हातमाग क्षेत्रातील ‘उज्ज्वलतारा’

    दिनांक  12-Mar-2019

 

 
 
 
भारताची समृद्ध वस्त्रपरंपरा अभिमानास्पद अशीच आहे. त्यामध्ये एक म्हणजे हातमाग. या हातमागाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी उज्ज्वल सामंत यांनी पुढाकार घेतला आहे.
 

हातमागावर विणलेल्या कापड व वस्त्रांना भारतीय बाजारपेठेत ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी ‘उज्ज्वलतारा’ हा नवीन ब्रॅण्ड बाजारपेठेत येत आहे. हातमाग कारागिरीतील स्पेशालिस्ट उज्ज्वल सामंत यांनी हा ब्रॅण्ड बाजारपेठेत आणला आहे. गेली काही वर्षे विविध प्रदर्शनांद्वारे त्यांनी भारतीय हातमाग कलेला लोकांसमोर आणले. अनेक भारतीय कारागिरांची कलाकुसर त्यांनी जगासमोर प्रदर्शित केली आहेअन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. एकेकाळी भारताची जगभरात वस्त्रोद्योगामुळे ओळख होती. याचे इतिहासात अनेक दाखले मिळतात. पाच हजार वर्षांपूर्वीच्या भारतीय संस्कृतीची ओळख असलेल्या मोहेंजोदडोमधील भित्तीशिल्पे आपल्याला पाहावयास मिळतात. इजिप्तमधील काही भित्तीशिल्पांमध्ये राजहंस परिधान केलेली शिल्पे आपल्याला आढळतात. इजिप्त हा वाळवंटी प्रदेश आहे. तिथे ‘राजहंस’ हा प्राणी अस्तित्वात नव्हता. त्याकाळी भारतातच वस्त्रांवर हंसांच्या आकृतीचे कशिदाकाम केले जाई. त्यामुळे इजिप्तमधील भित्तीचित्रात ज्या स्त्रीने हंसाचे वस्त्र धारण केले आहे, ते वस्त्र भारतात तयार झाले असावे, असा संशोधकांचा ठाम विश्वास आहे. पाचव्या शतकात तयार झालेल्या अजिंठा-वेरुळ लेण्यांमधूनसुद्धा काही महिला कापसाच्या बोंडापासून धागे तयार करून ते विणताना दाखविलेल्या आहेत.

 

भारताची ही समृद्ध वस्त्रपरंपरा अभिमानास्पद अशीच आहे. याच वस्त्रपरंपरेतील एक प्रकार म्हणजे ‘हातमाग’ वा हातमागावर तयार केलेले कापड, कपडे, वस्त्रे होय. हातमाग यंत्रावर सुरुवातीला हाताने कापड विणले जाते व नंतर त्यावर कलाकुसर केली जाते. जगभरात भारतीय हातमागावर विणलेल्या वस्त्रांना प्रचंड मागणी आहे. खादी, लिनन, पैठणी, जरदोसी हे हातमागावर विणलेल्या वस्त्रांचे काही प्रकार आहेत. हातमागावरील वस्त्रांचे प्रकार, त्यांच्यावर केलेली कलाकुसर, त्याचा इतिहास याबद्दलची इत्थंभूत माहिती उज्ज्वल सामंत आपल्याला देतात. इतका सूक्ष्म अभ्यास त्यांनी या क्षेत्राचा केलेला आहे. दर्दी रसिकांना या हातमागावरील वस्त्रप्रावरणांचा आनंद एकाच ठिकाणी घेता यावा यासाठी उज्ज्वल सामंत यांनी दादर येथे ‘उज्ज्वलतारा’ नावाचा हॅण्डलूम स्टुडिओ सुरू केला आहे. पूर्वीच्या काळी खादी म्हणजे एक किंवा दोनच रंग किंवा खादी म्हणजे नीरस असे समजले जाई. मात्र, हा समज ‘उज्ज्वलतारा’ मोडीत काढतो. निसर्गात आढळणारा प्रत्येक रंग येथे आपल्याला दिसतो. तसेच विविध डिझाईनमध्ये विविध वस्त्रप्रकार येथे उपलब्ध आहेत.

 

एक महिला उद्योजिका म्हणून हा प्रवास खूप खडतर होता. हातमाग क्षेत्रामध्ये मराठी लोकं खूप कमी आहेत. हिंदुस्थानातील ८० टक्के हातमागावरील कामे मुस्लीम महिला करतात. एकट्याने एखादा उद्योग सुरू करायचा असेल, तर निर्णय पटकन घेता येतात. पण जर भागीदारांची संख्या जास्त असेल, तर निर्णय घेण्यास वेळ लागतो. तसेच त्यांना एकत्र करण्यासही वेळ लागतो. त्यामुळे या लोकांना एकत्र करणे हे एक मोठे आव्हान होते. त्या महिलांना एकत्र करून त्यांना एक व्यासपीठ मिळवून देणे आणि त्यांना हे पटवून देणे खरेच खूप कठीण होते. यामध्ये अनेकवेळा अपयश आले. परंतु, मी माघार घेतली नाही. पण एक पॅशन म्हणून हे कार्य सुरू ठेवले. गेल्या पाच ते सहा वर्षांत मुंबईमध्ये अनेक प्रदर्शने भरवली आहेत. मुंबई ही खूप मोठी बाजारपेठ असल्याने आम्ही इथेच काम करण्याचे ठरवले,” असे उज्ज्वल आपल्या व्यवसायाबद्दल सांगतात. नागालँड, पुदुच्चेरी ते कन्याकुमारी अशा संपूर्ण हिंदुस्थानातून लोकं आपली कला प्रदर्शित करण्यासाठी मुंबई व इथल्या अनेक ठिकाणी येतात. यंदाच्या काळाघोडा येथील प्रदर्शनात अफगाणिस्तानातील एकाने सहभाग घेतला होता. त्याच्याकडे हाताने तयार केलेले दागिने होते. त्या दागिन्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आम्ही आता सीमोल्लंघन केले आहे, असे म्हणता येईल, असेही उज्ज्वल म्हणाल्या.

 

पुढे त्या म्हणाल्या की, “या प्रदर्शनामध्ये केवळ हातमागावरील कापड नव्हे, तर हाताने तयार केलेल्या वस्तूही असतात. यात खड्यांचे दागिने, सिल्व्हर ज्वेलरी आहे. प्रदर्शनामध्ये त्यांच्या वस्तूंची किंमत तेच ठरवतात, हे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. प्रदर्शनामध्ये ५०० रुपयांपासून दीड लाखांपर्यंतच्या वस्तूही असतात. सर्वात महाग असणार्‍या पटोल्या साड्या गुजरातमधून येतात. पटोला हा धागा आणि त्याच्यावरील प्रकियांना खूप वेळ लागतो. एक पटोला साडी बनवण्यासाठी तीन ते चार महिने लागतात. सिल्क महाग असल्यामुळेही त्याची किंमत जास्त असते. तसेच पॅचवर्कचे कापडही महाग असते. एका धाग्यावर दुसरा धागा विणल्याने त्याचा दर्जा वाढतो. त्याचे खूप बारीक काम असते. लखनवी उत्पादनेही खूप महाग असतात. बादलावर्कची लखनवी साडी महाग असते. साड्यांवर चंदेरी रंगाचे धागे दिसतात, त्याला ‘बादलावर्क’ म्हणतात.” ग्राहकांच्या प्रतिसादाबाबत त्या म्हणाल्या की, “मुंबई किंवा बाहेरील उच्चभ्रू लोकांना पूर्वीपासूनच हातमागावरील वस्तूंचे आकर्षण आहे. हातमागावरील वस्तू एक वेगळाच ’फिल’ देते, असे त्यांचे म्हणणे आहे. राजकारणी लोकं किंवा कलाकार मंडळी शक्यतो हातमागावरील कापड किंवा वस्तू वापरतात. पण हे अगदी तळागाळात पोहोचवणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या पैठणीसह हिंदुस्थानात प्रत्येक राज्याची एक वेगळी कला आहे आणि तो कपडा घातल्यावर एक वेगळाच फिल येतो आणि सुंदरही वाटते.”

 

-नितीन जगताप

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat