वीरांगना निघाली रणांगणा!

    दिनांक  01-Mar-2019   


 

२०१७ साली वीरमरण आलेल्या प्रसाद महाडिक यांच्या पत्नीने पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाच्या ३१व्या वर्षी लष्करात सामील होण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्या या छोट्याशा प्रवासाची कहाणी रंजक आहे.

 

विपत्ति जब आती है,

कायर को ही दहलाती है,

सूरमा नहीं विचलित होते,

क्षण एक नहीं धीरज खोते,

विघ्नों को गले लगाते हैं!

 

या रामधारी सिंह दिनकर यांच्या ’वीर’ या कवितेतील काही ओळी. या ओळी खरेतर देशासाठी लढणार्‍या प्रत्येक जवानाकरिताच आहेत. पण सीमेवर अहोरात्र देशासाठी झगडणार्‍या या जवानांचे कुटुंबही चोवीस तास आपत्तींशी लढत असते. म्हणजे आपला भाऊ, पती, मुलगा हा सीमेवर शत्रूच्या एका गोळीच्या अंतरावर आहे, हे वास्तव भयावह असले तरी, ते सत्य आहे, हे त्यांना मान्य करावे लागते. त्यात वीरपत्नीचे आयुष्य आणखी खडतर. एका मुलीच्या लग्नानंतर काही माफक अपेक्षा असतात, ज्याच्यासोबत आयुष्यभराची गाठ बांधली गेली आहे, त्यांच्यासोबतच आयुष्य काढावं. पण, वीरपत्नीच्या आयुष्यात हा विरह जणू लिखितच असतो. तो विरह सहन करीत दु:ख झेलत आयुष्य कंठायचे असते. पण या सगळ्याच्याही पलीकडे विचार करून, आपल्या पतीच्या स्वप्नपूर्तीसाठी सध्या झटत आहे ती तेज तपस्विनी गौरी महाडिक. २०१७ साली वीरमरण आलेल्या प्रसाद महाडिक यांच्या पत्नीने आपल्या पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाच्या ३१व्या वर्षी लष्करात सामील होण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्या या छोट्याशा प्रवासाची कहाणी रंजक आहे.

 

गौरी यांचं आयुष्य अगदी सामान्य मुलींसारखं. २०१४ साली घरच्यांनी लग्नासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. तेव्हा तिने विवाहासाठीच्या एका संकेतस्थळावर आपले नाव नोंदवले आणि मेजर प्रसाद महाडिक यांच्याशी त्यांची ओळख झाली. मात्र, प्रसाद यांनी त्यांना जवानाशी लग्न करणं एवढी सोपी गोष्ट नाही, याची जाणीव करून दिली. पण स्वत: वकिलीचे शिक्षण घेतल्यामुळे गौरी यांना सगळ्या बाजूंनी विचार करत, आपला होकार कळवला. गौरी आपल्या लग्नाबद्दल सांगताना हसत म्हणाल्या की, ”घरात सगळेच मला समजवत होते की, जवानाशी लग्न करणे सोपे नाही किंवा तुला जमेल का? पण मला माहीत होतं की मला काय करायचं आहे आणि मी तेच केलं. प्रसाद यांच्या पोस्टिंगमुळे तीन वेळा तारखा बदलल्यानंतर अखेर आमचा साखरपुडा झाला. तेव्हा जाणवलं की, बापरे कठीण आहे एका जवानाशी लग्न करणं.”

 

२०१५ मध्ये गौरी आणि प्रसाद यांचा विवाह झाला. पण त्यांच्या सुखाच्या संसारात नियतीच्या मनात काही तरी वेगळे होते. लग्नाला दोनच वर्ष पूर्ण झाली असताना, दि. ३० डिसेंबर, २०१७ रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे लष्करी तंबूला भीषण आग लागली. चीनशी दोन हात करताना इंडो-चायना सीमेवरील तवांग सेक्टरमध्ये आपले कर्तव्य बजावत असताना आगीत होरपळून प्रसाद यांना वीरगती प्राप्त झाली आणि गौरी यांचं आयुष्य पत्त्यांच्या बंगल्यासारखं कोलमडलं. या प्रसंगाबद्दल सांगताना गौरी म्हणतात की, ”आदल्या दिवशीच संध्याकाळी आमचं बोलणं झालं. थोडे खटकेच उडाले होते. ३० तारखेला सकाळी नाश्ता करत असतानाच मला फोनवरून ही बातमी कळली आणि मी सुन्न झाले. मला सतत वाटायचं की आता, घराचं दार उघडून प्रसाद येतील आत पण...” आपल्या आयुष्यात तयार झालेल्या या पोकळीवर मात करतच गौरी यांनी लष्करात जाण्याचा निर्णय घेतला. याबद्दल प्रसाद यांचे वडील गणेश महाडिक यांनी, ”मला अभिमान आहे, या गोष्टीचा की गौरीने लष्करात सामील व्हायचा निर्णय घेतला. कारण, शेवटी माझ्या मुलाचं स्वप्न माझी मुलगी पूर्ण करते आहे.”

 

गौरी या वकील असून एका नामांकित कंपनीमध्ये मोठ्या पदावर कार्यरत होत्या. मात्र, लष्करात भरती होण्याच्या इच्छेने त्यांनी आपली नोकरी सोडली आणि लष्कर भरतीच्या परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली. ”प्रसाद गेल्यानंतर पहिले दहा दिवस अतिशय खडतर होते. मात्र, अकराव्या दिवशी मी ठरवलं. आता रडत बसायचं नाही. त्याच दिवशी सासर्‍यांना सांगितलं आणि सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीस सुरुवात केली,” असे गौरी सांगतात. केवळ त्यांनी लष्करात सामील होण्याची इच्छा बाळगली नाही, तर सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या ऑनलाईन परीक्षेत त्या फक्त उत्तीर्ण झाल्या नाहीत, तर त्यांनी या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला. आता चेन्नई येथे एप्रिलमध्ये होणार्‍या लष्करी अधिकारी प्रशिक्षण केंद्रात त्या दाखल होणार आहेत. या प्रशिक्षणानंतर त्यांची थेट लेफ्टनंटपदी नियुक्ती होणार आहे. आपल्या या निर्णयाबद्दल गौरी म्हणतात की, ”परिस्थितीवर मात कशी करायची हे मी माझ्या पतीकडूनच शिकले, त्यामुळे ही जबाबदारी स्वीकारताना मी जराही विचार केला नाही. वकिली हा माझा पेशा राहीलच, पण माझं कर्तव्य हे सध्या देशासाठी असेल.” अगदी लहान लहान गोष्टींमुळे स्वत:वरचा आत्मविश्वास हरवून बसणार्‍या तरुणांसाठी गौरी ही नक्कीच एक आदर्श आहे. कारण, गौरी यांनी

 

है कौन विघ्न ऐसा जग मे,

टिक सके आदमी के मग मे?

खम ठोंक ठेलता है जब तू

पर्वत के जाते पाँव उखड,

मानव जब जोर लगाता है,

पत्थर पानी बन जाता है।

 

या दिनकर यांच्या ओळी सार्थ ठरविल्या.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat