हवा बदलणारी ग्रेटा...

    दिनांक  19-Mar-2019 20:33:15स्वीडनमधील ग्रेटाने टूनबर्ग हिला ‘अस्पर्जर सिंड्रोम’ हा आजार असतानाही तिने ‘पर्यावरण संवर्धना’साठी व ‘जागतिक तापमान वाढ रोखण्या’साठी स्वीडिश संसदेसमोर धरणे आंदोलन करून लोकचळवळ उभारली. त्याच्याविषयी...


लहानपण हे खेळण्या-बागडण्याचे वय. मित्र-मैत्रिणींसोबत धमाल करण्याचे दिवस. पण, या बालपणातही काही मुले असे कार्य करतात की, जे मोठ्या व्यक्तींनाही जमत नाही. जगासमोर आज अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. हवामानातील बदल हे त्यापैकीच एक. याबाबत अनेक देशांमध्ये परिषदा होतात, चर्चा होतात, ठरावही मंजूर होतात. नंतर काही देश पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेतात, तर काही विरोधात भूमिका घेतात. जागतिक स्तरावरही याकडेही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असताना अमेरिकासारखा मोठा देश यातून काढता पाय घेतो. पण, अशाच या गंभीर विषयाकडे एका युवतीने आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. स्वीडनमधील १६ वर्षांची ग्रेटा टूनबर्ग या युवतीनेहवामानातील बदल आणि जागतिक तापमान वाढ’ या पर्यावरणीय समस्येवर आंदोलन छेडले आहे. आज त्या आंदोलनाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले असून तिच्या या पुढाकारबद्दल तिचा गौरव करण्यात येणार आहे. ग्रेटाच्या आंदोलनाची दखल घेत तिचे नामांकन शांततेसाठीच्या नोबेल पुरस्कारासाठी करण्यात आले आहे. यासाठी नॉर्वेतील तीन खासदारांनी तिची शिफारस केली आहे.

जर ग्रेटाला हा पुरस्कार मिळाला, तर सर्वात कमी वयात शांततेचा नोबेल पुरस्कार मिळणारी ग्रेटा ही पहिली मुलगी ठरेल. कारण, पाकिस्तानच्या मलाला यूसुफजईला वयाच्या १७ व्या वर्षी नोबेलने सन्मानित करण्यात आले, पण ग्रेटा ही सध्या १६ वर्षांची आहे. ग्रेटाने या नामांकनाबद्दल आभार व्यक्त केले असून ती म्हणते की, “हवामानातील बदल रोखण्यासाठी आपण जर काहीच केले नाही, तर त्यातून युद्ध, संघर्ष आणि निर्वासितांच्या समस्या उभ्या राहणार आहेत.” म्हणूनच ग्रेटाने एक मोठी लोकचळवळ उभी केली. शांततेसाठी तिचे हे एक योगदानच आहे. ग्रेटाने ट्विटवर स्वत:ची ओळख ‘१६ वर्षांची पर्यावरणप्रेमी कार्यकर्ती’ अशी करून दिली आहे. तिला ‘अस्पर्जर सिंड्रोम’ हा आजार असल्याचेही ग्रेटाने म्हटले आहे. गेल्या वर्षी तिने पर्यावरण संवर्धनाकरिता व जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी ’स्कूल स्ट्राईक’ करून स्वीडिश संसदेसमोर धरणे आंदोलन केले. या कामात ग्रेटाला इतर विद्यार्थ्यांचीही साथ लाभली. या सर्वांनी मिळून या अभियानाचे समर्थन केले होते. इतकेच नाही, तर हे अभियान यशस्वी करण्यासाठी १६ वर्षीय या मुलीने शाळेत जाणेही बंद केले होते. त्यानंतर तिने दर शुक्रवारी सतत आंदोलने केली आहेत, त्यामुळे वर्षभरात अनेक शुक्रवार ती शाळेतही जाऊ शकलेली नाही.शेवटी ग्रेटाची मेहनत सफल झाली. त्यानंतर हे अभियान केवळ युरोपातच नाही, तर जगभरात चर्चेचा विषय ठरले.

 

 

ग्रेटाने डिसेंबर २०१८ मध्ये पोलंडमध्ये झालेल्या ‘हवामान बदल परिषदे’मध्ये ग्लोबल वॉर्मिंगबाबत जबरदस्त भाषण दिलं होतं. ग्रेटाचं वय पाहता, भलेही तिला जगाची पूर्ण समज नसावी, पण जागतिक तापमान वाढीचे विचार इतरांपेक्षा फार वेगळे आणि मोठे आहेत. नोबेलसाठी नामांकन मिळालेल्या ग्रेटाचं म्हणणं आहे की, “आपण सर्वांनीच जमिनीखालील तेल आणि खनिजांना सुरक्षित ठेवण्याची गरज आहे. तसेच जगात आपल्याला समानता आणण्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. जर आपण व्यवस्थेच्या आत राहून समाधान शोधू शकत नाही, तर आपण पूर्ण व्यवस्था बदलायला हवी.” इतकेच नाही, तर जागतिक तापमान वाढीच्या विषयावर ग्रेटाने भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे कठोर पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.

 

ग्रेटाच्या या आंदोलनाला ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा, जपान एवढेच नाही, तर अमेरिका आणि इंग्लंडच्या विद्यार्थ्यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. दावोसच्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये तिने हवामान बदलावर तिची स्पष्ट भूमिका मांडली. “हवामानातील बदल या विषयाच्या बाबतीत आपण अपयशी ठरलो आहोत, हे मान्य करावं लागेल,” असं ती म्हणाली. या आंदोलनामुळे आंतरराष्ट्रीय माध्यमांनी तिची दखल घेतली आहे. ग्रेटाच्या आंदोलनाला Fridays For The Future' असे नाव मिळाले असून, हे आंदोलन विविध देशांत पोहोचले आहे. जर्मनी, बेल्जियम, ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि जपानमध्येही आंदोलने झाली आहेत. जवळपास १०० देशांत हे आंदोलन होत आहे. ‘हवामानातील बदल’ रोखण्यासाठी सध्या होत असलेले प्रयत्न अतिशय तोकडे असून, या समस्येचा गांभीर्याने विचार करावाच अन्यथा वेळ निघून गेलेली असेल, असा इशारा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गट्रेस यांनी पोलंड हवामान परिषदेत दिला होता. पृथ्वीच्या केवळ एक अंश तापमानवाढीने काही ठिकाणी पूर, काही ठिकाणी दुष्काळ, काही ठिकाणी वणवे, पिकांची हानी व वादळे, सागराची वाढती पातळी असे प्रकार होत आहेत. त्यामुळे आताच प्रदूषण व इतर घातक कृती रोखल्या नाहीत, तर पृथ्वीची अवस्था आणखी वाईट होऊन मग त्यातून बाहेर पडणे कठीण होणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या एका समितीने याबाबत ऑक्टोबरमध्ये धोक्याचा इशारा दिला होता. असे असताना पॅरिस हवामान करारातून अमेरिकेने माघार घेतल्याने आधीच हवामानातील बदल रोखण्यासाठीच्या प्रयत्नांना मोठा फटका बसला आहे. एकीकडे मोठे देश या महत्त्वाच्या प्रश्नांतून काढता पाय घेत आहेत, तर ग्रेटाने लोकचळवळ उभी करून जगाचे याकडे लक्ष वेधले आहे.

 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat