साहित्य रसिकांसाठी ‘त्रिवेणी साहित्य संगमा’ची पर्वणी

    दिनांक  08-Feb-2019
 

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे आयोजन

 

वाई : ग. दि. माडगूळकर तथा ‘गदिमा’, सुधीर फडके तथा ‘बाबूजी’ आणि पु. ल. देशपांडे तथा ‘पु.ल.’ ही महाराष्ट्राची तीन लाडकी व्यक्तिमत्वे. मराठी साहित्य-कलाप्रेमी रसिकांचे भावविश्व समृद्ध करणार्‍या या तीनही व्यक्तिमत्वांचे जन्मशताब्दी वर्ष सध्या सुरू आहे. त्यामुळे या तिघांनाही आदरांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने ‘त्रिवेणी साहित्य संगमया विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शनिवार दि. ९ फेब्रुवारी आणि १० फेब्रुवारी रोजी द्रविड हायस्कूल, वाई, जि. सातारा येथे हा ‘त्रिवेणी साहित्य संगमा’चा साहित्य रसिकांना आनंद घेता येणार आहे. या तीनही व्यक्तिमत्वांवर प्रेम करणार्‍या मराठी रसिकांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे.

 

कार्यक्रमाची रूपरेषा

 

राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, वाई येथील द्रविड हायस्कूल येथे हा दोन दिवसीय कार्यक्रम होणार असून शनिवार, दि. ९ फेब्रुवारी २०१९ रोजी राज्याचे सांस्कृतिक कार्य व मराठी भाषा मंत्री विनोद तावडे आणि ९२ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमात मराठी विश्वकोशाच्या ज्ञानमंडळाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण, कुमार विश्वकोश खंड २ भाग ३ चे संकेतस्थळावर लोकार्पण आणि मराठी विश्वकोशाच्या सूचीखंडाचे प्रकाशन होणार आहे. त्यानंतर ‘ग. दि. माडगुळकर यांची प्रतिभासृष्टी’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून यामध्ये अभिनेते अरूण नलावडे, दिग्दर्शक राजदत्त, गदिमांच्या साहित्याच्या इंग्रजी भाषांतरकार विनया बापट, साहित्यिक प्रा. डॉ. सिसिलिया कार्व्हालो आदी सहभागी होणार आहेत तर सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ करणार आहेत. यानंतर ‘बहर गीतांचा व कवितांचा’ या कार्यक्रमातून कवी अरुण म्हात्रे, महेश केळुसकर व अशोक नायगांवकर हे गदिमा आणि बाबूजींच्या रचनांचे तसेच आधुनिक कवितांचे भावविश्व गप्पांमधून उलगडणार आहेत. त्यानंतर माजी सनदी अधिकारी व लेखक अविनाश धर्माधिकारी यांचे ‘गीतरामायणाचा महाराष्ट्रावर झालेला सांस्कृतिक परिणाम’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. पहिल्या दिवसाखेरीस गायक जितेंद्र अभ्यंकर, सावनी दातार, ऋषिकेश बडवे, श्रृती देवस्थळी यांची ‘प्रतिभा संगम’ ही विशेष गायन मैफील आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये आनंद माडगूळकर यांचाही विशेष सहभाग असेल. या कार्यक्रमाची संकल्पना प्रकाश भोंडे यांची असून संहिता निवेदन अरुण नूलकर करणार आहेत.

 

दुसर्‍या दिवशी म्हणजे रविवार, दि. १० फेब्रुवारी २०१९ रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी हे ‘पु. ल. देशपांडे...या सम हा!’ या कार्यक्रमातून पुलंचा जीवन आणि लेखनप्रवास मांडणार आहेत. यानंतर पुलंच्या प्रकाशित व अप्रकाशित साहित्याचे अभिवाचन होणार असून या कार्यक्रमात अभिनेते राहुल सोलापूरकर, गिरीश ओक व योगेश सोमण सहभागी होणार आहेत. यानंतर ‘पु. ल. देशपांडे यांचे साहित्यिक व सामाजिक योगदान’ या विषयावर होणार्‍या चर्चासत्रात सिनेसमीक्षक व ‘भाई’ या चित्रपटाचे पटकथालेखक गणेश मतकरी, अभिनेत्री-गायिका फैय्याज शेख, ज्येष्ठ सांस्कृतिक समीक्षक दिनकर गांगल, साहित्यिका मंगला गोडबोले आदी सहभागी होणार आहेत. या सत्राचे सूत्रसंचालन अभिनेते राहुल सोलापूरकर करणार आहेत. यानंतर या दोनदिवसीय कार्यक्रमाच्या समारोपसत्रात या तीनही महान कलावंतांचा परिचय ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त व ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे हे आपल्या प्रत्यक्ष अनुभव कथनातून सांगणार आहेत.

 

वाईकरांसह महाराष्ट्रासाठी मेजवानी

 

अशाप्रकारे साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत आदी अभिव्यक्तीच्या अनेक आयामांना स्पर्श करणारा व या सर्व क्षेत्रांत गदिमा, बाबुजी व पुल या तिघांनी केलेल्या ऐतिहासिक कार्याची महती सांगणारा हा भरगच्च असात्रिवेणी साहित्य संगमविश्वकोश निर्मिती मंडळाने आयोजित असल्याचे दिलीप करंबेळकर यांनी सांगितले. ‘संथ वाहते कृष्णामाई..’ हे एक अप्रतिम चित्रपटगीत गदिमांनी रचले आणि बाबुजींनी गायले होते. याच कृष्णामाईच्या काठावर वसलेल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या ऐतिहासिक वाई शहरात हा ‘साहित्य संगम’ होत आहे. तेव्हा वाईकर रसिकांसह महाराष्ट्रातील तमाम रसिकांनी या अनोख्या कार्यक्रमाला उपस्थित राहून शब्द, सूर आणि विनोदाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन करंबेळकर यांनी केले आहे. कार्यक्रमासंबंधी अधिक जाणून घेण्यासाठी आपण फेसबुकवर ‘त्रिवेणी साहित्य संगम’ला भेट देऊ शकता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/