श्रीगुरुजी आणि पाकिस्तान

01 Mar 2019 18:27:04


 


आज भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसते. सोबतच आज रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक श्री गोळवलकर गुरुजी यांचीही जयंती. श्रीगुरुजी व पाकिस्तानी आक्रमण याबाबत जाणून घेऊया..

 

सध्या प्रसिद्धी माध्यमात भारत-पाकिस्तान युद्ध होणार का?’ याची चर्चा चालू आहे. बालाकोट येथे भारतीय वायुसेनेने, दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर केलेला हल्ला आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून पाकिस्तानने भारतीय हद्दीत शिरून केलेली हवाई बॉम्बफेक, या घटना युद्धाच्या चर्चेची भूमिका तयार करतात.

 

चर्चा म्हटली की, तज्ज्ञ आले. तज्ज्ञ आले की, आकडेवारी आली, वेगवेगळे दाखले आले आणि याची चर्चा दूरचित्रवाणी वाहिन्यांवर चालली आहे. भारताकडे किती लाख सैन्य आहे, पाकिस्तानकडे किती लाख सैन्य आहे, हवाईदलात किती विमाने आहेत, दोन्ही देशांकडे रणगाडे किती आहेत, क्षेपणास्त्रे किती आहेत आणि शेवटी अणुबॉम्ब किती आहेत, याची आकडेवारी दिली गेली आहे.

 

ऐकणार्‍याला जणू काही वाटावे की लढाई रणगाड्यांची, हवाईदलांची, क्षेपणास्त्रांची आणि अणुबॉम्बची होणार आहे. लढाई कधीही शस्त्रांमध्ये होत नाही. लढाई दोन विचारधारा, दोन मनोवृत्ती यांच्यात होत असते आणि या लढाईसाठी शस्त्रांचा वापर होत असतो. युद्धाला हेतू लागतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाला हेतू कोणता राहील? भारताचा हेतू भूमी जिंकून घेण्याचा असणार नाही. पाकिस्तानची भूमी जिंकणे म्हणजे पाकिस्तानातील मुसलमानांना आपल्या ताब्यात आणणे, असा त्याचा अर्थ होतो. काश्मीर खोर्‍यातील तीन जिल्ह्यांतील मुसलमान केवढी दहशत निर्माण करीत आहेत, याचा अनुभव आपण घेतो. पाकिस्तानची भूमी जिंकणे म्हणजे भयानक कटकटी आपल्या डोक्यावर आणि गळ्यात बांधून घेण्यासारख्या आहेत. हा मूर्खपणा कोणतेही शासन करणार नाही. इथे काहीजण प्रश्न करतील की अखंड भारताचे काय? त्या प्रश्नाची चर्चा नंतर करता येईल.

 

युद्ध करण्याचा पाकिस्तानचा हेतू काश्मीर जिंकून घेण्याचा असू शकतो. तसा प्रयत्न त्याने १९४८ आणि १९६५ ला केला, पण तो फसला. पाकिस्तानला पराभूत व्हावे लागले. सैन्यशक्तीच्या बळावर पाकिस्तान भारताची एक इंच भूमीदेखील जिंकू शकत नाही. पाकिस्तानचा दुसरा हेतू भारताला जिंकून इस्लामी राज्य आणण्याचा असू शकतो, हे इस्लामी भूत पाकिस्तानच्या मुल्ला आणि मौलवींच्या डोक्यात आहे. काही सेनाधिकार्‍यांच्या डोक्यातही असू शकते. जनरल झिया त्यांचा बाप होता.

 

जागतिक परिस्थिती अशा प्रकारच्या धार्मिक उन्मादाला लाथाडणारी आहे. मध्ययुगातील धार्मिक उन्मादाचा विषय आताच्या विज्ञान युगात राहिलेला नाही आणि तशातही पाकिस्तानने तसा प्रयत्न केल्यास पाकिस्तानच्या हे लक्षात येईल की, भारतात आता मध्ययुगातील हिंदू राहत नाहीत. मार खाणारा हिंदू इतिहासजमा झाला, आता मार देणारा हिंदू उभा राहिलेला आहे. साबरमती एक्सप्रेसच्या प्रलयकांडाला त्याने उत्तर दिलेले आहे. बाबरीची माती करून त्याने आम्ही काय करू शकतो, हे जगाला दाखवून दिलेले आहे. पूर्वी शिवाजी एकटाच होता, जो अफजलखानाचे पोट फाडू शकत होता. आज ही शिवाजीची औलाद देशाच्या कानाकोपर्‍यात उभी राहिलेली आहे. म्हणून भारताला जिहादच्या मार्गे इस्लाम करण्याचे स्वप्न पाहणार्‍यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की, हिंदूने आता आपल्या बोटावर सुदर्शन चक्र धारण केलेले आहे.

 

दिखाव्यासाठी का होईना, पाकिस्तानात लोकशाही आहे, लोकांनी निवडून दिलेले पंतप्रधान आहेत. त्यांचे डोके खाकी नाही. युद्ध म्हणजे काय आणि त्याचे भयानक परिणाम काय असतील, हे या पंतप्रधानांना समजते. आपण वार्तालाप चालू ठेवला पाहिजे, असे ते म्हणतात. पाकिस्तानातील ही जी सिव्हिल लीडरशीप आहे, ती थोडी शहाणी आहे. भारताच्या हल्ल्याला जवाब द्यायचा तर काय करायचे? भारतात दहशतवादी अड्डे नाहीत, हिंदूंनी दहशतवादी कॅम्प उभे केले नाहीत, आणि जर सैन्य तळावर हल्ले केले, नागरी तळावर हल्ले केले, तर भारत त्याला जशास तसे उत्तर देईल. हल्ल्यात भारताचे नुकसान होईल, पण पाकिस्तानची राख होईल. ही वस्तुस्थिती असल्यामुळे पाकिस्तान केवळ वल्गनाच करीत राहील, खोटी वक्तव्ये करीत राहील, ती त्याची मजबुरी असेल. इमरान खानलाही पंतप्रधानपदावर राहायचे आहे, आपणही काही तरी करतो आहोत, असे त्यांना दाखविणे आवश्यक आहे.

 

असे असले तरी, देश आज एका नाजुक परिस्थितीत आहे. आपली मान ताठ ठेवण्यासाठी, आपला आत्मसन्मान जपण्यासाठी आणि शत्रूला जशास तसे उत्तर देण्यासाठी आपण सदैव सिद्ध असले पाहिजे. जनतेच्या स्तरावर मजबूत एकजूटच पाहिजे. श्रीगुरुजींचा जन्मदिवस मार्च (विजया एकादशी) आहे. श्रीगुरुजींचे या संदर्भातील मार्गदर्शन चिरकाल दिशा देणारे आहे. चीनचे आक्रमण झाल्यानंतर ते म्हणाले, “संकट मोठे आहे आणि खरे आहे. या कारणांमुळे जनतेचे मनसंतुलन, धैर्य, परस्पर विश्वास, सहकारिता आणि संकटावर विजय मिळवून, राष्ट्राची ध्वजपताका उंच ठेवण्याचा दृढविश्वास सर्वांच्या मनात पाहिजे. श्रम, कर्तव्यनिष्ठा, सर्वस्वार्पणाची सिद्धता, धैर्य, वीरता आणि वाटेल ते श्रम करण्याची सिद्धता आपण ठेवली पाहिजे.श्रीगुरुजी पोकळ शब्दांचा वापर करीत नसत. भाषेचे सौंदर्य खुलावे म्हणून शब्दांची रचना त्यांची नसे. आपण जो बोलतो ते करण्यासाठी आहे, आचरणात आणण्यासाठी आहे, हा भाव त्यामागे आहे.

 

पाकिस्तानविषयी श्रीगुरुजींच्या भूमिका अत्यंत स्पष्ट असत. पाकिस्तान शत्रूराष्ट्र आहे आणि शत्रूशी शत्रूप्रमाणेच व्यवहार करायला पाहिजे. १९६५ साली पाकिस्तानने भारतावर आक्रमण केल्यावर ते म्हणतात, “पाकिस्तानने केलेल्या आक्रमणामुळे आपल्या देशात युद्धाने गंभीर रूप धारण केलेले आहे. आपल्या सर्वांना परिस्थितीचे आव्हान स्वीकारले पाहिजे. दृढता आणि धैर्यपूर्वक चालून, पूर्ण सफलता प्राप्त करावी लागेल. म्हणून मी सर्व देशवासी आणि विशेष करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवक बंधूंना आवाहन करतो की, ज्या ज्या समस्या निर्माण होतील, त्या दूर करण्यात शासनास पूर्ण सहकार्य करावे.

 

श्रीगुरुजींच्या काळात शासन संघविरोधी होते. आजचे शासन संघ स्वयंसेवकांचे आहे. त्यामुळे शासनाला सहकार्य करा, असे नव्याने सांगण्याची गरज नाही. आजच्या परिस्थितीत अंतर्गत शांतता राहणे, कोणत्याही प्रकारचे सामाजिक आणि धार्मिक तणाव निर्माण होणार नाहीत, याकडे जागरूक राहून लक्ष द्यायला पाहिजे. पाकिस्तानबरोबरचा सध्या सुरू असलेला संघर्ष आणखी काही दिवसांनी शांत होण्याची शक्यता जितकी आहे, तितका तो चिघळण्याचीही शक्यता आहे. पाकिस्तान चालविणारी डोकी खाकी आहेत. इमरान खान शोभेचे पंतप्रधान आहेत आणि पाकिस्तानातील खाकी डोक्यांना राजनीती समजते किंवा त्यांच्याकडे राजनैतिक चातुर्य आहे, असा काही त्यांचा इतिहास नाही. ते कोणतीही कृती करू शकतात. यासाठी आपल्याला सावध तर राहिलेच पाहिजे आणि नित्यसिद्ध असले पाहिजे.

 

श्रीगुरुजी या संदर्भात म्हणतात, “आम्ही सर्व म्हणजे शेतकरी, श्रमिक, उद्योगपती त्याचप्रमाणे जीवनाच्या अन्य क्षेत्रांत काम करणार्‍यांनी सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनात वृद्धी करण्याचा एकत्रित प्रयत्न केला पाहिजे. कोणत्या ना कोणत्या प्रकारे युद्धाच्या स्थितीत जगण्याची जी अवस्था आहे, ती लवकर संपेल, असे वाटत नाही. या दीर्घकालीन संघर्षाचा सामना आम्हाला धैर्य, साहस आणि नित्यसिद्धता याने करावा लागेल.

 

पाकिस्तान भारतावर १९६५ सालाप्रमाणे किंवा कारगीलप्रमाणे आक्रमण करील काय? आणि समजा, त्याने केले तर आपण काय करायला पाहिजे? याबद्दल श्रीगुरुजींनी १९७१ साली जे म्हटले ते असे आहे, “जर पाकिस्तान भारतावर आक्रमण करण्याचे दुःसाहस करण्याचा प्रयत्न करील, तर शासनाने हिंमत आणि दृढतेचा अनुभव देत भारताच्या पराक्रमी सेनेच्या बळावर पाकिस्तानला असा धडा द्यावा की, पुन्हा आक्रमण करण्याची शक्तीच कायमची संपून जाईल.

 

आज आपल्या देशात सर्वसामान्य माणसाच्या मनात पाकिस्तानबद्दल भयंकर चीड आहे. तेवढीच चीड काश्मीरमध्ये आझादीची घोषणा करणार्‍यांच्या संदर्भात आहे. काश्मीरच्या फुटीरतावादी मुसलमानांना आपण का पोसायचे, त्यांच्या रक्षणासाठी आपल्या सैन्याचा बळी का द्यायचा, ते जर स्वत:ला भारतीय म्हणायला तयार नसतील तर त्यांची चिंता आपण कशाला करायची, काश्मीरमध्ये जाऊन मला जमीन घेता येत नसेल, नोकरी करता येत नसेल, मालमत्ता मिळविता येत नसेल, तर त्यांच्या रक्षणासाठी मी कर का भरायचा? काश्मीरला भारतापासून वेगळे ठेवण्याचे महापाप घटनेच्या ३७० कलमाने केले आहे. ते कधी जाणार, ही भारतीय जनतेची मागणी आहे. ज्यांना आझादी पाहिजे त्यांना आझाद काश्मीरमध्ये पाठवून दिले पाहिजे. राष्ट्रीय ऐक्य आणि राष्ट्राची एकात्मता दृढ करण्यासाठी जर आम्ही, घटनेच्या उद्देशिकेत संकल्प करीत असू, तर त्या संकल्पाची अंमलबजावणी करण्याची वेळ आता आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0