इराकमध्ये बोट बुडून १०० जणांचा मृत्यू

22 Mar 2019 10:46:08


मोसुल : इराकच्या मोसूल शहरानजीक टिगरीस नदीत फेरीबोट बुडून सुमारे १०० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कुर्द नववर्ष साजरे करत असताना ही दुर्घटना घडली आहे. इराकच्या इतिहासातील ही सर्वात मोठी दुर्घटना आहे. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.

दरम्यान, घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या घटनेनंतर इराकचे पंतप्रधान अदेल अब्दुल महदी यांना तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच त्यांनी या घटनेची चौकशीचे आदेश दिले असून तपास सुरू करण्यात आला आहे.


इराकमध्ये कुर्द नववर्ष साजरे केले जाते. नवरोज कुर्द नववर्षासाठी पुरूष
, महिला आणि मुले मोठ्या संख्येने पर्यटनस्थळी जाण्यासाठी फेरीबोटीतून निघाले. त्यावेळी टिगरिस नदी ओलांडताना बोट बुडल्याची दुर्घटना घडली. बोटीमधून क्षमतेपेक्षा अधिक लोक प्रवास करत असल्याने ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

यातील आतापर्यंत ५५ लोकांना वाचविण्यात यश आले आहे. मृतांमध्ये ६१ महिला आणि १९ लहान मुलांचा समावेश आहे. ही एक मोठी दुर्घटना आहे. असे घडेल असे कोणालाही वाटले नव्हते, असे या दुर्घटनेतून वाचलेल्या एका व्यक्तीने सांगितले. नदीत पाण्याची पातळी वाढल्याने आणि बोटीत क्षमतेपेक्षा अधिक भार आल्याने ही दुर्घटना घडल्याचे एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले.

इराकमधील न्याय मंत्रालयाने, फेरी कंपनीच्या नऊ अधिकाऱ्यांच्या अटकेचे आदेश दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्यामुळे मोसूल येथील धरणातून टिगरिस नदीत पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदी काठावरील लोकांना सावधानतेचा इशारा दिला होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0