दोन दशकात भारत दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनणार : मुकेश अंबानी

07 Feb 2019 20:15:05
 

कोलकाता : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पश्चिम बंगालमध्ये दूरसंचार क्षेत्रातील फोरजी कंपनी जिओच्या विस्तारासाठी १० हजार कोटींची गुंतवणूक केल्याची माहिती गुरुवारी दिली. भारताची अर्थव्यवस्था येत्या दोन दशकांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असेल, असा अंदाज व्यक्त केला. बंगालचा जीडीपी १० लाख कोटींवर पोहोचला आहे.

 

पश्चिम बंगालचा सध्याचा विकासदर ९.१ टक्क्यांवर पोहोचला असून ही वाढ झपाट्याने होत आहे. पूर्व भारतात अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने पश्चिम बंगाल हे प्रमुख राष्ट्र आहे. २०३५ पर्यंतची विकासाची गती पाहता भारताच्या विकासदरात झपाट्याने वाढ होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कोलकत्ता येथे झालेल्या ग्लोबल बिझनेस समेटनिमित्त ते बोलत होते.

 

भारताच्या विकासदराबद्दल बोलताना ते म्हणाले, भारत हा झपाट्याने विकास करत आहे. २०१९मध्ये युकेच्या अर्थव्यवस्थेला मागे सारत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. युएस, जपान, जर्मनी, चीन आदी देशांना मागे सारत आपण पुढे जात आहोत. येत्या दोन दशकांमध्ये आपली अर्थव्यवस्था १० ट्रिलियन इतक्या प्रचंड आकड्यासह जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल.

 

हा विकास आत्तापेक्षा चौपट अधिक असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एक दिवस आपण अर्थव्यवस्थेत पहिल्या क्रमांकावरही पोहोचू असे ते म्हणाले. भारत स्वातंत्र्याची शंभरी साजरी करत असताना २०४७ मध्ये आपण जगातील प्रमुख शक्तीशाली राष्ट्र असू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रिलायन्स ग्रुपने यापूर्वीच पश्चिम बंगालमध्ये २८ हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक संपूर्ण भारतातील गुंतवणूकीच्या १० टक्के आहे. पश्चिम बंगालला डिजिटल क्रांतीच्या युगात पाऊल ठेवण्यास मदत करण्यासाठी जिओ मदत करणार असल्याची ग्वाही मुकेश अंबानी यांनी यावेळी दिली.

 

ते म्हणाले, पश्चिम बंगाल आता डिजिटल क्षेत्रातील सर्वात मोठे गुंतवणूक राष्ट्र ठरले आहे. पश्चिम बंगाल सरकार देशातील चौथ्या औद्योगिक क्रांतीत प्रमुख भूमिका निभावत आहे. डिजिटल क्रांती विकसित करण्यासाठी रिलायन्सचा मोठा हातभार लागत आहे, हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.

 

पश्चिम बंगालमध्ये जिओ डेटा प्रस्थापित करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. हे काम पूर्ण झाल्यावर बंगाल एखाद्या सिलीकॉन व्हॅलीपेक्षा कमी नसेल, असा विश्वास अंबानी यांनी व्यक्त केला. जिओच्या गीगाफायबरच्या सेवेनंतर पश्चिम बंगालमधील प्रत्येक घर हे स्मार्ट होईल.

 

ई-कॉमर्स क्षेत्रातही ठेवणार पाऊल

मुकेश अंबानी यांनी गुजरात समिटमध्ये मोठ्या गुंतवणूकीची घोषणा केली आहे. ई-कॉमर्स आणि ऑनलाईन बाजारपेठेत पाऊल ठेवणार असल्याचे सांगत त्यांनी फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन सारख्या कंपन्यांना टक्कर देणार असल्याचे संकेत दिले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0