बुरखा ये हटेगा, बुरखा ये उठेगा...

    दिनांक  15-Mar-2019   


 


आंतरराष्ट्रीय कायदे विषयातील पदवी संपादन केलेल्या आणि इराणमधील आपल्या सामाजिक व महिलाविषयक कामासाठी सरकारी शिक्षा सुनावलेल्या नसरीन सोतेदाह यांच्याबद्दल...

 

इराणच्या प्रसिद्ध महिला वकील आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त मानवाधिकार कार्यकर्त्या नसरीन सोतेदाह यांना सात वेगवेगळ्या प्रकरणांत तब्बल ३३ वर्षे जेरबंद तर १४८ फटके देण्याची शिक्षा नुकतीच सुनावण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे, नसरीन यांना आज ज्या प्रकरणात शिक्षा फर्मावण्यात आली, त्याव्यतिरिक्त अन्य एका प्रकरणात पाच वर्षांसाठी त्या कारागृहात आहेत. म्हणजेच नसरीन सोतेदाह यांना एकूण ३८ वर्षांची शिक्षा दिल्याचे इथे दिसते. नसरीन यांना अशाप्रकारे शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर तत्काळ जगभरातल्या माध्यमजगतात, सामाजिक व राजकीय जगतात सोतेदाह यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले. पण, नसरीन यांचा अपराध तरी काय? सोतेदाह यांच्यावर नेमके कोणते आरोप ठेवण्यात आले व त्यांची लढाई नेमकी कशासाठी होती? आजच्या आपल्या माणसंसदरातून नसरीन सोतेदाह यांच्याबद्दलच्या याच गोष्टींबद्दल जाणून घेऊया...

 

इराणच्या शहर-ए-लँगारूड शहरात एका मध्यमवर्गीय, पण इस्लामी धार्मिक रुढी-प्रथा-परंपरा पाळणार्‍या मध्यमवर्गीय कुटुंबात ३० मे, १९६३ रोजी नसरीन सोतेदाह यांचा जन्म झाला. पुढे शालेय शिक्षणानंतर शाहीद बेहिस्ती विद्यापीठातून नसरीन यांनी आंतरराष्ट्रीय कायदेविषयातील पदवी संपादन केली. दरम्यानच्याच काळात सोतेदाह यांनी आपल्या सामाजिक व महिलाविषयक कामालाही सुरुवात केली. १९९१ सालच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून नसरीन यांनी इराणमधील महिलांच्या मुलाखती, रिपोर्ताज व लेख लिहिले व ते राष्ट्रवादी-धार्मिक विचारांच्या दारिचे गुफ्तगूया प्रकाशनात प्रसिद्ध करण्यासाठी दिले. मात्र, रुढीवादी विचारांच्या दारिचे गुफ्तगूने ते प्रसिद्ध करण्यास नकार दिला. १९९५ मध्ये कायद्याची पदवी मिळूनही नसरीन यांना तब्बल आठ वर्षे वकिली करण्याची परवानगी नव्हती. ती त्यांना २००३ साली मिळाली. असे होऊनही मागे न हटता नसरीन यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आणि जामीया वृत्तपत्रासह अनेक ठिकाणी लेखन केले. पुढे वकिली करण्याची परवानगी मिळाल्यानंतरही नसरीन यांनी महिला व बालकांच्या हक्क-अधिकारांसाठी आवाज उठवला व आपल्या लेखनातूनही त्यांचे प्रश्न मांडले.

 

सोबतच नसरीन यांनी वकिली करताना महिला अधिकार कार्यकर्त्या, ‘वन मिलियन सिग्नेचर कॅम्पेनही संस्था, पत्रकार इसा शार्खिज, हशमत तबरजादी हे राजकीय नेते, डेमोक्रेटिक फ्रंट या बंदी घातलेल्या राजकीय संघटनेचे प्रमुख आणि इराणमधील नोबेल शांती पुरस्कारप्राप्त कार्यकर्त्या शिरीन इबादी यांचे खटलेही लढले. २००९ सालच्या इराणच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गजाआड केलेल्या विरोधकांची बाजूही त्यांनी मांडली. शिवाय, १८ वर्षे वयाखालील मुला-मुलींना दिल्या जाणार्‍या फाशीच्या शिक्षेलाही नसरीन यांनी विरोध केला. नसरीन सोतेदाह यांनी ही सगळीच प्रकरणे पाहिली व लढलीही. मात्र त्यांचे नाव सर्वाधिक गाजले ते बुरख्याला केलेल्या विरोधामुळे. आपल्या सर्वांना माहितीच असेल की, बहुसंख्य इस्लामी देशांत महिलांना मूलभूत अधिकारही दिले जात नाहीत. महिलांनी कायम पुरुषांच्या दबावाखाली वा देखरेखीखाली राहावे असेच तिथे समजले जाते. कित्येक मुस्लीम देशांत महिलांना संपूर्ण शरीर बुरखा, हिजाब वा अन्य काळ्या कपड्यांखाली झाकूनच ठेवावे लागते, चेहराही उघडा असलेला चालत नाही. इराणमध्येही हा नियम अतिशय कठोरपणे अमलात आणला जातो व सार्वजनिक ठिकाणी महिलांना बुरख्याशिवाय ये-जा करण्यास बंदी आहे.

 

डिसेंबर २०१७ आणि जानेवारी २०१८ मध्ये शेकडो महिलांनी चेहरा, डोके बुरख्याआड दडवून ठेवण्याविरोधात निदर्शनांना सुरुवात केली. दरम्यान, या महिलांनी आपल्या अधिकारासाठी सुरू केलेल्या लढ्याची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवरही व्हायरल केली. यातून इराणच्या मूलतत्त्ववादी विचारसरणीला तडा गेला, रोष उत्पन्न झाला व इराणी सरकारनेही नाराजी व्यक्त केली होती. अशाप्रकारे इराणी दंडविधानातील कलम ६३८ चे उल्लंघन केल्याने कित्येक महिलांना बेड्याही ठोकण्यात आल्या व फटके देण्याच्या तसेच आर्थिक दंडाच्या शिक्षाही दिल्या गेल्या. नसरीन सोतेदाह यांनी याच महिलांची वकिली करत खटला लढला होता. तेव्हा सोतेदाह यांच्या नावाची दखल विशेषत्वाने घेतली गेली. महिला व बालकांच्या हक्क-अधिकारांच्या बाजूने उभ्या ठाकणार्‍या नसरीन यांच्यावर इराण सरकारने इतरही अनेक आरोप केले आहेत. २०१० साली सोतेदाह यांच्यावर दुष्प्रचार केल्याचा व देशाची सुरक्षा धोक्यात आणल्याचा आरोप झाला होता, ज्याला त्यांनी स्वतः नाकारले होते.

 

सोमवारीदेखील नसरीन यांना इराणी न्यायालयाने शिक्षा देताना राष्ट्रीय सुरक्षेविरोधात एकत्र येणे तथा इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांच्या अपमानाच्या गुन्ह्याचा उल्लेख करण्यात आला. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांचे इराणमधील मानवाधिकाराचे चौकशी अधिकारी जाविद रहमान यांनी हा मुद्दा जिनिव्हा येथेही उपस्थित केला. आता या प्रकरणात नेमके काय होते, हे येणारा काळच ठरवेल. दरम्यान, नसरीन सोतेदाह यांचे सामाजिक व महिला-बालकांच्या अधिकारांसाठीचे कार्य लक्षात घेऊन युरोपीयन संसदेने २०१२ साली त्यांचा सखारोव्ह मानवाधिकार पुरस्कारदेऊन गौरव केला होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat