प्रकाश आंबेडकर सोलापूरातून लोकसभेच्या रिंगणात

    दिनांक  11-Mar-2019


 


सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. आंबेडकर यांच्या घोषणेमुळे वंचित बहुजन आघाडीची काँग्रेससह आघाडीची शक्यता मावळली असल्याचे बोलले जात आहे.


सोलापुरातून काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, आंबेडकर यांच्या घोषणेमुळे शिंदे यांची डोकेदुखी वाढणार आहे. आंबेडकर हे दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जाते. अकोला मतदारसंघाबाबत ते लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येते.


सोलापूरमधून आंबेडकर हे निवडणूक लढवतील असा अंदाज यापूर्वी लावण्यात आला होता. मात्र, आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. अकोला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. भाजपा, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत सोलापुरात पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

 

दरम्यान, सोलापूर लोकसभा मतदारसंघ सध्या भाजपाच्या ताब्यात असून तिथे शरद बनसोडे हे विद्यमान खासदार आहेत. मोदी लाटेत बनसोडे यांनी २०१४ मध्ये सुशीलकुमार शिंदे यांना पराभूत करुन सर्वांनाच चकित केले होते. पण मागील ५ वर्षांत बनसोडे यांना आपल्या कामाची छाप पाडता आली नाही. त्यांच्याबाबत मतदारसंघात नाराजीचा सूर दिसून येतो. त्यामुळे भाजपानेही येथे उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतल्याचे मागील काही घडामोडींवरुन दिसते. खासदार अमर साबळे आणि गौडगाव मठाचे डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्यात उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी यंदाची निवडणूक थोडीफार अनुकूल असल्याचे बोलले जात होते. प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीच्या घोषणेमुळे मात्र शिंदे यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat