६४ घरांची राणी

    दिनांक  08-Feb-2019


२०१७ मधीलमहिला बुद्धिबळ चॅम्पियन स्पर्धेत सलग तीनवेळा कांस्यपदक विजेती आणि जिला विश्वनाथन आनंद यांनी ‘६४ घरांची राणी’ संबोधले त्या ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झालेल्या बुद्धिबळपटू द्रोणावल्ली हरिकाची ही यशोगाथा.

 

‘बुद्धिबळ’ या खेळाची सुरुवात प्रथम भारतातच झाली, असे मानले जाते. बुद्धिबळासाठी विविध भाषांत वापरले जाणारे शब्द भारतीय ‘चतुरंग’ या शब्दापासून तयार झाले आहेत. असे असले तरी, युरोपियन देशांच्या तुलनेत भारताची बुद्धिबळातली वाटचाल संथ गतीनेच होत आहे, यात काही वाद नाही. कारण, बुद्धिबळपटूंची नावे हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढीच आपल्याला ठाऊक असतात. त्यातला त्यात विश्वनाथ आनंद, पी. हरिकृष्ण, सूर्यशेखर गांगुली आणि मुलींमध्ये तर कोनेरू हम्पी एवढीच काय ती नावं सर्वसाधरणपणे माहीत असणारी नावे. पण यातही, बुद्धिबळात भारत पुढे जाऊ शकतो, या विचाराची आणखी युवा खेळाडू म्हणजे ‘द्रोणावल्ली हरिका.’ २०१२, २०१५ आणि २०१७ मधील ‘महिला बुद्धिबळ चॅम्पियन स्पर्धे’त तिने सलग तीनवेळा कांस्यपदक मिळवले आणि तिला विश्वनाथ आनंद यांनी ’६४ घरांची राणी’ असे नाव दिले.

 

१९९१ मध्ये आंध्रप्रदेशमधल्या अगदी सुशिक्षित घरात हरिकाचा जन्म झाला. पण कदाचित ‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतातया म्हणीप्रमाणे हरिकाला असलेली बुद्धिबळाची आवड अगदी लहानवयातच तिच्या वडिलांनी ओळखली होती. खरेतर हरिकाचे वडील डी. रमेश हे स्वत: उत्तम बुद्धिबळपटू आहेत; एवढेच नाही, तर हरिकाची बहीण अनुषासुद्धा उत्तम बुद्धिबळ खेळायची. त्यामुळे हरिकाच्या रक्तातच बुद्धिबळ उतरलं होतं, असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे हरिकाने बुद्धिबळात आपलं वर्चस्व मिळवण्याच्या इच्छेने वयाच्या पाचव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली. हरिकाला लहानपणापासूनच बुद्धिबळाचे रितसर प्रशिक्षण दिले. नऊ वर्षांखालच्या बुद्धिबळ चॅम्पियन स्पर्धेत हरिकाने आपले पहिले पदक मिळवले आणि त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. कदाचित तिला कळलं होतं, तिला काय करायचं आहे...

 

बुद्धिबळाच्या युद्धपटावर,

एक प्यादं निमूटपणे लढत होतं...

स्वबळावर स्वहिमतीवर,

एक एक घर ते

पुढं सरकत होतं...

 

असाच काहीसा हरिकाचा प्रवास. मात्र, तिचं लक्ष्य आणि लक्ष होतं ते ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेकडे. कारण, ‘ग्रँडमास्टर’ ही स्पर्धा बुद्धिबळाच्या स्पर्धांमधील सर्वोत्तम स्पर्धा मानली जाते आणि महिला ग्रॅंडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत भारतातील कोनेरु हम्पी यांनी विजेते पद जिंकत भारतातील प्रथम महिला जगज्जेती होण्याचा मान मिळवला होता आणि हरिकाने हे स्वप्न वयाच्या ९व्या वर्षीच पाहिले. यासाठी हरिकाने १० वर्षांखालच्या, १२ वर्षांखालच्या आणि १८ वर्षांखालच्या सर्व स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकत आपल्या अंतिम ध्येयाकडे वाटचाल करण्यास सुरुवात केली आणि २००७च्या राष्ट्रकुल स्पर्धेत हरिकाने सुवर्णपदक मिळवले. यानंतर हरिकाला आपले ध्येय अगदी स्पष्ट दिसत होते. मात्र, ग्रँडमास्टर ही स्पर्धा जिंकणे सोपे नव्हते. तिच्या मते, ”संघर्ष हा केवळ ग्रँडमास्टर जिंकण्यासाठीचा नव्हता, तर तो मी आणि माझ्या बाबांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा होता. मात्र, पाठीच्या दुखापतीमुळे मी काहीशी डगमगले. मात्र, हार नाही मानली.” राष्ट्रकुल स्पर्धेनंतरहरिकाला अनेक दुखापतींनाही सामोरे जावे लागले.

 

 
 

पाठीच्या दुखण्यामुळे हरिकाला एक वर्ष बुद्धिबळापासून लांब राहावे लागले होते. मात्र, आपल्या दुखापतीतून ती स्वत:ला सावरत होती. यात तिच्यासाठी प्रेरणादायी ठरला तो, भारत सरकारने हरिकाच्या बुद्धिबळातील उत्तुंग कामगिरीसाठी दिलेला ‘अर्जुन पुरस्कार.’ या पुरस्कारानंतर हरिका सलग १७ तास बुद्धिबळ खेळण्याचा सराव करू लागली. अखेर तिच्या प्रयत्नांना यश आलं आणि २०११च्या ग्रँडमास्टर स्पर्धेत तिला हवं होतं ते तिला मिळालं. ही स्पर्धा हरिका जिंकली आणि ५.५/९ या गुणांनी तिने ‘वर्ल्ड चेस फेडरेशन’च्या गुणतालिकेत तिसरा क्रमांक पटकाविला. हे पद मिळविणारी हरिका ही पहिली भारतीय महिला ठरली. २०११ हे वर्ष हरिकासाठी खूप आनंदाचे ठरले. कारण, या एकाच वर्षात ‘आशियाई महिला चॅम्पियनशिप,’ ‘राष्ट्रकुल बुद्धिबळ चॅम्पियनशिप’ आणि अर्थातच ‘ग्रँडमास्टर’ हे त्याचे शिखरच, अशा स्पर्धांमध्ये तिने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली.

 

हे सर्व मिळवणारी हरिका ही कोनेरु हम्पीनंतरची दुसरी महिला खेळाडू ठरली. ग्रँडमास्टर किताब मिळवल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत हरिकाने, ”मी अल्पसंतुष्टीआहे. त्यामुळे मला मी जे मिळवलं, ते नेहमीच कमी वाटलं. हम्पी यांनी ग्रँडमास्टर जिंकल्यानंतर मलाही वाटू लागलं की, मीसुद्धा भारताचा राष्ट्रध्वज घेऊन ग्रँडमास्टर व्हावं आणि जेव्हा मी झाले तेव्हा मला विश्वासच बसत नव्हता.” असे सांगितले होते. यानंतर हरिकाने एकामागोमाग एक अशा सगळ्याच स्पर्धा जिंकल्या. २०१६ मध्ये ‘व्हुमन ग्रँड प्रिक्स’ ही स्पर्धा जिंकत, हरिका ही भारताची सर्वात यशस्वी बुद्धिबळपटू ठरली. तिच्या या सर्व कामगिरीबद्दल यावर्षीचा ‘पद्मश्री पुरस्कार’ द्रोणावल्ली हरिका हिला देण्यात आला. विश्वनाथ आनंद आणि कोनेरु हम्पी यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणारी हरिका तिसरी बुद्धिबळपटू ठरली आहे. आता हरिका हिचं ध्येय हे येत्या वर्षात होणारी ‘महिला बुद्धिबळ चॅम्पियनशिप’ हे आहे. या स्पर्धेतहीहरिकाला आभाळाएवढं यश मिळो, यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा...!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/