‘आप’विश्वासाचा उसना आव

    दिनांक  13-Mar-2019   

 

 
 
 
 
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी प्रसारमाध्यमांनी नायकत्व बहाल केलेल्या अरविंद केजरीवालांकडे कितीतरी पुरोगामी, बुद्धिजीवी व विचारवंत डोळे लावून बसले होते. केजरीवालांच्या रूपाने आता भारतीय लोकशाहीरूपी भ्रष्ट व्यवस्थेचे निर्दालन करणारा कोणीतरी उद्धारकर्ताच अवतरल्याचे तेव्हा ही मंडळी उच्चरवाने सांगत होती. पहिल्यांदा जिंकलेली दिल्ली विधानसभा व नंतर थेट पंतप्रधानपदासाठी केलेली मोर्चेबांधणी, वाराणसीतून तत्कालीन पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय, दरम्यानच्याच काळात कुठल्याशा फुटकळ कारणावरून केलेली दिल्ली विधानसभेची बरखास्ती व सर्व सरकारी लाभ नाकारत आपण किती सोज्वळ, साधे नेते आहोत हे दाखविण्याची धडपड, या सगळ्यातूनच अरविंद केजरीवाल म्हणजे कित्ती कित्ती थोर अशा शब्दांत तेव्हा देशातले बुद्धिमान मूखंड बडबडत होते. मात्र, कोणाला तरी मसिहा ठरवायचे आणि त्याच्यामागे पळा, पळा करत पळत सुटायचे आणि तोंडावर आपटायचे, असा अनुभव यावेळी या लोकांना आला. गेल्या पाच वर्षांत केजरीवालांचा भ्रष्टाचार निर्मूलनवादी मुखवटा पुरता गळून पडला आणि चेहऱ्यामागे लपलेला बेरकी, स्वार्थी, अहंकारी राजकारणीच समोर आला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर तर केजरीवालांनी मतलबासाठी ज्यांच्याविरोधात आदळआपट केली, त्यांच्याशीच आघाडी करण्याची भूमिका मांडली. देशातील सर्वच पक्ष आणि नेतेमंडळी भ्रष्ट असून जनतेला ओरबाडूनच त्यांनी सत्ता गाजवली तर मीच एकमेव शुचिर्भूत म्हणून मला संधी द्या, असे म्हणणारे केजरीवाल कोलकात्यात ममता बॅनर्जींनी घेतलेल्या बेरोजगार मेळाव्याला हजर झाले. एकमेकांबरोबर हात उंचावत ‘मोदी हटाव’ची घोषणाही केली. म्हणजेच अरविंद केजरीवालांचे या पाच वर्षांत किती अधःपतन झाले, हे लक्षात येते. अर्थात, केजरीवालांना याचे काहीही वैषम्य वा खेद वाटणार नाही, कारण कोडग्याला कितीही बोला वा चोपा, तो खिदळण्याला वा स्वतःच्या निर्णयालाच योग्य मानत असतो. केजरीवालांची अवस्थाही सध्या अशीच झाली आहे. नुकतीच त्यांनी आपला आम आदमी पक्ष यंदाच्या निवडणुकीत दिल्लीतील सर्वच सात जागा जिंकेल, असेही छातीठोकपणे सांगितले. पण कसे?
 

केजरींचा फुकाचा सर्व्हेचा डाव

 

अरविंद केजरीवालांनी नुकतेच असे सांगितले की, “आम्ही आमचा अंतर्गत सर्वे केला असून दिल्लीतील सर्वच्या सर्व सात जागा आप जिंकेल.” खरे म्हणजे केजरीवालांनी व्यक्त केलेला विश्वास वा सर्व्हे फसवा असल्याचेच दिसते. कारण, हेच केजरीवाल महिन्या-दोन महिन्यांपासून काँग्रेसशी आघाडी करण्यासाठी मागे लागले होते. दिल्ली काँग्रेसच्या प्रमुख शीला दीक्षितांपासून राहुल गांधींनी तरी आम आदमी पक्षाला सोबत घ्यावे म्हणून केजरीवाल हातपाय मारत होते. पण, काँग्रेसने केजरीवालांनी टाकलेल्या गळाकडे दुर्लक्षच केले. जर केजरीवालांना स्वतःच्या पक्षाच्या यशाबद्दल इतकाच आत्मविश्वास होता, तर त्यांनी काँग्रेसपुढे झोळी घेऊन उभे राहण्याचे काहीही कारण नव्हते. पण ते तसे वागले व काँग्रेसच्या मिनतवाऱ्याही केल्या. आज मात्र, तेच केजरीवाल “आम्ही सातही जागा जिंकू,” असे म्हणतात, ते कशाच्या बळावर? काँग्रेसशी आघाडी होणार नाहीसे समजल्यावर आम आदमी पक्षाच्या धुडात असे काय संचारले की, केजरीवाल सात जागा जिंकण्याची ग्वाही देऊ लागले? खरे म्हणजे गेल्या पाच वर्षांतला केजरीवालांचा मुख्यमंत्रिपदाचा कारभार केवळ टीकोजीरावांचा झाला होता. केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीचे नायब राज्यपाल आणि संघाविरोधात तोल सोडून बोलणे, कायदा व्यवस्थेला बाधा पोहोचवत स्वतःच चक्काजाम करणे, दिल्लीत कचऱ्याचे ढीग अन् आजारांची साथ फैलावलेली असताना पंजाबमध्ये जात प्रचाराच्या नळ्या फुंकणे, असे सगळेच उद्योग केजरीवालांनी केले. मात्र, केजरीवालांना डोक्यावर बसवलेल्या मतदाराला हे सगळेच दिसतही होते व त्याने तेव्हाच ठरवले की, आम आदमी पक्षाला धडा शिकवायचाच. म्हणूनच दिल्लीतील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत ‘आप’ची पिछेहाट झाली. मतदाराने भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवला. आताही लोकसभा निवडणुकीवेळी हाच मतदार घराबाहेर पडेल, मतदान करेल व केजरीवालांच्या विश्वासावरही पाणीच फिरवेल. पण, त्यांना अजूनही ही गोष्ट लक्षात आलेली दिसत नाही. प्रसारमाध्यमांनी फुगवलेला ‘आप’चा फुगा पंजाबमधील विधानसभा निवडणुकीवेळी फुटला होताच, तसाच तो आताही फुटू शकेल. पण, जनतेच्या प्रश्नांपासून पळ काढणाऱ्या, स्वतःच्याच ताब्यात सत्ता असूनही आंदोलनांची नौटंकी करणाऱ्या केजरीवालांना हे इतक्यात समजू शकणार नाही. कारण, शेखचिल्ली स्वप्ने तर कोणीही रंगवू शकतो ना? त्याला कुठे, कसले बंधन असते?

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat