पेरूच्या भूगर्भात...

    दिनांक  13-Mar-2019   

 

 
 
 
 
भारतीय राजकारणाच्या ज्वालामुखीतील धगधग आता लोकसभा निवडणुका काही दिवसांवर आल्यामुळे भलतीच वाढली आहे. मात्र, दुसरीकडे दक्षिण अमेरिका खंडातील पेरू देशात मात्र खऱ्याखुऱ्या ज्वालामुखीची धगधग भलतीच वाढली आहे. बुधवार, दि. १३ मार्च रोजी सकाळी पेरू देशातील ‘सबान्काया’ या ज्वालामुखीतून स्फोटक राख तब्बल २६ हजार फुटांपर्यंत वाढल्याचे वृत्त तेथील स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमसंस्थांनी दिले आहे. गेले अनेक दिवस सबान्कायामधून स्फोटक राख बाहेर येत आहे. गेल्या वर्षीच्या अखेरीस म्हणजे २२-२३ डिसेंबर, २०१८ रोजी इंडोनेशियातील जावा आणि सुमात्रा दरम्यानच्या सुंडा बेटांना त्सुनामीचा तडाखा बसला होता. येथील अनॅक क्रॅकोटा या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि त्याचा परिणाम म्हणून इंडोनेशियाला पुन्हा एकदा त्सुनामीचा तडाखा बसला. यामुळे या प्रदेशातील सुमारे ३०० हून अधिक नागरिकांना प्राण गमवावे लागले, शिवाय आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले. आता दक्षिण अमेरिका खंडात पेरूमध्ये या प्रकारची घटना घडल्यामुळे भूगर्भशास्त्रज्ञ व पर्यावरणतज्ज्ञांमध्ये भूगर्भात सुरू असलेल्या हालचालींबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे.
 

ज्वालामुखीचा उद्रेक हा मानवासाठी धोकादायक ठरत असला तरी ज्वालामुखी मात्र माणसाला उपयोगीच ठरत असतो, हे सर्वप्रथम आपण लक्षात घेतले पाहिजे. जगभरात आज असे सुमारे ३०० ज्वालामुखी अस्तित्वात आहेत. पृथ्वीच्या पोटातील तप्त लाव्हा म्हणजेच शिला व खनिजे यांचा तप्तरस उफाळून जेव्हा पृथ्वीचे बाह्य आवरण फोडून बाहेर पडतो, तेव्हा तो थंड होत चहूबाजूंना पसरतो. यालाच आपण ‘ज्वालामुखीचा उद्रेक’ म्हणतो. या बाहेर येणाऱ्या लाव्हाचे थंड खडक बनतात, त्यांना ‘बेसाल्ट’चे खडक म्हणतात. ज्वालामुखीचे तोंड (क्रेटर) हे सतत धुमसणारे असू शकते किंवा निद्रिस्तही असू शकते. यातून बाहेर येणारा धूर, धूळ, गंधकमिश्रित वायू हे मैलोन्मैल पसरू शकतात. काही वेळा या मुखातून काही फूट उंच उसळून लाव्हा पुन्हा आत जाऊन खदखदत राहतो. ज्वालामुखीच्या पोटातून किती खोलवरून लाव्हा उसळत आहे, याचा पत्ता लागणे मात्र शक्य नसते. ज्वालामुखीच्या पर्वतातील चिरांमधून मात्र धूर, गंधकमिश्रित वायू, गरम पाण्याचे झरे, गरम हवेचे झोत बाहेर पडताना दिसतात. ज्वालामुखीला इंग्रजीत ‘व्होल्कॅनो’ म्हणतात. हे नाव इटलीतील व्होल्कॅनो बेटावरील ज्वालामुखीवरून पडल्याचे सांगितले जाते. इटलीमधील व्हेसुव्हियस हा ज्वालामुखी पुरातन काळापासून उद्रेकामुळे प्रसिद्ध आहे. १९७९ साली पोंपेई हे समृद्ध नगर याच ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नष्ट झाल्याची नोंद आहे.

 

ज्वालामुखीचे उद्रेक केवळ जमिनीवरील डोंगरांतच होतात, असे नाही. समुद्रातदेखील ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात. समुद्रात जर फार मोठे उद्रेक झाले तर त्यातील लाव्हा वर येऊन त्यांचाच डोंगर तयार होतो व हा डोंगर समुद्रसपाटीच्या वर येऊन ते बेट असल्याचे भासते. लाव्हारस खूपच पसरला, तर बेटांच्या मालिका तयार झालेल्यादेखील आपल्याला पाहायला मिळतात. विशेषतः पॅसिफिक महासागरात अशा बेटांच्या मालिकाच पाहायला मिळतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिकेतील हवाई बेटे. हवाई बेटातील ‘मौनालोआ’ या ज्वालामुखीमुळे बेटांची मालिका वाढत गेली आहे. समुद्रतळाशी तब्बल ५१८० मीटर खोलीवर सुरू झालेला हा ज्वालामुखी सध्या समुद्रसपाटीपासून ४१७० मीटर उंच आहे. म्हणजेच समुद्रसपाटीपासून मौनालोआ या ज्वालामुखीची उंची जवळपास ९३०० मीटर इतकी आहे. ज्वालामुखीतील गरम खडकांचा आणि लाव्ह्याचा वापर जगातील अनेक देश वीजनिर्मितीसाठीही करताना दिसतात. जमिनीला खोलवर भोके पाडून तप्त दगडांवर पाणी सोडून पाण्याची वाफ दुसऱ्या पाईपमधून वर घ्यायची व तिच्या शक्तीवर जनित्रे चालवून वीज निर्माण करायची, अशा पद्धतीने वीजनिर्मितीचे काम चालते. याला ‘जिओथर्मल पॉवर’ असे म्हणतात. तूर्तास, पेरूमधील सबन्कायाचा तिथे जवळपास मानवी वस्ती नसल्यामुळे जनजीवनावर परिणाम झालेला नाही. तथापि, येत्या काही दिवसांत वा महिन्यांत पेरूमधील अन्य काही ज्वालामुखींचाही उद्रेक होण्याची शक्यता भूगर्भशास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat