अत्याचाराप्रकरणी बिहार सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे खडे बोल

07 Feb 2019 15:53:52



नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने बिहार सरकारला बालिकागृह अत्याचार प्रकरणावरुन खडे बोल सुनावले आहेत. मुझफ्फरपूर बालिकागृहात बलात्कार होणे दुर्दैवी आहे, असे मत सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी वक्त केले. त्यांनी याप्रकरणी बिहार सरकारला दुपारी २ वाजेपर्यंत राज्यातील बालिकागृहासंबंधी सर्व माहिती देण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान, याप्रकरणाची पुढील सुनावणी दिल्ली साकेत न्यायालयात होणार आहे. या प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने बिहार सरकारला चांगलेच फटकारले. तुम्ही सरकार कशा प्रकारे चालवत आहात, असा प्रश्नही न्यायाधिशांकडून त्यांना विचारण्यात आला.

 

दरम्यान, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातून दिल्ली साकेत न्यायालयात हलवण्यात आले आहे. यानंतर याप्रकणाच्या सर्व सुनावण्या दिल्ली साकेत न्यायालयात होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. यासाठी दोन आठवड्यांचा वेळ देण्यात आला असून या प्रकरणाची सुनावणी ६ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला बिहारमध्ये किती बालिकागृह आहेत, त्यात किती मुले राहतात, त्यांच्यातील मुला मुलींचे प्रमाण किती आहे. त्यांना राज्य सरकारकडून किती निधी दिला जातो, अशी सर्व माहिती दुपारी २ पर्यंत न्यायालायात देण्याचे आदेश रंजन गोगोई यांनी दिले आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0