द्वेषाचा अंत कधी?

    दिनांक  15-Mar-2019   रक्ताच्या चिळकांड्यांनी

शहर धुमसत असताना

धर्माचे नाव घेऊन अधर्म पेरताना

जागोजागी ते उभे आहेत

माणुसकीचे नाते कुणी सांगावे कुणाला?

द्वेषाच्या ज्वालेत सारे उद्ध्वस्त आहेत!

 

जगाच्या पाठीवर द्वेष, मत्सर, क्रूरता आणि उद्ध्वस्त मनोवृत्तीतून संपत जाणारे माणूसपण आज चटकन दिसून येते. माणसाचे जगणे महत्त्वाचेच, माणसाचेच का? किड्यामुंग्यांनाही आपले आयुष्य महत्त्वाचे वाटते. मृत्यूची चाहूल लागताच जगण्याचा आकांत सुरू होतो. थोडक्यात, जिवंत असण्याची किंमत अमूल्य आहे. त्यामुळेच की काय, या अमूल्यतेचा फायदा उठवत काही विघातक वृत्तीचे लोक माणसाच्या जगण्यावरच आघात करतात. कारण, जानसे प्यारा कुछ नही होता.

 

आपल्या समानधर्मी, समजातीय आणि कोणत्या ना कोणत्या दृष्टीने रक्तबंध, भावबंध, विचारबंध जुळलेल्या माणसाचा मृत्यू त्यांच्या संबंधित माणसांना हलवून सोडतो. ते दु:ख शब्दातीत असते. असो. या सर्व बाबींचा ऊहापोह यासाठी की, जगभरात धर्म, जात, वंश यांच्याआड आपले सत्ताकारण आणि स्वार्थांधता जपण्यासाठी असेच मरणप्राय दु:ख आपल्यापेक्षा वेगळे असणार्‍यांना द्यायची रीत फार जुनी आहे. आपल्या देशाला लुटलेल्या परकीय आक्रमकांची मनोवृत्ती यापेक्षा वाईट आणि वेगळीही नव्हती. काश्मिरी अतिरेकी म्हणा किंवा नक्षली म्हणा किंवा इतर कुणी फुटीरतावादी म्हणा, हे सगळे याच मनोवृत्तीचे किडे आहेत. समाजाला नमवण्यासाठी ते या तंत्राचा वापर करतात. दुसर्‍यांच्या आयुष्यातली उद्धवस्तता यांना आनंद देऊन जाते. दुसर्‍यांच्या दु:खात यांना सुखाची लय मिळते, दुसर्‍यांच्या मरणात यांना जगण्याची उर्मी मिळते. त्यातूनच मग अमुक एकाला मारल्यानंतर अमुक मिळेल, स्वर्ग मिळेल, हुर मिळेल वगैरे भाकडकथाही जन्म घेतात. निदान आजपर्यंत तरी हेच पाहत आलो आहे.

 

उदाहरणार्थ, गुरुवारी न्यूझीलंड येथे घडलेल्या घटनेने ही विध्वंसक वृत्ती वार्‍यासारखी सर्वत्र पसरत असून, वर्चस्वशाहीचा वाद किती वाढला आहे, याची जाणीव होते. न्यूझीलंडच्या ख्राईस्ट चर्च भागातील दोन मशिदींमध्ये हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. त्यात ४९ जण मृत्युमुखी पडले, तर अनेक जखमी झाले. त्यामध्ये आपल्या देशातील हैदराबादमधील एक जण जखमी झाला आहे, तर नऊ भारतीय बेपत्ता आहेत. मन आणि विचार सुन्न करणारी घटना. दुसरी एक घटना याच आठवड्यातली. ब्राझीलमध्ये रॉल ब्रासील नावाच्या एका शाळेत अज्ञात बंदूकधारी घुसला. त्याने गोळीबार केला. त्यात १० जण ठार झाले आणि १७ जण जखमी झाले आहेत. त्यात पाच मुले व एक शिक्षकाचा समावेश आहे. दोन्ही घटना पाहिल्या तर तर्कसंगती हीच आहे की, हल्ल्याने समाजमनावर आघात व्हावा. शाळेमध्ये जाणरी बालके आणि प्रार्थनास्थळी जाणार्‍या लोकांनी हल्लेखोरांचे वैयक्तिक काहीही नुकसान केलेले नव्हते, पण त्यांच्यावर हल्ला केला तर तो हल्ला समाजाच्या वर्मी लागेल, हा कयास हल्लेखोरांचा असणार हे स्पष्ट आहे. भरीस भर न्यूझीलंड येथील हल्ल्याचे फेसबुक लाईव्हही हल्लेखोराने केले आहे.

 

यामागची मानसिकता काय असावी? अर्थात समाजात दहशत पसरावी. तसेच लोकांनी आपल्याला नकारात्मक आणि घृणास्पद समजून का होईना, काही काळ तरी महत्त्व द्यावे हीच असणार. न्यूझीलंडच्या हल्लेखोरांपैकी तीन पुरुष आणि एका महिलेला अटक केली आहे. माणसांना मारतानाचे लाईव्ह करावे, अशी अमानुषी मानसिकता या हल्लेखोरांमध्ये जन्मतःच नसेल. ती तशी का तयार झाली असावी? बरं, हल्ला करण्याआधी हल्लेखोरांनी मशिदीमध्ये जाणार्‍यांना ‘आक्रमणवादी’ म्हटले आहे. हल्लेखोरांना तसे का वाटले? उत्तर सोपे आहे. कारण, अमन-सुकूनचा संदेश देणार्‍या इस्लामचे नाव घेऊन काही दहशतवादी संघटनांनी जगाला वेठीस धरले आहे. अर्थात, दहशतवादी तसे करतात म्हणून न्यूझीलंडच्या हल्लेखोरांनीही तसे केले बरे झाले, असा विचार कुणाही संवेदनशील व्यक्तीच्या मनात येणार नाही. कारण, बदल्याची भावना धुमसतच राहते. द्वेषभाव पोसला जातो. याचा अंत कधी होणार?

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat