वो सुबह कभी तो आयेगी...

    दिनांक  11-Mar-2019   धर्मादाय कार्यालयामध्ये लेखा संचालक असलेल्या कृष्णा इंद्रेकर यांना विवाहानंतर कौमार्य चाचणी केली नाही म्हणून खूप सहन करावे लागले. पण न थांबता त्यांनी समाजासाठीचे काम सुरूच ठेवले.

पुण्याच्या येरवड्यामध्ये कंजार भाट समाजाची जातपंचायत बसलेली. साधारण ८० चे दशक. दहावी-अकरावीत शिकणारा कृष्णा पंचायतीतील पंचांना म्हणाला, “तिला शिक्षा देऊ नका. तिचा नवरा दारू पिऊन मेला. तिला शिक्षा का म्हणून? जर ती खरेच गुन्हेगार असेल, तर पोलिसात चला. पण ती गुन्हेगार आहे की नाही हे ठरायला तर हवे.” वातावरण गंभीर झाले. विधवा बहिणीच्या नजरेत दु:ख भीती आणि न मावणारी आसवे. पण समाजापुढे कृष्णाचे काही चालले नाही.

पुण्याच्या कंजार भाट समाजातील बंबीयासिंग इंद्रेकर आणि जनाबाई इंद्रेकर यांना १२ मुले. चार मुलगे आणि आठ मुली. त्यापैकी एक कृष्णा. बंबीयासिंग ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये चतुर्थ श्रेणी कामगार. पगार तो कितीसा. त्यात मुलाबाळांचे लेंढार. त्यामुळे पगार पुरणे शक्यच नव्हते. वस्तीचे वातावरण काय वर्णावे? दररोज दारू पिऊन होणारी भांडणे, ती सोडवण्यासाठी पंचायत. दोषी नाही हे सिद्ध करण्यासाठी उकळत्या तेलातूननाणे बाहेर काढणे, रात्रभर आगीत तापवलेल्या कुर्‍हाडीचे पाते हातात धरणे हे निवाडे कृष्णा यांनी डोळ्यांनी पाहिलेले. त्यातच मोठ्यांनी दारूच्या भट्ट्या लावणेआणि लहानांनी भीक मागणे, चोर्‍या करणे हे ठरलेले. शाळेत जाणारा छोटा कृष्णाही पुण्याच्या चित्रा टॉकिजच्या मागील कॉलनीत दोस्तांबरोबर चोर्‍या करू लागले.

लहान वयातच कृष्णाला प्रौढत्व आले. त्याला कारणही तसेच घडले. वस्तीमध्ये घरातल्यांनीच गरिबीपायी स्वत:च्या मुलींना विकणे हे सामान्य होते. कृष्णाच्या दोन बहिणींनाही विकले गेले. त्यापैकी एक पुन्हा पळून आली आणि दुसरी बेपत्ता झाली. स्त्रीजन्माचे दु:ख कृष्णाच्या मनावर कायमचे आघात करून गेले.

आपण या परिस्थितीमधून बाहेर यायलाच हवे, असे त्यांनी ठरवले. शाळेत जरा वेगळे वातावरण असे म्हणून शाळेत जाऊ लागले. त्याचवेळी बेकरीमध्ये काम करू लागले. पावाचे गोळे भट्टीत टाकण्याचे काम. अंग पोळून निघे. त्रासाने मन आणि डोळे भरून येई. पण पर्याय नव्हता. पुढे त्याच वातावरणातदहावी झाली. इंद्रजित मिणेकर, बापू कांबळे हे मित्र सोबत होतेच.

शिक्षण घेऊन या परिस्थितीतून बाहेर यावे, असे २४ तास मनात असल्याने कृष्णानी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. फाटके कपडे, वह्या-पुस्तके काही नाहीत. जादा शिकवणीचे तर नावच नाही. पण मनात परिस्थितीवर मात करण्याची जिद्द होती, आग होती. त्यामुळे बापू कांबळे या मित्रासोबत शिक्षण घेऊ लागले. बापू हे नवबौद्ध समाजाचे. त्यावरूनही समाजात उलटसुलट चर्चा सुरू झाली. पण कृष्णाने लक्ष दिले नाही. जिथे शिकता येईल ते ठिकाण महत्त्वाचे असे त्यांनी मानले. वडीलही शिक्षणासाठी थोडीफार मदत करायचेच. वडील सेवानिवृत्त झाले. घरखर्च चालवण्यासाठी त्यांनी वस्तीच्या शिरस्त्याप्रमाणे दारूची भट्टी काढली. त्यामध्ये कृष्णाही काम करू लागले. दारूचे कॅन वाहणे हे त्यांचे काम. लाज, पोलिसांची भीती यामुळे काळीज कुरतडून निघे. पण सांगणार कोणाला?

अशा परिस्थितीमध्ये कृष्णाचे पदव्युत्तर शिक्षण झाले. त्यांनी राज्य सेवा परीक्षेची तयारी सुरु केली.आतापर्यंत आयुष्याने बरेच काही शिकवले होते. जिद्द, कणखरता, मेहनत याची सवयच लागली होती. कृष्णा यांनी राज्य सेवा परीक्षेत यश मिळवायचे ठरवले. छोट्या-मोठ्या कामांबरोबरच दिवस-रात्रअभ्यास करू लागले. किशोरवयापासूनच त्यांच्या समाजातील अरुणा नावाच्या एका मुलीशी त्यांचे भावबंध जुळले होते. १४-१५ वर्षे किंवा दहावी झाली की लग्न झालेच पाहिजे ही समाजाची पद्धत. पण अरुणाने कृष्णासाठी वयाच्या २६व्या वर्षापर्यंत प्रतीक्षा केली. पण ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली.आणि तो दिवस उजाडला
. कृष्णा राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण झाले. ‘क्लास टू’ची नोकरी मिळाली. कृष्णानी अरुणाशी विवाह केला. पण तो न्यायालयामध्ये. पंचायत, चालीरीती डावलून न्यायालयात केला गेलेला हा समाजामधील पहिलाच विवाह. वादळ उठले. बहिष्काराच्या भाषा बोलल्या गेल्या. पंचांनी कृष्णाला बोलावणे धाडले. जे झाले ते झाले. पण ‘पुढे तरी समाजाच्या रीतीनुसार वाग.’ कृष्णा म्हणतात, “मी लग्नानंतर सगळ्या वस्तीचे आशीर्वाद घेतले. पण मी समाजातली नववधूची कौमार्य परीक्षा केली नाही. त्यामुळे मला माझ्या कुटुंबीयांकडूनही त्रास झाला. पण मला समाजाच्या विरोधात जायचे नव्हते. मीसुद्धा समाजाचा भागच आहे. माझ्या बहिणी, वस्ती-समाजातील आयाबाहिणींचे दु:ख जळता निखारा होऊन मनात धगधगतो आहे. त्यामुळे मी समाजामधील अनेक प्रथांवर आवाज उठवला. अर्थात, मला विरोधासाठी विरोध करायचा नव्हता आणि नाही.”

पुढे कृष्णा मुंबईमध्ये धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये लेखा संचालक या उच्चपदापर्यंत पोहोचले. महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजनेची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांचा मुलगा कर्णबधिर आहे. ‘तो कर्णबधिर आहे. कारण, कृष्णा समाजप्रथांच्या विरोधात काम करतो,’ असे बोलणेही कृष्णांना ऐकावे लागते. पण कृष्णा यांनी हार पत्करली नाही. त्यांनी मुलाला सर्वतोपरी उपचार दिले. आज त्यांचा मुलगा मेकॅनिकल इंंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. नरकप्राय जगण्यातून कृष्णांनी स्वत:पुरती सुधारणा केली नाही, तर आजही ते समाजाच्या प्रश्नांवर काम करीत आहेत. कृष्णा म्हणतात की, “समाजाची परिस्थिती सुधारली पाहिजे. त्यासाठी मी काहीही करण्यास तयार आहे. समाजात चांगला बदल होईल. वो सुबह कभी तो आयेगी...”

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat