आता वाजले की बारा!

    दिनांक  18-Mar-2019   

 

 
 
 
ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी

घड्याळ माझा साथी

भेटीत तृष्टता मोठी

कितीदा गोंधळलो, कितीदा बडबडलो

जुन्या जिंकण्याच्या आठवणीमध्ये

पुन्हा पुन्हा बडबडलो

ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी

 

कसे ऋणानुबंध जुळतील सांगता येत नाही. त्याकाळी मी असा उठलो काहीतरी नवनिर्माण करण्यासाठी. तेव्हा त्यांनी उपदेश केला नेता बनायचे असेल तर पहाटे लवकर उठायची सवय लाव. जगदंबे शपथ, मायमराठी शपथ तेव्हापासून त्यांचे घुबडासारखे माफ करा घारीसारखे बारीक लक्ष माझ्याकडे होते. सख्ख्या काकांनी मला राजगादी दिली नाही. लोक म्हणतात, बरे झाले, नाही दिली. नाही तर आज काकांच्या कर्तृत्वाची निशाणी असलेली सेना मी घड्याळावरहुकूम दावणीला लावली असती. जाऊदे तर काय सांगत होतो की, सख्ख्या काकांनी मला राजगद्दी दिली नाही. मग मी काय करावे? अहाहा! त्यावेळी काका घड्याळ घेऊन मला वेळ दाखवायला आले होते. पण आम्ही कुणाला सांगितलेच नाही की, इंजिनाची चावी घड्याळामध्ये आहे ते. काका मला वाचवा, हा जुना डायलॉग झाला. आता नवा डायलॉग, काका मला तुमच्यात घ्या. हा डायलॉग फेमस आहे, एकदम माझ्या ब्लू प्रिंट सारखा. काय म्हणता, कार्यकर्ते काय विचार करतील? काय विचार करतील, घर की खेती आहे. कच्चे मडके आहेत, जसे वळवावे तसे वळतील हो. हो कच्चा लिंबू आहेत. जसे खेळवावे तसे खेळतील. मागच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना ढोकळा किती खमण असतो ते सांगितले, कार्यकर्त्यांनी ऐकलेच ना. त्यात काय इतके आता? कार्यकर्त्यांना सांगेन, बारामतीचे पाणी सगळ्यात बेस्ट. पुणे बारामतीची बाकरवडी वा वा..! ज्यांना बारामतीची बाकरवडी आवडेल ते थांबतील नाहीतर चालू पडतील. तसेही एक एक करून चालू पडलेचना. अडवले का मी त्यांना. मग, तसेच आहे आपले. आता घड्याळात जीव रमत आहे. एक मोठा काटा एक छोटा काटा. मोठा काटा म्हणजे शरदकाका आणि छोटा काका म्हणजे अजित दादा... या दोन काट्यांमध्ये मी राज करेन, असा विचार करतोय. असो पण हे गाणी कुणी लावले-मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा...

 

ये असली नकली चेहरा

 

माझी मदत मोदींना झाली तर मी कधीही मलाच माफ करू शकणार नाही. इति जी. बी. कोळसे-पाटील. आता हे कोण म्हणून अज्ञान प्रदर्शित करू नका. कोरेगाव-भीमानंतर सातत्याने या ना त्या कारणाने ज्यांची नावं लोकांना माहिती झाली, त्यापैकी एक प्रकाश आंबेडकर आणि दुसरे आपले बी. जी. कोळसे-पाटील... तर पाटील यांनी मदत केली तरच मोदी यशस्वी होतील, असे ठाम मत कोळसे-पाटलांचे आहे. माकड ज्याप्रमाणे माझीच लाल, असे बोंबलते तसेच काहीजण ‘मीच यंव, मीच त्यंव, मी च मी च’ म्हणण्यामध्ये इतके एक्स्पर्ट आहेत की सांगता सोय नाही. बी. जी. कोळसे-पाटील म्हणतात, “माझ्या मराठा-कुणबी, एसी-एसटी, मुस्लीम बहीण, भावांनो, मी आपल्या सर्वांच्या सर्व दु:खांचे मूळ शोधून त्यावर मात करून सर्वांना सुखी करण्यासाठी काम करीत आहे. याचाच अर्थ जातीयवाद्यांशी लढा देतो देतो, म्हणत पाटील जातीच्या नावानेच कारभार करतात वाटते. पुढे ते म्हणतात, “स्वर्ग, नरक, ३३ कोटी देव ही संकल्पना आमच्या सर्व तार्किक, बौद्धिक, वैज्ञानिक, विकासवादी विचारांना, हजारो वर्षे मारीत आलेली आहे. त्यातून आम्हा भारतीयांना बाहेर काढण्याची जबाबदारी आमच्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांचीच आहे.” यावर इतकेच वाटते, “पाटीलसाहेब दमाने घ्या, किती कष्ट कराल या वयात? मराठा-कुणबी, एससी-एसटी, मुस्लीम बहिणी-भावांना दुःखमुक्त करणार का? ३३ कोटी देव मानणाऱ्या श्रद्धाशिलांना अश्रद्ध बनविणार?” आता यावर काही म्हणतील की, कोळसे-पाटील यांना भारतीय नागरिक आपल्या श्रद्धेचे पालन करू शकतो, हा संविधानाने दिलेला हक्क माहिती नसेल का? माहिती असणारच पण, देवाला मानणाऱ्यांची निंदा करणे, हेच आयुष्याचे इतिकर्तव्य असेल तर काय करणार. असो, आता कोळसे-पाटील यांना प्रकाश आंबेडकरांचा राग आला आहे. कारण प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेससोबत युती केली नाही. इथेच कोळसे-पाटील यांचे स्वरूप उघड होते. ते म्हणतात ना, “लाख छुपाओ छुप ना सकेगा, राज ये दिल का गहरा, दिल की बात बता देता है, असली नकली चेहरा.” जाऊ दे, आपल्याला काय त्याचे? कोळसा उगाळावा तितका काळाच.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat