ये कैसे हुआ ‘जी’?

    दिनांक  12-Mar-2019   

 

 
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा ही द्वेषाची विचारधारा असून काँग्रेसची विचारधारा ही प्रेमाची विचारधारा असल्याची भूमिका काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी दिल्लीत नुकत्याच झालेल्या एका मेळाव्यात मांडली. याआधीही गेली अनेक वर्षं राहुल गांधी याप्रकारची भूमिका सातत्याने मांडत आहेत. अगदी लोकसभेपासून गावोगावच्या सभांपर्यंत सर्व ठिकाणी राहुल गांधी अशाप्रकारे संघावर चिखलफेक करून काँग्रेसची ‘जीतो लेकीन प्यार से’ ही भूमिका केविलवाण्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधींच्या या कथित प्रेमाचा सोमवारी इतका अतिरेक झाला की, जैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात म्होरक्यालाही त्यांनी आदरार्थी संबोधले. मसूद अझहरला तत्कालीन रालोआ सरकारनेच कंदाहरला नेऊन सोडले हे सांगताना, थोडक्यात रालोआ आणि भाजपवर आरोप करत असताना राहुल यांनी अझहरचा उल्लेख चक्क ‘मसूद अझहरजी’ असा केला. याशिवाय, पुलवामा हल्ल्यासारख्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या घटनेबाबत आपले आकलन किती अगाध आहे, हेही त्यांनी यावेळी दाखवून दिले. ‘पुलावामात बॉम्ब फुटला. सीआरपीएफचे ४०-४५ लोक शहीद झाले. कोणी बॉम्ब फोडला. जैश-ए-मोहम्मदने फोडला.’ ही राहुल गांधींची या भाषणातील वाक्ये आहेत. स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासात जवळपास तीन चतुर्थांश काळ जो पक्ष सत्तेत राहिला, जे घराणे सत्तेत राहिले त्या पक्षाच्या अध्यक्षाचे आणि घराण्यातील वंशजांचे ज्ञान आणि आकलन हे असे आहे. राहता राहिला प्रश्न तो काँग्रेस आणि राहुल गांधींच्या प्रेमाचा. काँग्रेसचे हे प्रेम आजचे नाही, गेल्या अनेक वर्षांचे आहे. २०१२ मध्ये याच काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हेही थेट संसदेत बोलताना हाफिज सईदला ‘श्री. हाफिज सईद’ म्हणाले होतेच. रा. स्व. संघ, स्वातंत्र्यवीर सावरकर, भाजप आणि भाजप नेत्यांवर खालच्या भाषेत टीका करायची, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित इतक्या संवेदनशील विषयांतही आपले अज्ञान प्रकट करायचे आणि दहशतवाद्यांना ‘जी’ म्हणायचे. राहुलजींची वाटचाल जर ही अशी होणार असेल तर हादेखील एक राष्ट्रीय चिंतेचा विषय ठरतो.
 

प्रेमाची भाषा अशी कशी?

 

स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील टीका, हा राहुल गांधींचा आजकालचा आवडता छंद बनला आहे. सावरकरांनी ब्रिटिशांची ९ वेळा माफी मागितली आणि काँग्रेस नेत्यांनी मात्र कधी कुणापुढे मान झुकवली नाही, हे गेल्या वर्षभरात राहुल यांनी जवळपास दहा-बारावेळा सांगून झाले असेल. काँग्रेसची (नेहरू-गांधी घराण्याची?) प्रेमाची विचारधारा बहुधा त्यांना असे करायला शिकवत असावी. १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली आणि आज २०१९ मध्ये देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, अनेक केंद्रीय मंत्री, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री हे संघस्वयंसेवक आहेत. इतर अनेक क्षेत्रांत संघस्वयंसेवकांनी भरीव योगदान दिले आहे. संघ काळानुरूप बदलत राहिला, नव्या सकारात्मक गोष्टी शिकत, अंगीकारत पुढे जात राहिला. यासाठी आपल्या कट्टर विरोधकांशी संवाद साधायला संघाने कधीच कमीपणा वाटून घेतला नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी राष्ट्रपती नुकतेच संघाच्या व्यासपीठावर येऊन गेले. संघाची विचारधारा मानणारे वगैरे नाहीत उलट विरोधकच आहेत, असे अनेकजण गेल्या ९ दशकांत संघ व्यासपीठांवर येऊन गेले. वैचारिक आदानप्रदान घडून आले. प्रणव मुखर्जींनी संघाच्या कार्यक्रमात जाण्यास काँग्रेसमधूनच तीव्र विरोध झाला. उलट संघाने मुखर्जींचे स्वागत केले, त्यांचा सन्मान केला. तरीही, काँग्रेस अध्यक्षांसाठी मात्र ही द्वेषाची विचारधारा ठरते. राहुल गांधींच्या आज्जी इंदिराबाईंनी सावरकरांनाभारताचे असामान्य पुत्र आणि ब्रिटिशांना धाडसी आव्हान देणारे वीर’ असे संबोधले होते. डॉ. मनमोहन सिंग यांनी सावरकरांचा उल्लेख ‘देशभक्त आणि स्वातंत्र्यसेनानी’ असा केला. तथापि, राहुल गांधींना काही इंदिरा आणि मनमोहन सिंग यांचे विचार पटत नसावेत. त्यामुळे सावरकरांनी ब्रिटिशांची ९ वेळा माफी मागितली, हे वेडेवाकडे चाळे करून पटवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत. भाजपवाले इतिहासातील महापुरुषांवर चिखलफेक करत आहेत, पं. नेहरूंची बदनामी करत आहेत वगैरे आरडाओरडा करणार्‍या पुरोगामी-लिबरलांना राहुल यांची सावरकरांबद्दलची ही प्रेमाची भाषा मात्र दिसत नसावी. असो. या कथित प्रेमाची भाषा किती खरी, किती खोटी, हे देशातील सुज्ञ जनता लवकरच स्पष्ट करेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat