आरोग्यवसा जपणारे ‘जयंम फाऊंडेशन’

    दिनांक  19-Mar-2019   जयकुमार टिबरेवाल यांच्या सामाजिक विचारांचा वारसा घेऊन काही वर्षांपूर्वीजयंम फाऊंडेशन या संस्थेची सुरुवात करण्यात आली. पर्यावरण आणि आरोग्य या क्षेत्रात या संस्थेच्या माध्यमातून कार्य केले जाते. पाणी या जीवनमूल्य घटकाचा विचार हवा तितका होत नसल्याने आरोग्याचे अनेक गंभीर प्रश्न उभे राहतात. हे संस्थेच्या लक्षात येताच जयम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना बरोबर घेऊन १७ गावातील पाणीपुरवठा हा शुद्ध असावा, यासाठी कार्य करण्यात आले.

यासाठी पाणीपुरवठा करणार्‍या पाण्याच्या टाकीलाच आरओ प्लांट्स लावण्यात आले. तसेच, बँक एटीएम कार्डच्या धर्तीवर पाण्याचे एटीएम कार्ड गावकर्‍यांना दिले गेले. त्या माध्यमातून स्वच्छ पाणी, आरोग्यदायी जीवन हा मूलभूत हक्क उपलब्ध करून देण्यात संस्थेचे योगदान निश्चितच वाखाणण्याजोगे आहे. आजमितीस सुमारे आठ हजार कुटुंबांपर्यंत शुद्ध पाण्याचा प्रवाह संस्थेच्या माध्यमातून प्रवाहित करण्यात आला आहे. त्यामुळे या कुटुंबांचे आरोग्य अबाधित राहण्यास मदत होत आहे. या सुविधेद्वारे केवळ ५ रुपयांत २० लिटर पाणी उपलब्ध होत आहे. तसेच या निधीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीद्वारे गाव विकास केला जात आहे. लहवित ग्रामपंचायत क्षेत्रात या माध्यमातून दरमहा रुपये एक लाखापेक्षा अधिक निधी संकलित होत असून ग्रामपंचायतीचे सक्षमीकरण होत आहे. तसेच, भूसंधारणकामी या माध्यमातून बाहेर पडणार्‍या टाकाऊ पाण्याच्या माध्यमातून जयम फाऊंडेशनद्वारे वनसंवर्धनाचे सामाजिक कार्यदेखील केले जात आहे. वृक्षसंवर्धनाच्या क्षेत्रात कार्य करताना मौजे रोहिले येथे पश्चिम महाराष्ट्र वनविभागाच्या अखत्यारितील १७५ एकर जमिनीवर ५२ प्रजातींची वृक्षलागवडदेखील करण्यात आली आहे. वणवा पेटून खाक झालेल्या या जागेवर आजमितीस १७ हजार वृक्षांची पुनर्लागवड करण्यात आली आहे. तसेच, भविष्यात अशी दुर्घटना घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक संरक्षक उपाय म्हणून फायर लाईनचे काम सध्या येथे चालू आहे.
 

आजमितीस संस्थेच्या माध्यमातून वाघेरा, जाखोरी, लहवित, त्र्यंबक, अंदरसूल आदी भागांत वनसंवर्धनदेखील करण्यात येत आहे. तसेच, ग्रामीण भागाचा आणि गावातील प्रत्येक घटकाचा विकास व्हावा या हेतूने जयम फाऊंडेशनने प्रस्तावित ग्रामवन विकास अंतर्गत, जाखोरी ग्रामपंचायतीसमवेत सामंजस्य कराराच्या अनुषंगाने पर्यावरणपूरक काम हाती घेतले आहे. येथील ३५ एकर जागेवर आर्थिक उत्पन्न देणारी वनसंपदा साकारण्यात आली आहे. कोसवन, रगत विहीर, जाखोरी या गावांना बांधावरच्या शेतीसाठी आंबे आणि सागाच्या दहा हजारांहून अधिक रोपांचे वाटप करण्यात आले आहे. वीसपेक्षा जास्त आश्रमशाळांना आणि ग्रामपंचायत यांनादेखील रोपांचे वाटप केले आहे. तसेच दारणा धरण, काश्यपी धरण येथे पाटबंधारे विभागासोबत करार करून पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामवनाचा प्रयत्न केला जात आहे. आतापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त वृक्षलागवड या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

तसेच, यासाठी ७५ लाख रुपयांचा निधी उभा करण्यात आला. या निधीतून आनंदवन येथे २० ते २२ एलपीजी सिलेंडर्सची दैनंदिन भूक असलेल्या मेगा किचनशेजारी मेगा बायोगॅस प्लांट संस्थेच्या माध्यमातून उभा करण्यात आला आहे. यामुळे आनंदवनाचे मेगा किचन कायमच एलपीजीमुक्त झाले आहे. यामुळे आनंदवनची वर्षाकाठी ७० लाख रुपयांची बचत होत आहे. मराठवाड्यातील दुष्काळ स्थिती लक्षात घेऊन भविष्यात परभणी जिल्ह्यातील माजलगाव येथे कम्युनिटी किचन लवकरच सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. नाशिक येथील बेजॉन देसाई यांनी नेहमीच मानवी उत्क्रांतीचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिले. त्यांची हीच प्रेरणा घेऊन बेजॉन देसाई फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली.


समग्र शिक्षण तर सक्षम भारतया दृष्टीतून बेजॉन देसाई फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांच्या समग्र शिक्षणाकडे लक्ष देणारे सक्षम प्रशिक्षक घडवण्यावर बेजॉन देसाई फाऊंडेशन प्रयत्नशील आहे. त्यासाठी अरबिन्दो सोसायटी पाँडेचरी येथे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील शैक्षणिक निष्ठा असलेल्या १७ शिक्षक आणि इतर व्यक्तींना ‘समग्र शिक्षण’ या विषयावर सात दिवस रहिवासी प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून देण्यात येत आहे. मराठवाड्यातल्या दुष्काळामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खूप परिणाम व्हायचा, म्हणून संस्थेमार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या १६२ विद्यार्थ्यांची ५ महिन्यांसाठी दि. १५ डिसेंबर, २०१५ ते १५ मे, २०१६ पर्यंत रोजच्या जेवणाची सोय करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करू शकले.

 

 
 

निराधार मुलींना आश्रय देणारे महाराष्ट्र शासन संचालित अनुरक्षण गृह उभारण्यात आले. इथल्या अनेक मुलींना नर्सिंगचे पूर्णवेळ प्रशिक्षण देण्यात आले. याद्वारे एकूण ४९ विद्यार्थिनी शिक्षणाचा लाभ घेत आहेत. तसेच, ज्याचे वडील रिक्षाचालक आहेत आणि आई डबे बनवून उदरनिर्वाह करतात, त्यांचा मुलगा रोहित शिंदे याच्यासह, मानसी मदन मोहन आदी विद्यार्थ्यांनी परदेशात जाऊन व हवाईसुंदरी या क्षेत्रात आपले कार्य सुरू केले आहे. भविष्यात १० आदिवासी आश्रमशाळांकरिता कौशल्य विकासाचे पायलट प्रोजेक्ट, एज्युकेटर अकादमी, शेतीपूरक अभ्यासक्रम, कृषितज्ज्ञांच्या मदतीने शेतीव्यवसायपूरक शिक्षण देण्याचा संस्थेचा मानस आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat