निवेशाचा चिनी आवेश...

    दिनांक  22-Mar-2019   भारताने श्रीलंकेमध्ये तेल आणि रिफायनरी क्षेत्रामध्ये सहभाग म्हणून ३.८५ अरब डॉलरचा निवेश गुंतवला आहे. भारताने मोठ्या भावाची भूमिका बजावली आहे. श्रीलंकेमध्ये पहिल्यादांच इतक्या मोठ्या प्रमाणात कुणीतरी इतकी आर्थिक सहभागिता केली आहे.


अवाढव्य, कसाही अफाट वाढलेला, फुगलेला आणि असंख्य किळसवाण्या भयकारी शेपट्या फेंदारणारा, लाल डोळ्यांचा ड्रॅगन कुणाला आवडतो, कुणाला आवडेल? निदान भारतीयांना तरी आवडणार नाही. अर्थात ज्यांचा राष्ट्रीय पशूच ‘मारखोर’ नावाचा आहे, त्या पाकिस्तानला ड्रॅगन आवडतो, यात शंकाच नाही. त्याच्या विळख्यात पिचताना पाकिस्तानला ‘सुसरबाई तुझी पाठ मऊ’ म्हणणे कमप्राप्त आहे. तर विषय असा आहे की, ड्रॅगनची उपमा असणारा एक देश आहे. त्याचे नाव चीन. पण, ‘हिंदी-चिनी भाई भाईम्हणत चीनने केलेला विश्वासघात भारत कधीही विसरू शकत नाही. त्यानंतर या देशाने सातत्याने भारताला या ना त्या पेचात अडकवायचा किंवा पाडायचा प्रयत्न केला. मग ते अरुणाचल प्रदेशवर सांगितलेला दावा असोत वा भारताच्या इतर शेजारी राष्ट्रांशी नीती असू दे, चीन त्याच्या कोतेपणाला जागला. चीनची पद्धत हिंदी सिनेमातल्या अजितसारखी, जो मोना डार्लिंगचा लाळघोटेपणा करतो. इथे चीन म्हणजे अजित आणि मोना डार्लिंग कोण ते वेगळे कशाला सांगायला हवे.

 

असो, चीन जागतिक पटलावर सातत्याने शिकारीच्या भूमिकेत वावरत असतो. साम, दाम, दंड, भेद वगैरे रणनीती वापरत सरंजामशाही वृत्तीने शेजारच्या राष्ट्रांना अंकित करणारा चीन... पाकिस्तान, नेपाळ, भूतान, श्रीलंका, बांगलादेश वगैरे वगैरे आपल्या शेजार्‍यांना चीन केवळ आणि केवळ ‘हस्तक’ या नजरेने पाहतो. कारण, आशिया खंडात चीनला आवाहन आहे ते केवळ आणि केवळ भारताचे. लोकसंख्या, भौगोलिकता, त्यातही सांस्कृतिक समृद्धी याबाबत भारत चीनपेक्षा कुठेही कमी नाही; किंबहुना कांकणभर सरसच आहे. भारताची सहिष्णूतावादी संस्कृती ही इतर शेजारी देशांना प्रेमाने आपले म्हणणारी आहे. त्यामुळे जर सर्वच आशियाई देश भारताकडे वळले तर आपले काय होणार? या भीतीने चीन सदा भयग्रस्त असतो. त्यामुळेच भारताला त्रासदायक असलेल्या सर्वच गोष्टीत चीनला भयंकर रस असतो किंवा त्याबाबत अति आत्मीयता असते. अझहर मसूदला दहशतवादी घोषित करण्याबाबत चीनला आक्षेप असण्याचे कारण काय? या दहशतवाद्याने भारताच्या सुरक्षिततेला तडा देण्याचा प्रयत्न केला. (अर्थात त्याचे चोख उत्तर भारताने पाकिस्तानला दिले, ही गोष्ट वेगळी.) त्याच्यामुळे भारताला त्रास होतो आहे, या एका अघोरी आनंदामुळे चीन सातत्याने मसूदची पाठराखण करत राहिला.असे हे चीनचे घाणेरडे मनसुबे लपले नाहीत. इतकेच काय, मदतीचा हात पुढे करत चीन आशिया खंडातील देशांना मधाचे बोट लावत सुटला आहे. पण, काही वर्षांतच चीनने मदत केलेल्या प्रत्येक राष्ट्राला माहिती पडले आहे की, ते संथगतीच्या विषाचे बोट होते. चीनने फसविण्यासाठी, आपल्या पाशात अडकविण्यासाठी फेकलेले ते जाळे होते. पण हे कळेपर्यंत उशीर झालेला असतो.

 

याचे उत्तम उदाहरण अर्थात पाकिस्तान आहेच. पण, पाकिस्तानचा खाक्याच न्यारा. आपण बरबाद झालो तरी बेहत्तर, पण दुसऱ्याला उद्ध्वस्त करायचेच, या बेतात हा देश क्षणाक्षणाने अधोगतीला पोहोचला आहे. त्यामुळे हा देश खुलेपणी चीनमुळे झालेले नुकसान मान्य करणार नाही. मात्र, या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचे उदाहरण चिंतनीय आहे. श्रीलंकेला मदत करण्याच्या बहाण्याचा चीनने भरपूर उपयोग करून घेतला. चीनने श्रीलंकेला आर्थिक मदत केली. आशिया खंडातील आपल्या शेजाऱ्याचा विकास व्हावा, हीच एक इच्छा चीनची असावी, असे जगाला वाटावे, असा आव चीनने आणला. या कर्जाच्या ओझ्यात श्रीलंकेसारखा चिमुकला देश पुरता चक्रावला. या कर्जाच्या बदल्यात चीनने श्रीलंकेचे हंबनटोटा बंदर ९९ वर्षांच्या करारावर ताब्यात घेतले. अर्थात चीनने दाखवताना असेच दाखविले की, या बंदराचा विकास केला जाईल आणि श्रीलंकेचाही विकास होईल. पण, काही दिवसांतच त्याचे परिणाम स्पष्ट झाले. या बंदराचा उपयोग चीन कशासाठी करणार, हे जगाला माहीत झाले. चीनच्या या कृत्याने सारे जग चिंतीत झाले. नेमक्या अशाच वेळी भारताने श्रीलंकेमध्ये तेल आणि रिफायनरी क्षेत्रामध्ये सहभाग म्हणून ३.८५ अरब डॉलरचा निवेश गुंतवला आहे. भारताने मोठ्या भावाची भूमिका बजावली आहे. श्रीलंकेमध्ये पहिल्यादांच इतक्या मोठ्या प्रमाणात कुणीतरी इतकी आर्थिक सहभागिता केली आहे. यामुळे चीनचे धाबे दणाणले आहेत. आपणच ते काय आशिया खंडातले मोठे दाते आहोत आणि इतरांना मदत करू शकतो, हा चीनचा आवेश गळून पडताना दिसत आहे. भारत-चीन तुलनेत आज तरी भारत सरस ठरला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat