जुळवणे आणि तो सिद्धीस नेणे, हा या माणसाचा छंद आहे. परफेक्ट कॉमर्स अकॅडमीचे ते संचालक आहेत. आपला हा व्यवसाय सांभाळून त्यांनी छंद जोपासत आतापर्यंत सुमारे १०० विवाहसोहळे थाटात पार पाडले आहेत. वर किंवा वधूपक्षाकडून कोणत्याही अपेक्षा न बाळगता ते आपले घरचेच कार्य समजून विवाहसोहळा 'परफेक्ट' कसा होईल, याच घाईगडबडीत असतात. विशेष म्हणजे विधवा, विधुर, दिव्यांग किंवा काही कारणांमुळे ज्यांचे विवाह अडलेले आहेत अशांच्या रेशीमगाठी जुळविण्यात व थाटामाटात पार पाडण्यात प्रीतिश यांना विलक्षण समाधान मिळते. हिंदू धर्मात विवाह हा १६ संस्कारांपैकी महत्त्वाचा १५ वा संस्कार आहे. लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असते. त्यात दोन परिवारांचे ऋणानुबंध जुळून येतात. विवाहसोहळ्यात कालानुरूप बदल होत आहेत. नुसता लग्न हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर उभी राहते ती नुसती धांदल. लग्न पाहावे करून आणि घर पाहावे बांधून, अशी म्हण आहेच. वधुपित्याला, वधुपक्षाला खूप कसरत करावी लागते. त्यांची धावपळ होते. तशीच अवस्था वरपक्षाचीही असते. आनंदाचा प्रसंग असला तरी दगदग होते, दडपण येते. विवाहाला सामाजिक संदर्भाबरोबरच भावनिक व श्रद्धेचे स्थान असते. विवाहबंधन सांस्कृतिक पातळीवर पवित्र मानले जाते. रूढी, परंपरा, धार्मिक विधीबरोबरच हौसमौज, रुसवेफुगवे, देणीघेणी यांनीच विवाहसोहळे जास्त गाजतात.

 

हल्ली लग्न जुळणे, सर्व समाजात कठीण समस्या झाली आहे. मुलींपेक्षा मुलांची लग्ने जमवणे अधिक अवघड होत चालले आहे. त्यामुळेच वधुवर सूचक मंडळे, मेळावे, मासिके-वृत्तपत्रातील जाहिराती यापासून मॅट्रिमॉनियल वेबसाईट्स व ऑनलाईन मॅरेज ब्युरोपर्यंत समाजाने मजल मारली आहे. या पार्श्वभूमीवर प्रा. प्रीतिश कुलकर्णी यांचे काम मोलाचे ठरते. वधुवरांची जन्मकुंडली, पत्रिका जुळविण्यापासून त्यांची लगबग सुरू होते. परस्परांना पूरक अशा दोन कुटुंबांना एकत्र आणण्याच्या या धडपडीमुळे त्यांच्या संग्रही हजारो मुला-मुलींचा बायोडाटा जमा झाला आहे. लग्नपत्रिका छपाईपासून सध्याच्या ट्रेंडनुसार बिदाईपर्यंत ते पूर्णपणे समरस होतात. वधु-वर पक्षांना नुसता त्यांचा आधारच नव्हे तर संपूर्ण सहकार्य, मार्गदर्शन मिळते. दूरदर्शीपणे धोरणात्मक निर्णय घेताना त्यांचे अष्टावधान चकित करते.

 

एकदा लग्न निश्चित झाल्यावर कापडखरेदी साखरपुडा, केळवण, वाङ्निश्चय, सीमांतपूजन, घाणा, हळद, तेलफळ, गौरीहरपूजन, प्रत्यक्ष लग्नघटिका, कन्यादान, विवाहहोम, सप्तपदी, झाल, बिदाईनंतर गृहप्रवेश, लक्ष्मीपूजन ते थेट रिसेप्शन या सार्‍यात प्रीतिश तनमनधनाने सहभागी होतात. हे करतानाच मुलीचा आणि मुलाचाही मेकअप, मेंदी, अलीकडे सुरू झालेली नृत्य-संगीताची धम्माल, लग्नापूर्वी फेटे, अक्षता, बँड, मिरवणूक, गुरुजी, फोटोग्राफर, व्हिडिओ शूटिंग, नातेवाईकांसाठी भेटवस्तू ही सगळी तारेवरची कसरत प्रीतिश हसतमुखाने लिलया करीत असतात. वर्‍हाडी मंडळींचे आदल्या रात्रीचे जेवण, सकाळचा चहा-नाश्ता, लग्नानंतरचा बुफे त्यासाठी मेनू सर्वांच्या पसंतीचा असावा, हादेखील कटाक्ष असतो. हे सर्व करताना कुठेही अवाजवी खर्च होणार नाही, याची दक्षता घेताना त्यांच्यातील कॉमर्सचा प्राध्यापक सतत जागा असतो. श्वेताच्या लग्नात जुन्नरे आणि औरंगाबादचा खिस्ते परिवार नुसता खुश झाला असे नाही तर आता प्रीतिशच दोन्ही परिवारातील सदस्य झाले आहेत.

 

या आगळ्यावेगळ्या छंदात त्यांची आयटी क्षेत्रात नोकरी करणारी पत्नी तसेच अभिनेत्री असणारी आई व सेवानिवृत्त वडील यांची कायम साथ आहे. त्यांना दोन लहान मुली आहेत. आपली अकॅडमी सांभाळून सायंकाळी ६ पासून रात्री उशिरापर्यंतचा वेळ ते या छंदासाठी देतात. हल्ली कोणालाही कोणासाठी वेळ देणे शक्य होत नाही. मात्र, या आधुनिक कर्त्याकरवित्या नारायणाच्या शब्दकोशात अशक्य हा शब्दच नाही. त्यांच्याशी गप्पा मारत असताना पुढच्या कार्याची जुळवाजुळव करण्यासाठी त्यांचा मोबाईल सतत बिझी होता. नव्या उत्साहाने ते पुढील विवाहसोहळ्यात मनाने सामीलही झाले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat