एक उद्ध्वस्त ‘जिहादी’

    दिनांक  10-Mar-2019   

 
 
 
मार्ग निवडण्यात चूक झाली असेल तर परमेश्वरही साथ सोडून देतो, अशीच काहीशी अवस्था झालेल्या आणि जगभरात ‘जिहादी बेगम’ म्हणून चर्चित असलेल्या शमीम बेगम हिच्या अडचणी थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीत. दि. १७ फेब्रुवारी, २०१९ रोजी जन्मलेल्या तिच्या जर्राहनामक मुलाचा मृत्यू झाला. शुक्रवारी त्याचा दफनविधी झाल्याची माहिती सिरियन डेमोक्रेटिकच्या प्रवक्त्यांनी दिली. साल २०१५... वय वर्ष अवघे १५... मूळची बांगलादेशी... पण ब्रिटिश अल्पवयीन मुलीने इसिसमध्ये जाण्यासाठी लंडनसारख्या शहरातून पळ काढला आणि थेट सीरियात जाऊन पोहोचली. गेल्या महिन्याभरात विविध कारणांनी ती चर्चेत आली होती. आईवडिलांनी तिच्या ‘घरवापसी’साठी ब्रिटन सरकारकडे याचना केली होती. मात्र, अद्याप सरकारकडून तिच्या प्रत्यार्पणासाठी तशी हालचाल झालेली दिसली नाही. स्वतःसह कुटुंबीयांनाही नरकयातना भोगायला लावणाऱ्या ‘बेगम’च्या नशिबी पश्चात्तापाशिवाय दुसरे काहीच हाती आलेले नाही.
 

बेगम २०१५ मध्ये आपल्या मैत्रिणींसह सीरियाला गेल्यानंतर ब्रिटनमध्ये राजकीय तणाव निर्माण झाला. बेगमने तिथल्याच दहशतवाद्याशी निकाह केला. तिथल्या जाचाला कंटाळत तिने ब्रिटनमध्ये परतण्याची मागणी केली होती. वडिलांनीही मुलीला ब्रिटन सरकारने शिक्षा सुनावून देशात परतण्यास संमती मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, ब्रिटिश सरकारने तिचे नागरिकत्व रद्द करण्याचा विचार करत तिला बांगलादेशात नेण्यास सांगितले. ती बांगलादेशची नागरिक नसल्याने तसे करणे शक्य नसल्याचे सांगत मुलीचे वडील आता हतबल झाले आहेत. आंतरराष्ट्रीय समस्या असलेल्या दहशतवादाची पाळेमुळे आज माहितीच्या महाजालात आणखी खोल रूतत चालली आहेत. १५ व्या वर्षी शाळेत हिंडण्याफिरण्याच्या वेळेत कुटुंबीयांसह स्वतःचा जीवही धोक्यात आणणाऱ्या शमीम बेगमला चूक कबूल करून पश्चात्ताप होत असला तरीही वेळ निघून गेल्यावर केलेल्या अशा चिंतनाचा उपयोग हा शून्यच असतो, हेदेखील कळून चुकले असेल. एकीकडे ब्रिटनमध्ये आईवडिलांसह जगता येणारे स्वर्गीय आयुष्य आणि आता जिहादच्या पाठी लागून भोगत असलेल्या नरकयातना दोन्ही गोष्टी जगासमोर आहेतच.

 

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या ४० सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर स्फोटके भरलेला ट्रक घेऊन घुसणारा आदिल अहमद दार उर्फ वकास याचेही डोके भडकविण्याचे काम जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी अशाच प्रकारे केले होते. हल्ल्यानंतर प्रसारित केलेल्या जैशच्या व्हिडिओद्वारे आदिलला ‘शहादत’ मिळेल, या लालसेने हल्ला करण्यास तयार केल्याचे समजते. दरम्यान, शेवटच्या संदेशातही त्याने आपल्या मित्रांना याच दहशतवादाच्या मार्गावर चालण्याचा सल्ला दिला. वर्षभरापूर्वी जैशमध्ये सहभागी झालेला आदिल हा पुलवामा भागातील गिडीबांग या गावात राहत होता. त्याच्या घरच्यांनी प्रसारमाध्यमांसमोर आम्ही त्याला तसे करण्यास रोखल्याचे सांगितले. वर्षभर हल्ल्याची तयारी सुरू होती. मात्र, वर्षभरापासून सुरू असलेल्या मुलाच्या हालचालींबद्दल घरच्यांनीही पोलीस प्रशासनापासून गुप्तता ठेवली, हेही कमालीचे आश्चर्यच.काश्मिरी मुलांची जिहादसाठी माथी भडकविण्याचे काम जमात-ए-इस्लामी करत असल्याची माहिती नुकतीच काश्मिरातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. पहाडी मुलांना जमात-ए-इस्लामी जिहादसाठी भडकवून त्यांचा वापर इसिसच्या कारवायांसाठी केला जात असल्याचा खळबळजनक दावाही केला जात आहे. भारताने जमात-ए-इस्लामीवर यापूर्वीच बंदी आणली आहे. पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी रोजच्या रोज संपर्कात असणाऱ्या या संघटनेचेही जिहादाद्वारे दहशतवाद हेच मनसुबे स्पष्ट होतात. जमात-ए-इस्लामी आपल्या शाळेतील संघटनाचा वापर काश्मिरातील विद्यार्थ्यांमध्ये दहशतवाद पेरण्याचे काम करत असल्याचा आरोपही केला जात आहे. विद्यार्थ्यांना जिहादशी जोडून ‘जामियत-उल-तौबा’ या दहशतवादी संघटनेत सहभागी करण्याचे कामही सध्या सुरू आहे. ‘इंडियन हुर्रियत कॉन्फरन्स’चाही यामागे हात आहे. काश्मीर पाकिस्तानात सामील व्हावा यासाठी सुरू असलेल्या या कुरापती आणि काश्मीरसह जगभराला लागलेली ही दहशतवादाची कीड ही ‘जिहाद’च्या आडून लागत जाते आणि शमीम बेगम, आदिल अहमद दार याच्यासह असंख्य जणांच्या आयुष्याची राखरांगोळी करून उद्ध्वस्त जिहादी बनते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat