‘संवाद कर्णबधिर प्रबोधिनी’

    दिनांक  13-Mar-2019   

 

 
 
 
 

संवादातून प्रबोधनाचा वसा

 

‘संवाद’ ही मानवजातीची प्रभावी शक्ती मानली जाते. मात्र, काही कारणांनी अनेक जण या संवादशक्तीपासून दूर राहतात. या शक्तीपासून वंचित असलेल्या कर्णबधिर मुलांना संवादाचे धडे देण्याचा ध्यास डोंबिवलीतील ‘संवाद कर्णबधिर प्रबोधिनी’ या शाळेने घेतला आहे.

 

आयुष्यात काही प्रसंग, काही घटना माणसाचे जीवन पूर्णत: बदलून टाकतात. काही या प्रसंगाने खचून जातात, काही शिकून जातात, तर काही त्यातून काहीतरी नवे घडवतात. ते घडलेले नवे हे काहीतरी नवीन घडवावे, निर्माण करावे या उद्देशाने केलेले नसते, तर ती निर्मिती असते त्या विशिष्ट प्रसंगाची. ती परिस्थिती जी अनाकलनिय होती आणि सावरले नसते तर कदाचित उद्ध्वस्त होण्याची वेळ आली असती. डोंबिवलीच्या अपर्णा आगाशे या गृहिणीचेही असेच झाले. गृहिणी असणाऱ्या अपर्णा घर-संसार यातच आपले स्वत्व विसरून गेलेल्या. त्यामध्येच तिचे जगणे विलय पावलेले. पण अपर्णा यांच्या आयुष्यातली ‘ती’ घटना अपर्णा यांना यातना देऊन गेली, त्यासोबतच प्रचंड ऊर्जाही देऊन गेली. ती ऊर्जा केवळ आगाशे कुटुंबासाठी प्रेरणादायी नव्हती, तर अपर्णा ज्या यातनांचे ओझे वाहत होत्या त्या यातनांचे समप्रवासी असणाऱ्या साऱ्यांसाठी ती प्रेरणादायी होती. कर्णबधिर असलेल्या मुलाच्या शिक्षणाचा विचार करताना, भविष्याचा वेध घेताना एक आई म्हणून त्यांना काळजी वाटे. जेव्हा त्यांचा मुलगा कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या शाळेत जाऊ लागला, तेव्हा अपर्णा यांना जाणवले की, कर्णबधिर मुलांना सर्वसामान्य मुलांसमवेत शाळेत दाखल करून घेतले जात असले तरी, या विद्यार्थ्यांच्या गरजा वेगळ्या असतात. सामान्य मुलांना ज्या पद्धतीने शिकवले जाते त्या पद्धतीने कर्णबधिर मुलांना शिकवले, तर त्याचा उपयोग होईल का? कारण, कर्णबधिर मुलांच्या विशेष शिक्षणासाठी लागणारे विशेषत्व या शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये नसते. त्यांना लागणारी तांत्रिक साधने, शिक्षण पद्धती आणि ती आत्मसात असलेले शिक्षक या शाळांमध्ये नसतात. ‘संवाद कर्णबधिर प्रबोधिनी’च्या संस्थापक अपर्णा आगाशे यांना ही अडचण जाणवली. त्यामुळे दुसरीनंतरच या शाळेत त्याच्या गरजेनुसार शिक्षण मिळणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी डोंबिवलीतील एका कर्णबधिर मुलांच्या शाळेत प्रवेश घेतला. मात्र, याही संस्थेत काही तांत्रिक अडचणींमुळे पुढचे शिक्षण घेणे शक्य झाले नाही.

 

मुलाचे शिक्षण आणि भविष्य अपर्णा यांना स्वस्थ बसू देईना. शाळा होत्या नाही असे नाही. पण, त्यांना ज्या पद्धतीने शिक्षण देणारी शाळा हवी होती, तशी शाळा, कर्णबधिर मुलांना त्यांना अपेक्षित तसे शिक्षण देणारी शाळा अपर्णा शोधू लागल्या. पण त्यांचे समाधान होईना. मुलाचे शिक्षण तर होणे महत्त्वाचे होते. त्यामुळे अपर्णा यांनी ठरवले की, माझ्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी माझी. त्याने काय शिकावे, कसे शिकावे आणि कशी प्रगती करावी याचा उत्तम आराखडा आणि नियोजन मीच करू शकते. त्यामुळे अपर्णा यांनी चंग बांधला तो म्हणजे कर्णबधिर मुलांसाठी स्वत: शाळा सुरू करायची. गृहिणी असलेल्या अपर्णा यांना सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. कुठून सुरू करावे? कसे सुरू करावे इथपासून, तर शाळा म्हणून या शाळेचे बस्तान कसे बसवावे इथपर्यंत त्यांना सारेच हाताळावे लागणार होते. सुरुवातीला त्यांनी त्यांच्या घरातच शाळा सुरू केली. एका वर्षात त्यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आणि १० जून,१९९२ मध्ये त्यांनी शाळेचा पहिला वर्ग आपल्या घरातच भरविला. तोपर्यंत गृहिणी असलेल्या आगाशे यांना संस्थेची नोंदणी कशी करायची याची माहितीही नव्हती. मात्र, या सर्व गोष्टींची माहिती करून घेत शाळेला सरकार मान्यता मिळाली. पहिली चार वर्षे विनाअनुदानित तत्त्वावर चालविलेल्या या शाळेला १९९६ मध्ये अनुदान मिळाले आणि ही शाळा दैनंदिन तत्त्वावर सुरू झाली. डोंबिवलीतील स्थानिक लोकप्रतिनिधी आणि उद्योगपतींनीही या शाळेच्या उभारणीसाठी आर्थिक योगदान दिले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने या शाळेला भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध करून दिली.

 

 

त्यांच्या घरापासून सुरू झालेली ही शाळा आज अनेक मुलांचा आधार बनली आहे. सुरुवातीला पाच विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही शाळा आज सुमारे ६० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे. सद्यस्थितीला या शाळेसाठी पाच विशेष शिक्षक मंजूर झालेले आहेत. या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांबरोबर सण साजरे केले जातात. एलिमेंटरीच्या परीक्षांसाठी व संगणकीय परीक्षांसाठी मार्गदर्शन केले जाते. राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धांचेआयोजन करण्यात येते. शहरातील झोपडपट्टीमधील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. सुरुवातीला शाळेतील शिक्षकांनी आणि संस्थेतील सदस्यांनी डोंबिवली आणि आसपासच्या खेड्यांमध्ये जाऊन गरजू मुलांना शोधून काढले. अनेकांच्या पालकांना ही मुले शिकू शकतात, याची जाणीवही नव्हती. त्यांची मानसिकता बदलण्याचे मोठे आव्हान शिक्षकांनी पेलले. दुर्दैवाने काही ठिकाणी तर असेही दृश्य दिसले की, मूल कर्णबधिर आहे म्हणून त्याला घराच्या बाहेर जाऊच दिले जात नव्हते. कर्णबधिर मूल झाले म्हणून समाज हिणवेल, अशी यामागील भीती त्या पालकांना होती. काही ठिकाणी ‘कर्णबधिर मूल म्हणजे पूर्वजांच्या पापाचे फळ’ अशीही धारणा दिसली. काही कर्णबधिर मुलांच्या पालकांचे म्हणणे की, या मुलांना शिकवून फायदा काय? तर काही ठिकाणी कर्णबधिर मुलांना अक्षरक्ष: अडगळीची नकोशी गोष्ट यादृष्टीने वागणूक दिलेलेही दिसली. समाजाचे हे चित्र अमानुषच होते. अपवाद वगळता कर्णबधिर मुलांची स्थिती दयनीय होती पण, पर्याय नव्हता. सातत्यपूर्ण प्रयत्न करून शाळेच्या शिक्षकांनी परिसरातील कर्णबधिर विद्यार्थी जमवले.

 

सध्या शाळेत पहिली ते सातवीपर्यंतची मुले शिकत आहेत. शाळेत कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आवश्यक अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत. यामुळे कोणता विद्यार्थी किती प्रमाणात कर्णबधिर आहे, त्याला कोणत्या प्रकारचे श्रवणयंत्र आवश्यक आहे इथपासून ते त्याला कशा प्रकारे शैक्षणिक संकल्पना त्याला कशा आत्मसात करून द्यायच्या याचा विद्यार्थीनिहाय विचार होतो. शाळेत पाच विषय शिक्षक व एक कला शिक्षक आहे. याशिवाय काही निवृत्त शिक्षकही स्वेच्छेने काम करतात. विद्यार्थ्यांनी बोलावे यासाठी शाळेत सांकेतिक भाषेचा वापर शक्यतो टाळला जातो. श्रवणयंत्र मिळाल्यानंतर त्यांच्याशी सामान्य विद्यार्थ्यांसारखाच संवाद साधला जातो. विद्यार्थ्यांना अक्षर, शब्द आणि वाक्यांची ओळख व्हावी यासाठी सामूहिक श्रवणयंत्रांच्या साहाय्याने विविध गोष्टी ऐकवल्या जातात. याची सुरुवात होते ती चित्र आणि तक्त्यांच्या अभ्यासातून. यामुळे शाळेत एकही भिंत अशी नसेल की, जेथे चित्र वा तक्ता नाही. शाळेचे सर्व वर्ग प्रत्येक इयत्तेत आवश्यक असलेल्या अभ्यासानुसार शिक्षकांनी तयार केलेल्या तक्त्यांनी भरलेले आहेत.

 

 

शाळेच्या बालवर्गात अडीच वर्षांपासून सहा वर्षांच्या मुलांचाही समावेश आहे. विद्यार्थ्यांचे पुढचे शिक्षण सुलभ व्हावे यासाठी पाच विशेष टप्पे आखण्यात आले आहेत. यात सुरुवातीला चित्रांच्या माध्यमातून संवाद साधला जातो. नंतर चित्र आणि शब्दांच्या माध्यमाचा वापर केला जातो. पुढची पायरी संभाषण आणि गोष्ट अशी असते. यासाठी शाळेतील शिक्षक विशेष परिश्रम घेत असतात. विद्यार्थ्यांनी बोलावे हा मुख्य उद्देश असल्यामुळे ‘वाचा प्रशिक्षण’ दिले जाते. यामध्ये विद्यार्थ्यांसमोर शिक्षक बसतात आणि ते ओठांच्या हालचाली करतात. त्या हालचाली टिपून विद्यार्थ्यांनी नेमका शब्द ओळखायचा असतो. यामुळे विद्यार्थ्यांची ‘वाचाशक्ती’ सुधारते आणि ते बोलू लागतात. कर्णबधिर मुलांची परिस्थितीमुळे विशिष्ट मानसिकता तयार झालेली असते. आपण काही तरी वेगळे आहोत ही जाणीव त्यांना असते. त्यामुळे ती मानसिकता तयार झालेली असते. कर्णबधिरतेमुळे ही मुले बरेचदा संशयी आणि रागीट असतात. दोन व्यक्ती बोलत असताना त्या व्यक्ती नेमके काय बोलत आहेत, हे पाहण्याची त्यांना प्रचंड उत्सुकता असते. म्हणून त्यांच्या भावविश्वात उजेडाला विशेष स्थान आहे. अंधारात किंवा त्यांच्या नकळत गप्पा मारल्या, तर त्यांना या व्यक्ती आपल्याबद्दलच बोलत असल्याचा संशय येतो, असे निरीक्षण आगाशे यांनी नोंदविले. यामुळे शाळेची रचना करताना खूप प्रकाश राहील अशीच करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वेळ शाळेत घालवावा, यासाठी शाळा सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत भरते. तसेच शाळेत विद्यार्थ्यांना अन्नदात्यांच्या सहकार्याने रोज जेवणही दिले जाते. सणांची ओळख व्हावी यासाठी शाळेत सर्व सण साजरे केले जातात.

 

पुढचे शिक्षण घ्यावे म्हणून सातवीनंतरही दोन वर्षे विद्यार्थ्यांकडून दहावीची तयारी करून घेतली जाते. याची सुरुवात आगाशे यांनी स्वत:च्या मुलापासूनच केली. विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण व्हावे, यासाठी आगाशे आणि त्यांच्या शिक्षक़ांनी विशेष सहकार्य केले. त्या वर्षांपासूनच या शाळेतून दरवर्षी किमान पाच ते सहा विद्यार्थी दहावीची परीक्षा देतात आणि ते सर्वच्या सर्व चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतात व उच्चपदावर कार्य करतातविद्यार्थ्यांना शुभेच्छापत्र, कागदाची फुले अशा विविध गोष्टी शिकवून त्या त्यांच्याकडून तयार करून घेतल्या जातात. ही मुले कलाकुसर करण्यात इतकी निपुण होतात की, ती इतर सामान्य शाळेतील मुलांना हस्तकला शिकवितात. हस्तकलेसोबतच चित्रकला, क्रीडा यामध्येही या शाळेतील विद्यार्थी अग्रेसर आहेत त्याचप्रमाणे त्यांनी अनेक आंतरशालेय स्पर्धांमध्ये यशही मिळवले आहे.

 

 

 

शाळेतील सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, यासाठी शिक्षक विशेष मेहनत घेत असतात. याचाच भाग म्हणून सुट्टीच्या काळात शिक्षक शहराच्या आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन असे विद्यार्थी शोधतात आणि त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देतात. अशा लांब राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत यावे यासाठी शाळेच्या वरच्या मजल्यावर वसतिगृह सुरू करण्यात आले. कसारा, टिटवाळा, बदलापूर, मुंब्रा या ठिकाणांहून येथे विद्यार्थी येतात. चांगले आर्थिक पाठबळ मिळाल्यास शाळेची स्वतंत्र इमारत उभारण्याचा अपर्णा यांचा विचार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता समाजाची साथ मिळाली, तर हाही विचार प्रत्यक्षात येईल.
 

संस्था पदाधिकारी

अपर्णा आगाशे (अध्यक्ष), नंदू म्हात्रे (सचिव), जितेंद्र भोईर (कोषाध्यक्ष), दीपेश म्हात्रे (सदस्य), गजानन भाग्यवंत (सदस्य), शैलेश ओक (सदस्य), सुषमा गोखले (सदस्य)

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat