अंधारलेल्या जगण्यातला सूर्य...

    दिनांक  18-Mar-2019   सूर्यकांत गायकवाड यांना समाजकल्याण खात्याचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार २०१९’ मिळाला. त्यांचे समरसता साधणारे विचार आणि कार्य महत्त्वाचे आहे.


“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतोस, कुठून पैसे येतात? कोण देतं पैसे? तू जातीचा माणूस असून संघाच्या मागे लागलास,” असे म्हणून ते सूर्यकांत गायकवाडांना मारायला धावले. बराच गोंधळ उडाला. सूर्यकांत पोलीस ठाण्यामध्ये गेले. त्यामुळे मारायला आलेली लोकं शांत झाली. हातापाया पडू लागली. साधारणत: १९९०चे साल होते ते. सूर्यकांत त्यांना म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते की, ‘परिस्थितीनुसार यशस्वी बदल करा.’ मी बाबासाहेबांच्या या विचारांनुसार जगतो. पूर्वी जातीयता होती, अस्पृश्यता होती, मंदिरबंदी, पाणवठाबंदी होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईने आज ही परिस्थिती पालटली आहे. काही लोक आपल्याला स्वीकारत नव्हते. पण आज अनेक लोक आपल्याला आपुलकीने सोबत घेत आहेत. त्यांना विरोध करण्यात काय हशील? बाबासाहेबांची समता पाळायची असेल, तर सगळ्या समाजासोबत चालायला हवे. मग त्यामध्ये नुसते नवबौद्धच नाही, तर देशातील सर्व धर्म आणि जाती येतील.”अर्थात, त्यानंतर ते लोकांनी सूर्यकांत यांना त्रास दिला नाही. ‘समरसता अध्ययन केंद्र,’ ‘समरसता मंच’ याचे पदाधिकारी असलेले सूर्यकांत गायकवाड. यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहिर झाला. तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या बौद्धाचार्य प्रशिक्षणामध्ये संपुर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे.

 

सूर्यकांत यांचे मूळ गाव साताऱ्यातील नांदवळ. वडील मोतीराम मुंबईला तारखात्यात चतुर्थ श्रेणी कामगार. आई हौसाबाई गृहिणी. आईच्या माहेरी आजी अनसुया आणि आजोबा चोखो जाधव यांनी सूर्यकांत यांना बालपणापासूनच स्वत:कडे ठेवले. ग्रामीण भागाचे समाजकारण आणि राजकारण सूर्यकांत यांना फार जवळून बघता आले. गावाच्या वेशीबाहेरचे अठराविश्वे दारिद्य्र असलेले घर. वयस्कर आजी-आजोबा दुसर्‍यांच्या शेतात मोलमजुरी करायचे. थोडी जमीन होती. पण तिचे उत्पन्न नसल्यातच जमा. एके दिवशी गावचे सरपंच सूर्यकांत यांच्या आजी-आजोबांच्या घरी आले. आजोबांना सांगू लागले, “रस्ता करण्यासाठी जमीन द्या. दिऊ तुम्हाला चांगला मोबदला. गावचं बी भलं हुईल.” आजी-आजोबांना वाटले, गावाच्या उपयोगाला पडू आणि आपलंपण भलं होईल. सरपंचाने स्वत:च्या गाडीतून त्यांना नेले. अशिक्षित आजी-आजोबांचे अंगठ्याचे ठसे उमटवले. आजीच्या छोट्या शेताचे दोन भाग झाले आणि मधून गावाकडे येणारा रस्ता तयार झाला. वर्षे गेली, सरपंच महाशय खासदारझाले पण, आजी-आजोबांना मोबदला मिळाला नाहीच.

 

या गोष्टीचा मोठा परिणाम सूर्यकांत यांच्यावर झाला. त्यांनी ठरवले की, आपण समाजातल्या लोकांमध्ये जागृती करायला हवी. पण घरी भाकरी मिळण्याची मुश्किल. मग वयाच्या ११व्या वर्षी ते खडी भरण्याचे काम करू लागले. मोलमजुरी करू लागले. तेवढाच घराला हातभार. हे सगळे करत असताना त्यांनी वाचनही सुरूच ठेवले. समाजात बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाई. पण वयाच्या बाराव्या वर्षी सूर्यकांत यांनी समाजाचे प्रबोधन केले की, आपण प्रतिघर एक-एक रुपया काढू. त्यातून समाजाला ज्ञान मिळेल, असे कार्यक्रम करू. दिवस जात होते. परिस्थिती बदलत नव्हती. सूर्यकांत दहावीत गेले. पण परीक्षा शुल्क भरण्यासाठी पैसे नव्हते. आजोबांनी मोलमजुरीच्या नावावरकर्ज काढले. सूर्यकांत यांनी ठरवले, हे दिवस बदललेच पाहिजेत. दहावीला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्येही सूर्यकांत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. दिवस बदलत होते आणि आई-वडिलांच्या सांगण्यानुसार, सूर्यकांत मुंबईला आंबेडकर महाविद्यालयात शिकण्याकरिता आले. त्या काळातही ते मोलमजुरी करत. पण बारावीच्या परीक्षेच्या वेळेस त्यांना अल्सरचा त्रास झाला. शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे ‘बारावी अनुत्तीर्ण’ शिक्का लागला. पण या कालावधीत ते एम्प्लॉयमेंटच्या कार्यालयात नेहमी जात. तिथे त्यांना सांगण्यात आले की, तू ग्रंथपालाचा कोर्स कर. नोकरी लागू शकते. त्या काळात सूर्यकांत साड्या विकण्याचा धंदा करायचे. वेळात वेळ काढून त्यांनी ग्रंथपालाचा कोर्स केला.

 

याच काळात त्यांच्या एका नातेवाईकाला समता परिषदेच्या भाई गिरकरांनी बँकेमध्ये नोकरी मिळवून दिली. त्या नातेवाईकाने सूर्यकांत यांना सांगितले की, ‘भाई गिरकरांना भेट. बघ, ते नक्की काहीतरी मदत करतील.’ भाई गिरकरांना भेटल्यानंतर सूर्यकांत यांच्या मनातील समाजसेवेची इच्छा पुन्हा उफाळून आली. याच दरम्यान त्यांना ‘बेस्ट’मध्ये वाहकाची नोकरीही लागली. समता परिषदेच्या माध्यमातून समाजजागरण सुरू होते. पुढे रमेश पतंगे यांच्याशी भेट झाली. समता समरसतेचे कार्य करताना विचाराच्या कक्षा रूंदावल्या होत्या. रा. स्व. संघाच्या मदतीने लहान तीन भावांनाही चांगली कायमस्वरूपी नोकरी मिळवून दिली. घरच्या जबाबदाऱ्या होत्या. त्या सांभाळत समाजाच्या जागृतीचे काम केले. आजीच्या पसंतीच्या लता नावाच्या मुलीशी विवाह केला. ते आई-वडिलांना पसंत पडले नाही. त्यामुळे घरगुती कलह सुरू झाला. पण पत्नी लताने ठाम साथ दिली. सूर्यकांत यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि पुढे एम. लिब.-मास्टर्स ऑफ लायब्ररी सायन्सचे शिक्षणही घेतले. आज २५ वर्षे ते सामाजिक चळवळीत आहेत. विद्रोहाचा मार्ग न स्वीकारता समन्वय साधा, असा मंत्र समाजाला देत आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat