सुकून की कली ना खिलेगी...

    दिनांक  01-Mar-2019   


मसूद अझहर सध्या आजारी असून घराबाहेर पडणंही त्याला शक्य होत नसल्याची माहिती शाह मेहमूद कुरेशी यांनी दिलेली आहे. आता मसूद अझहर आजारी आहे, असा शोकसंदेश देणारे शाह मेहमूद कुरेशी हे मसूद अझहरचे सचिवही नाहीत की प्रवक्तेही नाहीत तर ते आहेत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री.

 
मसूद अझहर आजारी आहे, तो घराच्या बाहेर निघू शकत नाही याची काळजी, चिंता की दुःख व्यक्त केले, हे काही कळत नाही. मात्र, यातून कुरेशींनी संदेश द्यायचा प्रयत्न केला की, जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आजारी आहे हो...आणि इतका आजारी की, तो घराच्या बाहेरही पडू शकत नाही. घराच्या बाहेरही पडू शकत नाही म्हटले की तो पाकिस्तानच्या सीमेपार दहशतवादी कारवाया कसा करू शकेल? असा तर तर्कवाद कुरेशी आणि पर्यायाने पाकिस्तानला लढवायचा नाही ना. अर्थात तसे असेलही कारण तर्कहीन विचार आणि कृती करत दुसर्‍यांना त्यातही आजवर भारताला त्रास देण्यामध्ये पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर आहे. यापूर्वी पाकिस्तान सातत्याने आगळीक करायचा आणि वर तोंड करून म्हणायचाही की, हे कृत्य अमनपसंद पाकिस्तानचे नाही. हे दहशतवादीही नाहीत तर ते भारतातील स्वातंत्र्यवीर आहेत. स्वातंत्र्यासाठी दहशतवाद करत आहेत. पाकिस्तान तुणतुणे वाजवत राहिला की आमच्या जमिनीवर दहशतवाद्यांना थारा नाही. मात्र, आता मेहमूद थेट म्हणाले की, हो तो आजारी आहे. घराबाहेर निघू शकत नाही. तो आजारी आहे. या सबबीखाली काही दिवस टाळाटाळ चालू शकेल.

असो. दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी तर परिषदा घेऊन युद्धाचे परिणाम कसे घातक आहेत, याचा धोशाच लावला होता. आपल्यावर कसा अन्याय होतो, असे म्हणत कांगावा करणे, आपण किती चांगले आहोत आणि तरीही आपल्याला शेजारील राष्ट्राची दादागिरी सहन करावी लागते, असे खोटेनाटे आरोप करत मगरीचे अश्रू वाहणे यात पाकिस्तानचा हात कोणी धरू शकत नाही. पाकिस्तान हा देश कसा आहे? त्याची मानसिकता काय आहे? याचा मागोवा हा पुलवामा ते विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका या सर्व घटनांमधून घेता येतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवाद पेरणार्‍या आणि माजवणार्‍या या देशाने या सर्व घटनाक्रमामध्ये स्वतःला अतिशय साळसूद भासवण्याचा प्रयत्न केला.

मात्र,दुसरीकडून स्वतःच्याविघातक कारवाया सुरूच ठेवल्या. विंग कमांडर अभिनंदन यांना पुन्हा भारतात परत पाठविण्याचा निर्णय तर पाकिस्तान असा सांगत आहे की, जसे काही युद्धात जिंकलेल्या राजाने हरलेल्या शत्रूचे राज्य त्याला परत दिले. वर पाकिस्तान असाही आव आणत आहे की, त्यांना माणुसकी आहे आणि शांती हवी आहे. याची पहिली पायरी म्हणून त्यांनी विंगकमांडर अभिनंदन यांना सोडले. दया, करुणा, क्षमा वगैरे भावनांचे नाटक रंगवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे. पण हे सत्य आहे का?

जिनिव्हा करार काय होता, हे आज मोबाईल क्रांतीमुळे खेडोपाडी पोहोचले आहे. तसेच आज जगात एकट्या पडलेल्या पाकिस्तानला दुसरा पर्याय होता कुठे? भिकीस्तानच्या वाटेला लागलेल्या पाकिस्तानला युद्ध परवडणारे झेपणारे नव्हतेच हे कुणीही सांगेल. पण गिरे तो भी टांग उपरचा पाकिस्तानचा बाणा आहे. पाकिस्तानचा दोस्त म्हणून मिरवणार्‍या चीननेही पाकिस्तानला आपल्या यारीचा हात दिला नाही. उलट पाकिस्तानमधली आपली हवाई वाहतूकही बंद केली. इस्लामिक राष्ट्रांनीही पाकिस्तानला ठेंगाच दाखवला आहे.

 

असो, विंग कमांडर अभिनंदन यांचे पाकिस्तानमधील रक्तबंबाळ अवस्थेमधील फोटो पाहताना सारे जग हळहळत होते. त्यावेळी विणा म्हणाली, “अभी अभी तो आये है, अभी अच्छे से मेहमाननवाजी होगी.” ही तीच वीणा जिला बिग बॉस ४ मध्ये भारतीयांनी डोक्यावर घेतले होते. केलेले उपकार विसरणे, उगीचच नको त्या गोष्टी करणे, बोलणे आणि तोंडावर आपटणे हे पाकिस्तानचे गुणधर्म पाकिस्तानी विणा मलिकमध्ये आहेत, यात काही संशय नाही. त्यामुळे यापुढेही पाकिस्तानसुधारेल की नेहमीसारखा दबा धरून बसलेल्या लांडग्यासारखा वागेल? याचा काही नेम नाही. पण तसे जरी झाले तरी आता भारत दबा धरलेल्या लांडग्याकडूनही उठाबशा काढायला लावू शकतो, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे मसूद अझहर आजारी असो का अल्लाघरी गेलेला असो, पाकिस्तानला प्रत्येक पापाचा हिशेब द्यायची वेळ आली आहे. आतंक का कारवाँ बनाया था.. सुकून की कली ना खिलेगी... हीच नियती आहे...

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat