राष्ट्रीयत्व जोपासणारे पूर्वांचल केंद्र

    दिनांक  02-Mar-2019   

 

 
 
 
 
भारताच्या नकाशावर उगवत्या सूर्याच्या दिशेला असणाऱ्या पूर्वांचलमध्ये काश्मीरसारखी समस्या निर्माण होऊन हा प्रदेशदेखील विविध विवंचना आणि समस्या यांनी ग्रासला जाऊ नये यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दूरदृष्टीचा विचार केला आणि आपल्या येथील कार्याचा आदर्श वस्तुपाठ आजमितीस समाजासमोर उभा केला आहे. रा. स्व. संघाच्या जनकल्याण समितीच्या माध्यमातून पूर्वांचलमध्ये राष्ट्रीय एकात्मता व अखंडता यांचे बीजारोपण व्हावे यासाठी कार्य हाती घेण्यात आले व यासाठी रा. स्व. संघाने पूर्वांचलमधील सातही राज्ये भारतातील इतर राज्यांनी दत्तक घ्यावी, अशा स्वरूपाची संकल्पना मांडली. त्यानुसार महाराष्ट्र राज्याने पूर्वांचलमधील मेघालय व मिझोराम ही राज्ये दत्तक घेतली आहेत. त्या राज्यांतील भावी पिढी ही राष्ट्रप्रेम आणि सामजिक एकता यांचे संस्कार घेऊन पुढे जाणे हे समस्या निवारणासाठी आवश्यक असल्याचे रा. स्व. संघाने जाणले व त्याच दृष्टिकोनातून पूर्वांचलमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे संपूर्ण दायित्व रा. स्व. संघाच्या माध्यमातून घेण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील १० ठिकाणी पूर्वांचलमधील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
 

नाशिकमध्ये पूर्वांचलमधील मुलींना शिक्षण देणारे पहिले केंद्र सुरू करण्यात आले. रा. स्व. संघाचे माजी जिल्हा कार्यवाह बन्सी जोशी यांनी माहिती देताना सांगितले की, “या केंद्राची क्षमता १५ मुलींना शिक्षण, निवास व इतर सुविधा उपलब्ध करून देण्याची आहे. या केंद्रात १९९७ मध्ये जैंतिया आणि खासी या जमातीच्या १५ मुलींनी मेघालय येथून प्रवेश घेतला. येथे दाखल होणाऱ्या मुलींना ४ थी ते १२ वी. पर्यंतचे शिक्षण उपलब्ध करून दिले जाते. येथील केंद्राच्या कार्याला प्रकल्प प्रमुख रत्ना पेठे, व्यवस्थापिका शुभांगी बागुल, गिरीश वैशंपायन, सुनील कुळकर्णी, प्रकाश देशमुख, राहुल काळकर, केळकर, वर्तक आदींचे पाठबळ प्राप्त होत आहे.

 

विद्यार्थ्यांमध्ये बालपणीच राष्ट्रीयत्वाचे स्फुल्लिंग जागृत व्हावे व त्यांच्यात राष्ट्रीय अखंडतेचे विचार निर्माण व्हावे, या विचार धारणेतून हाती घेतलेल्या या कार्याला दैवयोगाने शैक्षणिक साथदेखील अशाच विचारांची जोपासना करणाऱ्या संस्थेने दिली. ती म्हणजे नाशिक येथील मध्यवर्ती हिंदू मिलिटरी शिक्षणसंस्था. रूढ अर्थाने ही संस्था भोसला या नावे सुपरिचित आहे. या संस्थेच्या विद्या प्रबोधिनी प्रशाला (इंग्रजी माध्यम) या शाळेत येथील विद्यार्थिनी आज शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. गेल्या २० वर्षांत या केंद्रातील एकही विद्यार्थिनी १० वी व १२ वी ला अनुत्तीर्ण झालेली नाही, हे विशेष. या मुली येथील उत्तम व दर्जेदार शिक्षण घेऊन आपल्या मूळ गावी परत गेल्या आहेत व तिथे त्यांनी आपले काम मोठ्या जोमाने सुरू केले आहे. या केंद्राच्या माध्यमातून शिक्षण घेतलेल्या अनेक मुली या आजमितीस डॉक्टर, वकील, शिक्षिका या पेशात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवत आहेत. या केंद्राच्या माध्यमातून शिक्षण व संस्कार यांची शिदोरी प्राप्त केलेली ऍम सिअर ही विद्यार्थिनी वैद्यकीय अधिकारी म्हणून आपली सेवा बजावत आहे तर डेलीना ही विद्यार्थिनी कायद्याच्या क्षेत्रात आपले वकिलीचे कर्तव्य पार पाडत आहे.

 

नाशिक येथील पूर्वांचल केंद्र व पूर्वांचल येथील विद्यार्थी यातील दुवा रा. स्व. संघ आहे. त्यामुळे संघ कार्यावर विश्वास ठेऊन या विद्यार्थिनींचे पालक एवढ्या दूर अंतरावर या विद्यार्थिनींना नाशिक येथे पाठवत असतात. हे संघकार्यावरील सामाजिक विश्वासाचे फलित म्हटले तर वावगे ठरणार नाही. रा. स्व. संघाच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या या कार्याचा विस्तार व्हावा व या कार्याची माहिती तेथील नागरिकांना व्हावी याकरिता नाशिकमधून स्वप्नील शेरमाळे व प्रवीण शेवाळे हे दोन प्रचारक तेथे एक दशकापासून कार्यरत आहेतनाशिक येथील मेघालयातील विद्यार्थिनी वर्षातून एकदा त्यांच्या घरी जात असतात. मात्र, याकामी देखील येथील पूर्वांचल केंद्र आपली पालकत्वाची भूमिका मोठ्या जबाबदारीने निभावत असते. येथील विद्यार्थिनींना नाशिक ते मेघालयात त्यांच्या घरापर्यंत सोबत असते, ती येथील केंद्राच्या कार्यकर्त्यांची. तसेच या विद्यार्थिनींचा प्रवासखर्चदेखील नाशिक येथील केंद्राच्या माध्यमातून उचलण्यात येतो.

 

ईशान्य भारताचे भौगोलिक स्थान जगाच्या नकाशावर मध्यवर्ती आहे. त्यामुळे तेथील समाज हा राष्ट्रीय भावनेने जागृत असावा, तेथील पर्यटनस्थळांच्या माध्यमातून तेथील पर्यटन विकास वाढीस लागावा, तेथील मंदिरांच्या दर्शनाचा लाभ समस्त भारतीयांना व्हावा, अशा प्रकारची भावना येथे शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जागृत करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य येथील पूर्वांचल केंद्रामार्फत करण्यात येत आहे. सामाजिक दायित्वाच्या भावनेतून कार्य करणाऱ्या या केंद्रास आजमितीस गरज आहे ती स्वतःच्या जागेची. यासाठी आपण नाशिककरांनी नक्कीच पुढाकार घ्यावयास हवा.

 

पूर्वांचलसाठी रा.स्व. संघाचे मोठे योगदान

 

साधारणतः ६० ते ७० वर्षांपूर्वी रा.स्व. संघाच्या लक्षात आले की, ईशान्य भारतात फुटीरतावादाला चालना मिळत असल्याने येथील स्थानिक जनता भरकटत आहे. त्यामुळे येथे राष्ट्रीय एकात्मता व अखंडता निर्माण व्हावी यासाठी कार्य करण्यास सुरुवात केली. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे काही काळ अध्यापनाचे कार्य केलेले भैयाजी काणे हे प्रचारक म्हणून पूर्वांचलमध्ये दाखल झाले.त्यांनी तेथील नागरिकांची मने जिंकली व काणे यांनी अगदी सुरुवातीच्या काळात तेथील विद्यार्थ्यांची वैयक्तिक बळावर महाराष्ट्र व कर्नाटक येथे शिक्षणाची सोय केली. तेथपासून खऱ्या अर्थाने या प्रवासाचा शुभारंभ झाला. त्यानंतर वनवासी कल्याण आश्रम, विवेकानंद केंद्र, अभाविप या संघटनांच्या माध्यमातूनदेखील येथे मोठ्या प्रमणात कार्य करण्यात आले आहे. काही प्रचारकांच्या येथे कार्य करत असताना हत्यादेखील झाल्या. मात्र ‘अविरत श्रमणे, संघ जिणे’ या पद्य ओळीप्रमाणे रा. स्व. संघ तेथे अविरत आपले योगदान देत आहे व देत राहील.

 

संघ प्रचारकांचे कार्य खूप मोठे

 

"रा. स्व. संघ खूप मोठे काम करत आहे. कोणताही मोबदला न घेता संघ प्रचारक आत्मीय भावनेने कार्य करत आहेत. असे काम मेघालयात पाहावयास मिळत नाही. असे काम आणि येथील मोठे उद्योग हे मेघालयाच्या धरतीवर उतरविण्याचे काम मला करायचे आहे."

- माईलसी लीन वान्या, विद्यार्थिनी

 
 

"आम्हाला इतर ठिकाणी नेपाळी, चिनी संबोधले जाते. मात्र आम्ही भारतीय आहोत. स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी या केंद्राने दिली आहे."

- किनिता खारलाईत, विद्यार्थिनी

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat