प्राण्यांना नवी दृष्टी देणारी कस्तुरी!

    दिनांक  10-Mar-2019   


 


मुक्या प्राण्यांच्या अव्यक्त भावना जाणून घेत त्यांच्या डोळ्यांना होणाऱ्या त्रासातून त्यांना मुक्त करणाऱ्या पशुनेत्रचिकित्सक डॉ. कस्तुरी भडसावळे यांच्याविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी जाणून घेऊयात आजच्या या लेखातून...


डोळे माणसाचे सर्वस्व आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. कारण, डोळ्यांमुळे माणूस हे जग पाहू शकतो. आपल्या चर्मचक्षूंच्या आधारे माणूस जगभरातील विविध रंगांचा आनंद घेऊ शकतो. नाटक, चित्रपट यांसारख्या मनोरंजनात्मक कलाकृतींचे नेत्रसुख घेऊ शकतो. डोळ्यात बारीकसा धुळीचा कण गेला आणि तो धुलिकण निघत नसेल, तर माणूस अस्वस्थ होतो. तो धुलिकण डोळ्यातून निघेपर्यंत माणूस बेचैन असतो. पण आपण कधी विचार केला का, प्राण्यांचे याबाबतीत काय होत असेल? माणसाच्या डोळ्यांना होणारी वेदना त्याला बोलून दाखवता येते. परंतु, मुक्या प्राण्यांना माणसाप्रमाणे भावना व्यक्त करता येत नाहीत. मुक्या प्राण्यांच्या अव्यक्त भावना जाणून घेत त्यांच्या डोळ्यांना होणाऱ्या त्रासातून त्यांना मुक्त करणाऱ्या पशुनेत्रचिकित्सक डॉ. कस्तुरी भडसावळे यांच्याविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी जाणून घेऊयात आजच्या या लेखातून. “प्राणी आपल्या वागण्यातून त्यांना होणारा त्रास आपल्या मालकाच्या निदर्शनास आणून देतात. कुत्रा, मांजर हे प्राणी शांत राहून आपल्या शरीरात होणाऱ्या वेदनामय कलहाला वाट मोकळी करून देतात. मग ‘हल्ली आमचा मोती, शांत-शांत असतो, जमिनीवर निपचित पडलेला असतो. नीट खातही नाही,’ अशा प्रकारच्या तक्रारी प्राणिप्रेमींकडून ऐकू येऊ लागतात. आपल्या पाळीव प्राण्याच्या वर्तनात झालेला हा बदल पाहून प्राणिप्रेमींनी त्यामागील मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करावा,” असा सल्ला डॉ. कस्तुरी भडसावळे देतात.

 

कुत्रा किंवा मांजर यांच्या डोळ्यातून जर सतत पाणी वाहत असेल, तर नक्कीच त्या प्राण्याला त्रास होत आहे. हे लक्षात घेऊन त्याला वेळीच पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी न्यावे. याबाबतीत टाळाटाळ करू नये. कारण, बऱ्याचदा प्राणीदेखील माणसाप्रमाणेच त्यांना होणारा त्रास अंगावर काढतात. सहन होईपर्यंत प्राणी त्यांच्या डोळ्यांना होणारा त्रास आपल्या मालकाच्या निदर्शनास आणून देत नाहीत. पण एकदा का, त्यांच्या या सहनशक्तीचा अंत झाला की, मग त्यांची दयनीय अवस्था होते. त्रास सहन होत नसतो आणि नेमका त्रास काय हे प्राण्यांना सांगताही येत नसते. “पाळीव प्राण्यांची अशी बिकट अवस्था होण्यापूर्वीच त्यांना पशुवैद्यकाकडे घेऊन जा. त्यांच्यावर उपचार करा. प्राण्यांच्या डोळ्यातून सतत वाहणाऱ्या पाण्याकडे दुर्लक्ष करू नका,” डॉ. कस्तुरी हा मोलाचा उपदेश त्यांच्याकडे उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक प्राणीप्रेमींना देतात. डॉ. कस्तुरी यांनी आजवर अनेक प्राण्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करून त्यांना जीवदान दिले आहे. “पप्स, शिट्झू अशा कुत्र्यांच्या विविध प्रजाती असतात. या प्रजातीत मधुमेह व त्यामुळे मोतिबिंदू होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते,” असे डॉ. कस्तुरी सांगतात. नेरळमधील ५५ एकर जमिनीवर असलेल्या ‘सगुणाबाग’ या फार्महाऊसमध्ये डॉ. कस्तुरी लहानाच्या मोठ्या झाल्या. बालपण प्राण्यांच्या सहवासात आनंदात व्यतित झाल्याने प्राण्यांविषयी असणाऱ्या प्रेमापोटी कस्तुरी भडसावळे यांनी पशुवैद्यकीयशास्त्राचा अभ्यास करण्याचे ठरवले. २००४ मध्ये कस्तुरी यांनी मुंबई येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातून पदवी संपादन केली. दरम्यान, कस्तुरी यांच्या लक्षात आले की, आपल्या देशात पशुवैद्यकीय रुग्णालये अनेक आहेत. परंतु, प्राण्यांच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी, प्राण्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्याची सोय उपलब्ध नाही. त्यासाठी डॉ. कस्तुरी यांनी इस्रायल आणि अमेरिकेमध्ये पशुवैद्यकीय नेत्रचिकित्सा अभ्यासक्रमाचे धडे गिरवले. शिक्षण पूर्ण झाल्यावर २००९ साली डॉ. कस्तुरी आपल्या पतीसह ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाल्या. तेथे त्यांनी चार वर्षे प्राण्यांच्या डोळ्यांवरील शस्त्रक्रियेचा सराव केला. मेलबर्न आणि ऑस्ट्रेलियामध्ये डॉ. कस्तुरी यांनी नेत्रचिकित्सा सल्ला केंद्र सुरू केले.

 

गेंडा, घोडा, साप, कुत्रा, मांजर या प्राण्यांना तसेच इतर पशु-पक्ष्यांना दृष्टी देणारा पशुवैद्यकीय दवाखाना मुंबईतील चेंबूर येथे डॉ. कस्तुरी यांनी सुरू केला आहे. भारतातील हा पहिला पशुनेत्रचिकित्सक दवाखाना असून या दवाखान्यात प्राण्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रियाही केली जाते. या दवाखान्याद्वारे त्यांनी भारतात पशुवैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यास सुरुवात केली. “संधी मिळाल्यास मला महाराष्ट्रातील शासकीय अभयारण्यातील प्राण्यांच्या डोळ्यांवरील शस्त्रक्रिया सेवा करायला आवडेल. त्यासाठी मी इच्छुक असून हा माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान असेल,” असे डॉ. कस्तुरी यांनी सांगितले. “प्राण्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करून त्यांची वेदना दूर करता येते. परंतु, जर शस्त्रक्रियेनंतर प्राण्यांच्या डोळ्यांची योग्य काळजी घेतली गेली नाही, तर त्यांचा नेत्रविकार बळावू शकतो,” असे डॉ. कस्तुरी नमूद करतात. पाळीव प्राण्यांचे प्रकृतीस्वास्थ सुधारण्यामध्ये त्यांच्या मालकांच्या प्राणिप्रेमाची महत्त्वाची भूमिका असते. ती म्हणजे शस्त्रक्रियेनंतर प्राण्यांची योग्य ती देखभाल करणे. ही भूमिका जर त्यांनी व्यवस्थितरित्या बजावली, तर त्या पाळीव प्राण्यांसाठी डोळ्यांची शस्त्रक्रिया ही पुनर्जन्म देणारी ठरते. आपल्या ज्ञानचक्षूंच्या आधारे प्राण्यांना नवी दृष्टी देणाऱ्या डॉ. कस्तुरी भडसावळे यांना ‘दै. मुंबई तरुण भारत’चा सलाम!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat