प्रियांकाचे गांधीप्रेम

    दिनांक  14-Mar-2019   

 

 
 
 
 
वस्तीपातळीवरच्या अशिक्षित आणि खऱ्या अर्थाने दुर्बल स्त्रीची एक शोकांतिका असते. तिला वाटते म्हणून किंवा तिची इच्छा आहे म्हणून ती काही करू शकत नाही, तर घरातल्या पुरुषमंडळींच्या फायद्यासाठी बिचाऱ्या स्त्रीला कठपुतळीसारखे डोलावे लागते. या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी यांचे काय झाले असेल, हा प्रश्न पडतो. अर्थात, केवळ उगीचच द्वेष म्हणून हे म्हणणे नाही, तर हा असा प्रश्न मनात आला. कारण, प्रियांका गांधी वढेरा यांचे गुजरातमधील भाषण. त्या या भाषणामध्ये म्हणाल्या की, “मी पहिल्यांदा साबरमतीला आले.” असो, नावात काय आहे म्हणा!! पण, ‘गांधी’ नाव उपाधीसारख्या लावणाऱ्या प्रियांकाचे गुजरातमधले हे वक्तव्य ऐकले आणि वाटले ज्या गांधींचे नाव घेऊन प्रियांकाच्या सगळ्या खानदानाने सत्ता उपभोगली, त्या प्रियांकांना उभ्या हयातीत गांधीजींच्या साबरमती आश्रमाला जाण्यासाठी उसंत मिळाली नाही? प्रियांका यांच्या लहानपणी त्यांच्या आजी इंदिरा, पिता राजीव किंवा आई सोनिया यांना नाही वाटले का की, आपल्या नातीला किंवा मुलीला महात्मा गांधींची स्मरणवास्तू दाखवावी. काय हा विरोधाभास म्हणावा? अष्टौप्रहर महात्मा गांधीजींचे नाव घ्यायचे, त्यांचे नावही लावायचे, पण त्यांच्या स्मृतिकार्याची भेट आपल्या घरातल्या पुढच्या पिढीला अजिबात करून द्यायची नाही, हे खरे काँग्रेसी गांधीप्रेम. प्रियांका या आधी साबरमती आश्रमामध्ये गेल्या नाहीत, याचा अर्थ त्यांना याबद्दल माहिती तरी नसावी किंवा आवडसवड तरी नसावी. असे असताना त्यांना आता निवडणुकीसाठी गांधीजींच्या साबरमतीला पहिल्यांदा भेट द्यावी लागत आहे, यातच सर्व आले. आता झाले ते झाले म्हणा; पण प्रियांका या साध्यासुध्या ‘मॅडम’ नाहीत. ‘ईद का चाँद’च आहेत. हो, जसा ईदचा चंद्र ईदलाच दिसतो, तशा प्रियांका फक्त निवडणुकीमध्येच दिसतात. आता कुणी म्हणेल चंद्रच का? बेडकंही पावसाळ्यातच डराव डराव करतात. तेही ठराविक काळातच येतात. तर त्याचे असे आहे की, प्रियांका पडल्या पक्क्या सेक्युलर का काय ते. त्यामुळे ईद वगैरे म्हटले की त्यांनाही कसे छान ‘सेक्युलर’ वाटेल. काहीही असो, दुसऱ्याला म्हणजे विशेषतः भाजपला वाईट म्हटले की आपण चांगले होतो, हा अभिजात काँग्रेसी बाणा प्रियांका यांच्याकडेही आहे. त्यांच्या भावाने आपलं गोत्रबित्र सांगून टिळा लावून आणि डोळे मारून धमाल उडवून दिली होती. आता या पार्श्वभूमीवर प्रियांकाचे, ‘देश खतरे में है’ ची आरोळी मात्र जुनीच आहे.
 

घमेंडी नार, बडी चालबाज...

 

एक चतुर नार, बडी होशियार...’ किशोरकुमारचे गाणे. ती नार चतुर असून होशियारही आहे. आपल्याकडे अशी ‘चतुर’ आणि ‘होशियार’ नार आहे. कपाळावर तेरा त्रिकाल आठ्या पाडून सदान्कदा मोदींवर कटाक्ष साधणाऱ्या ममता बॅनर्जी क्षणार्धात आठवतात. त्या ‘चतुर’ आणि ‘होशियार’ आहेत असे वाटले, पण तेही क्षणार्धातच. कारण, ‘चतुर’ म्हणावे तर मागे त्यांनी सांगितले होते की, “काश्मीरच्या बाजूला एकच परकीय सीमा आहे, प. बंगालला तर दोन दोन सीमा आहेत.” याचाच अर्थ, भारताचा अविभाज्य भाग असलेल्या काश्मीरला लागून किती देशाच्या सीमा आहेत, हेसुद्धा या मुख्यमंत्रीबाईंना माहिती नाही. ज्यांना देशाचा आवश्यक भूगोल माहिती नाही, त्या व्यक्तीला चतुर, हुशार वगैरे म्हणणे म्हणजे अतीच होईल, असे वाटले. पण लगेच असेही वाटते की, जन्माने हिंदू पण सगळी भिस्त मुस्लीम विचारधारेवर असलेल्या ममता मुख्यमंत्रिपदावर आहेत. मुख्यमंत्री होणे येरागबाळ्याचे काम नाही. त्यामुळे ममता ‘चतुर’ आणि ‘होशियार’ असतील. असो, पश्चिम बंगालबाहेर काय आहे, काय चालले आहे याचा मागमूसही नसणाऱ्या ममतांना पंतप्रधानही व्हायचे आहे. पण, आज देशात रा. स्व. संघाच्या मुशीतून घडलेला राष्ट्रपती आहे, पंतप्रधान आहे, कितीतरी मुख्यमंत्री आणि राज्यपाल आहेत, त्या रा. स्व. संघाबाबत ममता अनभिज्ञ आहेत. ममतांच्या मते रा. स्व. संघ आणि बजरंग दल या राजकीय सेना आहेत. अर्थात, ममतांच्या जाणीवपूर्वक अनभिज्ञतेचे रा. स्व. संघाला काही सोयरसुतक नसेलच म्हणा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प. बंगालमधून लढावे, असे तिरस्काराने म्हणताना ममता म्हणाल्या, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल यासारख्या आपल्या राजकीय सेनेलाही मोदींनी प. बंगालमध्ये आणावे. त्यांनी येथे येऊन भोजन आणि संस्कृतीचा आनंद घ्यावा.” ममतांच्या मते प. बंगालची संस्कृती ही इतर भारतापेक्षा वेगळी आहे का? विविधतेत एकता असलेली भारतीय संस्कृती ममतांना माहिती नसेल का? जी महिला देशाची संस्कृती, देशातील समाजकारण करणाऱ्या संस्था यांची माहिती स्वत:च्या चष्म्यातून पाहते. तिला ‘एक चतुर नार, बडी होशियार’ म्हणण्यापेक्षा ‘एक घमेंडी नार, बडी चालबाज’ असेच म्हणाचे लागेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat