मुलांचं भावविश्व जपणारे ‘लव्हली टॉईज’

    दिनांक  21-Mar-2019    


खेळण्यांविषयी लहान मुलांना एक वेगळंच आकर्षण असतं. अलीकडे मात्र या खेळण्यांची जागा डिजिटल खेळण्यांनी घेतलेली दिसते. ही खेळणी म्हणजे या लहान मुलांची निरागसता होती, जी काळाच्या ओघात लोप पावते की काय अशी भीती वाटते. मात्र, ‘लव्हली टॉईज’ने मुलांमधलं हे बालपण जपलं. ती निरागसता जपली आहे आणि ते सुद्धा तब्बल तीन दशके. कारण, निव्वळ व्यावसायिक नफ्यासाठी खेळणी बनविणे, हा या कंपनीचा उद्देश नाही तर मुलांनी त्यांच्या निरागस बालपणाला जपावं, हाच उदात्त हेतू यामागे आहे. हे तत्त्व जपणार्‍या आणि या तत्त्वालाच आपल्या कंपनीची संस्कृती म्हणून आकार देणार्‍या या ‘लव्हली टॉईज’च्या संचालिका आहेत नीना पानगावकर.

 

कांतीलाल आणि कमल या गांधी दाम्पत्याच्या पोटी नीना यांचा जन्म झाला. बाबा बजाज कंपनीत कार्यरत होते. एक भाऊ आणि तीन बहिणी असा भावंडांचं छान जग होतं. पुढे भाऊ शल्यविशारद झाला, तर नीनाने पुण्याच्या मॉडेल कॉलेजमधून ‘स्टॅटिस्टिक्स’ या विषयातून एमएस्सी पूर्ण केलं. १९८६च्या दरम्यान तिचं प्रफुल्ल पानगावकर या सालस आणि उच्चशिक्षित तरुणाशी विवाह झाला. नीना गांधींची ‘नीना पानगावकर’ झाली. दरम्यान, नीनाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. गौतम त्याचं नाव. एक परिपूर्ण आयुष्य झालं. मात्र, दीर्घोद्योगी नीनाला काहीतरी स्वत:चं करायचं होतं. त्यातून वरळीला तिने सॉफ्ट टॉईज बनविण्याच्या क्लासमध्ये प्रवेश घेतला. जात्याच हुशार असल्याने तिने ती कला लगेच आत्मसात केली. ती छान-छान सॉफ्ट टॉईज बनवू लागली. याचवेळी तिची ओळख डॉ. अरुणा कलगुटकर यांच्याशी झाली. सॉफ्ट टॉईजला व्यावसायिक स्वरूप कसं द्यावं, याचे धडे त्यांनी नीनाला दिले. दरम्यान एका प्रदर्शनात तिने भाग घेतला. तिथे तिने तयार केलेल्या सॉफ्ट टॉईजना नावाजलं गेलं. काही खेळणी विकली गेली. तिचा उत्साह अधिकच दुणावला.

 

सासरच्या मंडळींचा भरघोस पाठिंबा असल्यामुळे नीनाताई जोमाने काम करीत होत्या. सासर्‍यांची गिरगावला एक जागा होती. या जागेत त्या सॉफ्ट टॉईज तयार करू लागल्या. उत्पादन तयार करण्याचा अनुभव त्यांना मिळाला. मात्र, ही उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विपणन, विक्री या गोष्टींचं ज्ञान आवश्यक होतं. याकरिता त्यांनी त्या पद्धतीचे ज्ञान देणारे काही कोर्सेस केले. टॉईज असोसिएशनचे सदस्यत्व घेतले. निर्यातीचे प्रशिक्षण घेतले. त्यांना चांगले विक्रेतेही मिळाले. ‘लव्हली टॉईज’चे सॉफ्ट टॉईज आता मॉलमध्ये उपलब्ध होऊ लागले. कामाचा पसारा वाढल्याने त्यांनी माहीमला आपला खेळण्यांचा कारखाना हलवला.

 

अवघ्या १० हजारांमध्ये सुरू झालेला हा व्यवसाय आज अनेक महिलांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार देत आहे. नीनाताईंचे पती प्रफुल्ल पानगावकर हेदेखील निवृत्तीनंतर पूर्ण वेळ ‘लव्हली टॉईज’मध्ये कार्यरत आहेत. त्यांच्यामुळे नीनाताईंचा उत्साह द्विगुणित झाला आहे. ‘लव्हली टॉईज’ची खेळणी आकर्षक आणि सुबक असतात. पाहताक्षणी ही खेळणी हातात घेण्याचा मोह आवरत नाही. या खेळण्यांचे डिझाईन्स नीनाताई आणि त्यांचे सहकारी तयार करतात. ही खेळणी ‘मेड इन इंडिया’ असल्याचा अभिमान असल्याचे पानगावकर दाम्पत्य म्हणतात.

 

सध्या त्यांनी शैक्षणिक खेळणी तयार करण्यावर जास्त भर दिला आहे. मुलांना खेळण्यातून आनंद मिळाला पाहिजे आणि सोबतच त्यांना त्यातून काहीतरी शिकायला मिळावं, हा या दाम्पत्याचा उद्देश. सर्वसामान्यांना परवडणार्‍या दरात म्हणजे अगदी १५० रुपयांपासून ही खेळणी उपलब्ध आहेत. ‘लव्हली टॉईज’ची ही खेळणी मुंबई, महाराष्ट्रासह गोवा, बंगळुरू, हैदराबाद येथेदेखील उपलब्ध आहेत.

 

मुलांनी मोबाईल, व्हिडिओ गेम्स सारख्या खेळांकडे न वळता निरागसता जपणारे खेळ खेळावेत हा आमचा हेतू आहे. वयाच्या या टप्प्यावर व्यावसायिक नफा न कमावता खेळण्याद्वारे मुलांचं बालपण सकस व्हावं हा आमचा उद्देश आहे,” असं नीना पानगावकर सांगतात. सातत्य, चिकाटी, अभ्यासू वृत्ती या गुणांमुळेच गेली तीस वर्षे नीनाताई या व्यवसायात टिकून आहेत. व्यवसाय करण्यामागे जर उदात्त हेतू असेल, त्यासोबत नैतिक अधिष्ठान असेल तर तो व्यवसाय भरभक्कमपणे आपली मुळं घट्ट रोवून उभा राहतो. ‘लव्हली टॉईज’ याचं उत्तम उदाहरण आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat