युतीचे रणशिंग कोल्हापुरातून

13 Mar 2019 21:38:05

 

 
 
 

मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत २४ मार्चला सभा

 

मुंबई : लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरलेले असताना भारतीय जनता पक्ष-शिवसेना व मित्रपक्षांच्या युतीने आपल्या प्रचाराचे रणशिंग फुंकणारी पहिली प्रचारसभा कोल्हापुरात घेण्याचे ठरवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार, दि. २४ मार्च रोजी युतीच्या प्रचाराचा शुभारंभ करवीरनगरीतून करण्यात येणार आहे.

 

उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान अर्थात मातोश्री येथे मंगळवारी युतीच्या प्रमुख नेत्यांची प्रदीर्घ बैठक रात्री उशिरापर्यंत चालली. या बैठकीत निवडणुकीच्या प्रचारासंबंधी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई व मिलिंद नार्वेकर आदी यावेळी उपस्थित होते. यानंतर चंद्रकांतदादा पाटील व सुभाष देसाई यांनी संयुक्तरीत्या जारी केलेल्या पत्रकानुसार, करवीरनिवासिनी अंबाबाईच्या पवित्र भूमीत अर्थात, कोल्हापूर येथे रविवार, दि. २४ मार्च रोजी सायंकाळी भाजप-शिवसेना आणि मित्रपक्षांच्या युतीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणारी विराट शुभारंभ सभा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील-दानवे तसेच भाजपचे केंद्रीय स्तरावरील वरिष्ठ नेते हेदेखील यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

 

युतीच्या पदाधिकाऱ्यांचे विभागवार संयुक्त मेळावे

 

कोल्हापुरातील सभेपूर्वी युतीच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचे संयुक्त मेळावे राज्यातील सहा ठिकाणी घेण्यात येणार आहेत. दि. १५ रोजी अमरावती व नागपूर, दि. १७ रोजी औरंगाबाद व नाशिक, दि. १८ रोजी पुणे व नवी मुंबई असे एकूण सहा मेळावे होणार असून या सर्व मेळाव्यांतही देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. मुंबईतही असा संयुक्त मेळावा लवकरच होणार असून युतीचा संयुक्त वचननामादेखील लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे युतीच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
Powered By Sangraha 9.0