मिथिलेची चित्रकर्ती

    दिनांक  22-Mar-2019   


 


बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात नव्वदीच्या गोदावरी दत्त यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. कारण, गोदावरी यांचे कार्यच असे की, ज्याची कीर्ती ही सर्वदूर पसरलेली...


कला
, मग ती कोणतीही असो, आपल्याला त्याबद्दल औत्सुक्य आणि कुतहूल हे असतेच. कलेविषयीची ही भावना कलाकाराच्या बाबतीतही बहुतांशवेळा लागू पडते. आज आपण अशाच एका कलाकाराची माहिती घेणार आहोत, ज्यांना यंदा देशाचा चौथा राष्ट्रीय नागरी पुरस्कार म्हणजेच ‘पद्मश्री’जाहीर झाला. बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात गोदावरी दत्त यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. कारण, गोदावरी यांचे कार्यच असे की, ज्याची कीर्ती सर्वदूर पसरलेली... गोदावरी दत्त यांचे मूळ गाव मधुबनी जिल्ह्यातील रांटी. बिहार आणि राष्ट्रीयस्तरावर कितीतरी पुरस्कारांनी गौरवान्वित गोदावरी दत्त आजही आपल्या मूळगावीच राहतात. बिहारची राजधानी पटनापासून २०० किलोमीटर अंतरावर असलेले रांटी गाव हे गोदावरी दत्त यांच्याच नावाने ओळखले जाते.

 

गोदावरी दत्त यांचे गावी एकमजली घर असून घरात प्रवेश केला की, मिथिला शैलीतील चित्रांनी सजलेल्या भिंती त्यांच्या कलात्मकतेचा रंगीबेरंगी नजारा दाखवू लागतात. घरातील चारही भिंती गोदावरी दत्त यांनी चितारलेल्या चित्रांनी आणि त्यांना मिळालेल्या प्रमाणपत्र, सन्मान आणि पुरस्कारांनी भरलेल्या दिसतात. त्यांच्या घरातील भिंतीवर ‘कोहबर’ प्रकारातील एक चित्र आहे, जे त्यांनी २० वर्षांपूर्वी काढलेले आहे. नंतर गोदावरींच्या नातींनीही त्यात कुठे कुठे रंग भरले. ‘कोहबर’ म्हणजे एक असा चित्रप्रकार, जो उत्तर-मध्य भारत आणि नेपाळ व तराईच्या प्रदेशात आढळतो. विवाहावेळी घरातल्या एका खोलीतील पूर्व दिशेच्या भिंतीना शेणाने सारवतात. नंतर दळलेली हळद आणि दळलेल्या तांदळाने चित्र काढले जाते. नंतर विवाहावेळी तिथे पूजा-अर्चना करतात. परंतु, गोदावरी दत्त यांनी ‘कोहबर’ आपल्या घरातल्या बैठकीच्या भिंतीवरच चितारल्याचे दिसते. चमकदार निळ्या, लाल, पिवळ्या आणि हिरव्या रंगाने गोदावरी दत्त यांच्या घरातील ‘कोहबर’ सजले आहे.

 

गोदावरी दत्त यांचा जन्म बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील बहादूरपूर गावात स्वातंत्र्यपूर्व काळात १९३० साली झाला. वयाची पाच वर्षे झाली, लहानग्या गोदावरी जेव्हा चालायला लागल्या तेव्हा आई सुभद्रादेवी घराच्या भिंतीवर जी चित्रे काढे, ती त्या पाहत असत. तिथूनच गोदावरी दत्त या मिथिला शैलीतील चित्रकला शिकल्या व म्हणूनच त्या आपल्या आईलाच गुरूस्थानी मानतात. आईसोबतच गोदावरी दत्त यांची आजीही अशाचप्रकारे भिंतींवर चित्रे चितारत असत. दोघीही चांगल्या कलाकार होत्या. गावात कोणाच्याही घरी लग्न-विवाह समारंभ वा अन्य कोणताही शुभ प्रसंग असेल, तर लोक गोदावरी यांच्या घरी येत. कारण, गावात आणि परिसरात कोणतेही शुभकार्य असले की, मिथिला शैलीतील चित्रे ही काढली जात.

 

चित्रे काढताना, मध्येच एखादे काम आले की, गोदावरी यांची आई तिकडे जात असे. तेव्हा गोदावरी आईच्या अनुपस्थितीत चित्रात रंग भरू लागत. एकदा आईने अशाप्रकारे गोदावरी यांना पाहिले, तेव्हा मात्र त्या घाबरल्या व माराच्या भीतीने लपल्या. पण त्यांची भीती गैरलागू होती. कारण, सुभद्रादेवी तर उलट आनंदित झाल्या. आई म्हणाली की, “तुला जर चित्र काढायला, रंग भरायला आवडत असेल, तर काढू शकते. रंग पसरले, सांडले तरी काही अडचण नाही.” तेव्हापासून गोदावरी दत्त यांनी कधी चित्र चितारताना हात आखडता घेतला नाही. पण, अजूनही त्या आपल्या यशात आईचा मोलाचा वाटा होता, असे नेहमी सांगतात.

 

लग्नाआधी दरभंगा जिल्ह्यात राहणार्या गोदावरी यांचा विवाह झाल्यानंतर त्या मधुबनीला आल्या आणि तिथेही कित्येकांना त्यांनी ही चित्रकला शिकवली. परंतु, हे सहजशक्य नव्हते. कारण, सासरच्यांना गोदावरी यांची ही चित्रकला अजिबात पसंत नव्हती. स्त्रियांनी घुंघट ओढून जगण्याचा तो काळ. महिला उंबरठा ओलांडून बाहेरही जाऊ शकत नव्हत्या, तर एक स्त्री चित्रे कशी काढू शकते? अशा प्रश्नांच्या भडिमारात त्यांचे पतीशी मतभेद आणि मनभेद झाले. पुढे यातूनच पतीने पदरात एक मूल टाकून त्यांना सोडले व दुसरा विवाहही केला. पण, नंतर नंतर सासरच्यांनीच गोदावरींना सांभाळले व त्यांची पाठराखणही केली. गोदावरींना चित्रे काढण्याचीही परवानगी मिळाली व उत्तरोत्तर त्यांची प्रगतीच होत गेली.

 

उल्लेखनीय म्हणजे, आजपर्यंत तब्बल ४९ हजार लोकांना गोदावरी दत्त यांनी मिथिला शैलीतील चित्रकारी शिकवली आहे. सध्या मात्र त्या आपल्या सून व मुलासह राहतात आणि वयोवृद्धपणामुळे चित्रेही कमीच चितारतात. पारंपरिक मिथिला शैलीत गोदावरी दत्त यांनी समुद्र मंथन, त्रिशूल, वासुकी नाग, अर्धनारीनटेश्वर, डमरु, बोधीवृक्ष आदी अनेक चित्रे काढली आहेत. १९६४-६५ सालापासून या क्षेत्रात काम करणार्‍या आणि कित्येकवेळा कला अकादमी वगैरे संस्थांना दिलेल्या निमंत्रणावरुन निरनिराळ्या देशांचेही त्यांनी दौरे केले आहेत. बिहार संग्रहालयात गोदावरी यांनी चितारलेले एक भव्य असे मिथिला शैलीतील चित्र आहे. तसेच जपानच्या मिथिला संग्रहालयातही त्यांची चित्रे आहेत. १९७३ साली गोदावरी यांना बिहार सरकारने सन्मानित केले, तर तत्कालीन राष्ट्रपती निलम संजीव रेड्डी यांनीही त्यांचा गौरव केला. ‘पद्मश्री’ मिळाल्यानंतर त्या म्हणाल्या की, “पुरस्कारासाठी मी कधी चित्रे चितारली नाहीत, तर केवळ कलेची साधना केली व गौरव होत गेला...”

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat