कौमार्य चाचणी?

    दिनांक  07-Feb-2019   


कौमार्य चाचणीया अनिष्ट प्रथेची लैंगिक हिंसाचार म्हणून नोंद करण्याचे आदेश राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी नुकतेच दिले, त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार. कंजारभाट समाजात नववधूची कौमार्य चाचणी घेण्यात येते. पंचांनी दिलेल्या काळात वराने वधूशी शरीरसंबंध ठेवायचे. त्यावेळी वधूच्या योनीतून रक्तस्त्राव झाला नाही तर ती ‘खोटी.’ म्हणजे ती ‘कुमारीका’ नसून लग्नाआधी तिचे दुसर्‍या कोणाशी शरीरसंबंध होते, असे जाहीर केले जाते. त्यानंतर त्या नववधूच्या हालअपेष्टांचा कधी न संपणारा प्रवास सुरू होतो. ‘कौमार्य चाचणी’ करताना हा विचार केलाच जात नाही की, सध्याच्या काळात मुलींचे आयुष्य बदलले आहे. व्यायाम, अपघात किंवा क्रीडाप्रकारांमुळेही वधूचा योनीपडदा भंग होऊ शकतो. पण, हा विचार इथे केला जातच नाही. कारण, मुळात व्यायाम आणि क्रीडा हे स्त्रियांचे प्रांतच नाहीत, असा या मागचा अतिशय लिंगभेदी विचार. अर्थात, सभ्य समाजात भावनात्मक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने स्त्री आणि पुरुष दोघेही कुमार असावेत, हा संकेत तसा वाईट नाही. पण, मग त्याची बांधिलकी फक्त स्त्रीचीच का? संसार दोघांचा आहे, तो समानतेच्या नव्हे, तर समरसतेच्या पायावरच होणार हे मान्य. मग सगळ्या शुचिततेचा मक्ता स्त्रियांच्याच माथी का? स्त्रियांनी शारीरिक पातळीवर पावित्र्य जपावेच, पण मग तिच्या पतीच्या बाबतीतही अशी काही चाचणी आहे का? स्त्रीच्या शारीरिक ठेवणीवरून तिला जेरबंद करणार्‍या प्रथा जगभर आहेत. भारतीय समाजातली ‘स्त्री-भ्रूणहत्या’ पद्धत असू दे, इस्लामिक राष्ट्रांमधील बालिकांची योनीपटल कापणारी ‘खत्ना’ पद्धत असू दे. इसाई राष्ट्रांमधील चित्र फार वेगळे नाही. तेथील स्त्रियांना वस्तू समजणारी तसेच गर्भपातविरोध प्रथा आहेच. महिलांच्या नैसर्गिक सौंदर्याची पुरुषांना भुरळ पडू नये, म्हणून त्यांच्या चेहर्‍यावर चित्र-विचित्र भयंकर गोंदणं करणारी पद्धत तर कित्येक ठिकाणी सर्वमान्यच. या सर्व पार्श्वभूमीवर ‘कौमार्य चाचणी’पद्धतीला ‘लैंगिक हिंसाचार’ म्हणून कायदेशीर मान्यता मिळाली, हे महत्त्वाचे आहे. कारण, ज्या देशात देवी म्हणून स्त्री पूजली जाते, तिथेच तिचे पावित्र्य सिद्ध होते.

 

तरीही वाटते की,

शरीराच्या खाचा-खळग्यात

तुझे पावित्र्य मोजताना, तुझे पावित्र्य शोधताना

त्यांना तुझे माणूसपण उमगेल का?

तुझे स्वत्त्व त्यांना कधी तरी गवसेल का?

 
 

चर्चेत राहायचे ‘धंदे’

 

राम मंदिराचा विषय न्यायालयाधीन असतानाही अयोध्येला जाणे, राहुल गांधी, ममता बॅनर्जी कशासाठी काय करतात याचा थांगपत्ता लागत नसतानाही त्यांचे कौतुक करून उद्धव ठाकरे यांना वाटते की, आपण देशाचे नेतृत्व करीत आहोत. आताही आपण कसे देशव्यापी नेता आहोत, असा अविर्भाव आणताना उद्धव ठाकरेंनी नागरिकत्व सुधारक विधेयकाला नाकारण्याचे आश्वासन नॉर्थ इस्ट स्टुडंट ऑर्गनायझेशन, अखिल आसाम विद्यार्थी संघटना, खाशी विद्यार्थी संघटना, त्विप्रा विद्यार्थी संघ, मिझो झिलाई पॉल, अखिल अरुणाचल प्रदेश विद्यार्थी संघटना, गारू विद्यार्थी संघटनांना दिले आहे. अशी उचलली जीभ टाळ्याला लावण्याआधी उद्धव यांनी थोडा अभ्यास केला असता तर? हे विधेयक संसदेत टिकू देणार नाही, असे आश्वासन देताना उद्धव यांची कोणती राष्ट्रीय भूमिका होती हे कळायला मार्ग नाही. या सर्व संघटनांचे वरवर म्हणणे आहे की, आमच्या राज्यांत आम्ही इतरांना का ठेवू? बाहेरचे शरणार्थी आल्याने आमची संस्कृती भाषेला अडचण येईल. आता हसावे की रडावे काही कळत नाही. अत्याधुनिक समाजमाध्यमांमुळे जग एका क्लिकवर चालले आहे. तिथे नागरिकत्व सुधारणा विधेयकमुळे संस्कृती बदलेल, अशी मानसिकता बाळगणे हे कोणत्या युगाचे लक्षण आहे देव जाणे. भारत हा अत्यंत सहिष्णू आणि सर्वसमावेशक संस्कृतीचा देश असल्याने किती आक्रमणे झाली गेली पण, भारत भारत म्हणून टिकला. या संघटनांना भारतीय संस्कृतीचे हे सामर्थ्य ठाऊक नसावे किंवा बहुतेक मान्यच नसावे. असो, या सर्व कारणांच्या आड मग या संघटना हळूच एक दुसरे कारण देतात. ते कारण म्हणजे, या विधेयकानुसार बिगर मुस्लिमांना काही अटींवर भारतीय नागरिकत्व मिळणार आहे. मग मुस्लीम शरणार्थींना परत पाठवून इतर शरणार्थींना का थारा दिला जातोय? (इथे इतर म्हणजे हिंदू, बौद्ध, शीख, पारसी, इसाई होत.)कारण, म्हणे या शरणार्थींचा वापर सध्याच्या भाजप सरकारला मते मिळवण्यासाठी करायचा आहे. याचा अर्थ गैर मुस्लिमांना नागरिकत्व देणार. मात्र, शरणार्थी म्हणजेच रोहिंग्याना परत पाठवणार याचे दु:ख तर या विद्यार्थी संघटनांना नाही ना? याचे स्पष्टीकरण उद्धव ठाकरे देतील का? नाहीच देणार. कारण, हे सगळे फक्त चर्चेत राहायचे धंदे आहेत. बाकी देशाचा विचार करायला आवड-सवड आहे कुठे..

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/