‘ती’ची भरारी मंगळावर

18 Mar 2019 13:44:35

 

 
 
 
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अनेकांनी महिलांचे सशक्तीकरण, महिला हक्क, आरोग्य, सुरक्षा, समानता आदींवर आपापली मते समाज माध्यम, सामाजिक कार्यक्रम, वृत्तपत्रीय लेख आणि इतर व्यासपीठांवर मांडली. हा होऊ घातलेला बदल जरी कौतुकास्पद असला तरी एकविसाव्या शतकाचे दुसरे शतक उलटूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेले महिला सशक्तीकरणाचे प्रयत्न आजही कमी पडतानाच दिसतात. समाजमाध्यमांमुळे या मोहिमा अधिक तीव्र झाल्या असतीलही मात्र, दरवर्षात महिलांविषयीच्या सुधारणा करताना आपण पुढे आलो की अजूनही मागचीच री ओढली जाते, याचाही विचार व्हायला हवा. याच महिन्यात आलेली अमेरिकेच्या अंतराळ संशोधनातील बातमी समाधानकारक आणि सुखावणारी आहे. चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारा मानव म्हणून जसा नील आर्मस्ट्राँगने इतिहास रचला तसाच इतिहास आता एका महिलेच्या नावे रचला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, अशी माहिती ‘नासा’ संस्थेचे प्रशासक जिम ब्रायडेनस्टीन यांनी दिली. त्यामुळे एकेकाळी केवळ चूल आणि मूल सांभाळणारी ‘ती’ आता मंगळावर झेप घेईल.
 

विज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयीचा ‘सायन्स फ्रायडे’ या रेडिओ टॉक शोमध्ये त्यांनी ही माहिती दिली. मंगळावर पाऊल ठेवणाऱ्या या महिलेचे नाव तूर्त सांगितले नसले तरीही मोहिमेत महिला महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी सांगितल्याने जगाचे लक्ष याकडे लागले आहे. या संपूर्ण मोहिमेत महिलांचा मोठा हातभार असणार असल्याचेही त्यांनी सांगितलेया महिन्यात एक महिला ‘स्पेसवॉक’ करणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. मंगळयानाव्यतिरिक्त अंतराळ मोहिमेतही महिलांचा मोठा सहभाग असणार आहे. नासासारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थेतर्फे महिलांना सोबत घेऊन काम करण्याबाबतची भूमिकाही गौरवास्पद आहे. नासामध्ये पहिली महिला १९७८ मध्ये रूजू झाली. त्यानंतर सहा महिला, असा प्रवास करत सद्यस्थितीत एकूण ३४ टक्के महिला नासाच्या अनेक अंतराळ मोहिमांमध्ये काम सांभाळत आहेत.

 

भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’चीही कामगिरी याबाबत अभिमानास्पद आहे. ‘मंगळयान २’ या मोहिमेवर काम करणाऱ्या २२ वर्षीय आयुषी मालवीय हिची कामगिरीही उल्लेखनीय आहे. गेली दीड वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे आणि एकाग्रतेने ती या मोहिमेवर काम करत आहे. चंद्राला मुठीत घेऊ इच्छिणाऱ्या या मुलीने भारताचे माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यापासून प्रेरणा घेत या क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांची भेट घेतल्यानंतर आपले आयुष्यच बदलून गेले, असे सांगणाऱ्या आयुषीचा जीवनप्रवास इतरांसारखाच खडतर आहे. सध्या ती मंगळयान, चांद्रयान २ आणि उपग्रहांसंबंधित कामही पाहत आहे.

 

दीड वर्षांपासून अहमदाबाद येथील स्पेशल अॅप्लिकेशन सेंटर येथे कार्यरत असणाऱ्या आयुषीला अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले. घरची परिस्थिती बेताची असूनही तिला आवडत्या क्षेत्रात करिअर घडवण्याची संधी देणाऱ्या तिच्या आई-वडिलांचाही तिच्या यशामागे मोलाचा वाटा आहे. वडील एका खासगी कंपनीत नोकरीला, आई शारदा मालवीय यांना बऱ्याच संघर्षानंतर एका शाळेत शिक्षिकेची नोकरी लागली मात्र, तिचेही सहा महिन्यांपूर्वी निधन झाले. आपल्या शेवटच्या काळातही त्यांनी शिकवणे सोडले नाही. कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा, डोईजड होण्यापेक्षा देशासाठी काहीतरी करावे, अशी शिकवण आयुषीला त्यांच्याकडूनच मिळाली आहे. अंतराळ क्षेत्रातील अशा ‘ती’च्या गगनभरारीत व्हॅलेन्टिना तेरेश्कावो, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, डॉ. शवना पांड्या आदी नावे प्रेरणादायी आहेत. जगभरात इतर क्षेत्रातीलही महिलांच्या योगदानाचा वाटा कालानुरूप वाढत गेला. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, प्रशासकीय सेवा, प्रसारमाध्यमे, सैन्यदल अशा सर्व क्षेत्रांत परमोच्च स्थानी पोहोचलेल्या महिलावर्गाच्या समस्या मात्र अजूनही त्याच आणि तितक्याच गंभीर का असाव्यात, याचाही विचार आपण ‘पहिला माणूस’ म्हणून करायला नको का? असा प्रश्न आजही आहे. तिने भरारी घेत अवघे जग तिच्या पंखाखाली आणले असले तरीही तिला पायाखाली बघणाऱ्यांच्या डोळ्यात एक नवद़ृष्टीरूपी अंजन घालण्याची गरज आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
Powered By Sangraha 9.0