समाजराष्ट्रसेवेचे दर्शन!

    दिनांक  07-Feb-2019   


सामाजिक क्षेत्रातील कार्याचा गौरव करत यंदा केंद्र सरकारने दर्शनलाल जैन यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा हा लेख...

 

काही काही लोक समाजाची सेवा करण्यासाठीच जन्म घेतात. त्यातील दर्शनलाल जैन अशाच दुर्लभ व्यक्तींपैकी एक. जैन यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्राला अर्पण करत गरीब व वंचित वर्गाच्या शिक्षणासाठी विशेष उल्लेखनीय कार्य केले. सोबतच दर्शनलाल यांनी सरस्वती नदीच्या पुनरुद्धारासाठीही संघर्ष केला. सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या याच कार्याचा गौरव करत यंदा केंद्र सरकारने दर्शनलाल जैन यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले. जाणून घेऊया त्यांच्याबद्दलच...

 

रा. स्व. संघात अनेकानेक जबाबदार्‍या पार पाडलेले दर्शनलाल जैन हरियाणातल्या यमुनानगरचे रहिवासी. ‘पद्मभूषण’ जाहीर केल्यावर त्यांची प्रतिक्रिया स्वयंसेवकाच्या मनातला भाव सांगणारीच राहिली. “मी पुरस्कारासाठी कोणतेही काम केले नाही. माझ्या मनात प्रत्येकवेळी फक्त राष्ट्रभक्तीच उत्कट भावना असे. देशातील प्रत्येक नागरिक हे माझेच कुटुंब असून त्यांच्यासाठी काम करणे हे माझे कर्तव्यच होय,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

 

दर्शनलाल जैन यांचा जन्म १२ डिसेंबर, १९२७ रोजी जगाधरी शहरात एका उद्योगजकाच्या घरात झाला. लहानपणीपासून मनात जागृत झालेल्या देशभक्तीच्या भावनेने ते रा. स्व. संघाच्या संपर्कात आले. महात्मा गांधी यांच्याकडून प्रेरणा घेत ब्रिटिश शासनकाळात जैन यांनी स्वदेशीची ओळख असलेली खादी वस्त्रे घालून शाळेत जाण्यास सुरुवात केली. १९४२ साली वयाच्या १५व्या वर्षी त्यांनी ‘छोडो भारत’ आंदोलनातही सहभाग घेतला. पुढे इंदिरा गांधींनी देशावर लादलेल्या आणीबाणीलाही जैन यांनी कडाडून विरोध केला. परिणामी, इंदिरा सरकारच्या लोकशाहीचा गळा घोटणार्‍या धोरणांना विरोध केल्याने १९७५ ते १९७७ दरम्यान जैन यांना तुरुंगातही जावे लागले. दरम्यानच्या काळात काही अटींवर मुक्तता करण्याचा सरकारी प्रस्तावही जैन यांनी धुडकावून लावला.

 

सक्रिय राजकारणात पाऊल ठेवण्याचा विचार दर्शनलाल यांना कधीही शिवला नाही. म्हणून १९५४ मध्ये जनसंघाने देऊ केलेली आमदारकीही त्यांनी नाकारली. इतकेच नव्हे, तर अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधानपदी असताना समोर ठेवलेला राज्यपालपदाचा प्रस्तावही जैन यांनी स्वीकारला नाही. राजकारणाबाहेर राहून समाजातील गरिबांची, वंचितांची सेवा करणे हाच जैन यांचा स्थायीभाव होता, जीवनोद्देश होता. शिक्षणक्षेत्रात कार्य करण्यासाठी १९५४ साली त्यांनी ‘सरस्वती शिक्षा मंदिर’ची स्थापना केली. सन १९५७ मध्ये ते ‘दयानंद अ‍ॅँग्लो वैदिक कॉलेज फॉर गर्ल्स’चे संस्थापक सदस्यही झाले. जैन यांनी जवळपास २० वर्षांपर्यंत भारत विकास परिषद, विवेकानंद रॉक मेमोरियल सोसायटीचे, तर ३० वर्षांपर्यंत वनवासी कल्याण आश्रम व ग्रामीण, दुर्गम भागातील १०० हून अधिक शाळांचे तसेच ‘गीता निकेतन एज्युकेशन सोसायटी’चे नेतृत्व केले.

 

दर्शनलाल जैन यांच्या शैक्षणिक कार्यातील एक सर्वोत्कृष्ट दागिना म्हणजे अंबाला येथील ‘टप्पा’ या गावचे ‘नंदलाल गीता विद्या मंदिर.’ १९९७ साली स्थापन करण्यात आलेल्या ‘गीता विद्या मंदिर’चे वैशिष्ट्य म्हणजे, हरियाणा, पूर्वोत्तर आणि जम्मू-काश्मीरच्या गरजू आणि बुद्धिमान विद्यार्थ्यांना दिले जाणारे मोफत शिक्षण व वसतिगृह. दर्शनलाल जैन यांनी मेनात जिल्ह्यातील नूंह गावातील बंद पडलेल्या हिंदू माध्यमिक विद्यालयालाही पुनर्जीवित केले. यातूनच पुढे हरियाणाच्या मेवात परिसरात कित्येक शाळा सुरू झाल्या.

 

मानवी समाजाच्या विकास व प्रगतीत शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अर्थात, एखादी शैक्षणिक संस्था वा शाळा उभी करायची म्हटले तरी, अनंत अडचणी समोर उभ्या ठाकतात. तशा अडचणी जैन सांनाही आल्या पण, त्यावर मात करत जैन यांनी शिक्षणक्षेत्रात अतुलनीय कार्य केले. जवळपास ४० वर्षांपर्यंत रा. स्व. संघाचे पदाधिकारी राहिलेल्या जैन २००७ साली आरोग्यच्या समस्यांमुळे वयाच्या ८०व्या वर्षी संघाच्या जबाबदारीतून मुक्त झाले. मात्र, दरम्यानच्याच काळात जैन यांनी सरस्वती नदीवर संशोधन करण्यासाठी एका संस्थेची स्थापना केली. सोबतच सरस्वती पुनरुद्धार योजनाही सुरू केली. तेव्हापासून आजतागायत ते सरस्वती नदीचा महान वारसा पुन्हा एकदा निर्माण करण्याकामी कार्य करत आहेत. भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात भूवैज्ञानिक पद्मश्री के. एस. वाल्डिया यांच्या अध्यक्षतेखाली एका केंद्रीय सल्लागार समितीची स्थापना केली, तसेच मुख्यमंत्री मनोहरवाल यांनीही ‘सरस्वती हेरिटेज डेव्हलपमेंट बोर्डा’ची स्थापना केली. तेव्हापासून ‘सरस्वती पुनरुद्धार योजना’ पुढे जाऊ लागली, असे दर्शनलाल जैन सांगतात.

 

भारताचा इतिहास व इतिहासनायकांप्रति कमालीचा अभिमान बाळगणार्‍या जैन यांनी २००७ साली राष्ट्राला विस्मरण झालेल्या नायकांचे स्मरण करण्यासाठी ‘योद्धा सन्मान समिती’ स्थापन केली. समितीने आतापर्यंत पानिपतच्या दुसर्‍या युद्धाचा नायक हेमचंद्र विक्रमादित्याच्या राज्याभिषेक सोहळ्यासह कितीतरी कार्यक्रम आयोजित केले आहेत. इंग्रजांनी भारतीय इतिहासात मोठ्या प्रमाणात छेडछाड केली, पाठ्यपुस्तकांतही परकीय आक्रमकांचे महिमामंडन केले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्या जशाच्या तशाच राहिल्या. आजही दिल्लीसह देशातल्या अनेकानेक ठिकाणांची नावे परकीय आक्रमकांचीच आहेत. ते दूर करून भारतमातेच्या सच्चा सुपुत्रांचा सन्मान करण्याची दर्शनलाल जैन यांची इच्छा आहे. वयाच्या ९२व्या वर्षीही या दिशेने त्यांचे निरंतर प्रयत्न सुरू असून जैन यांच्या समाजाच्या सर्वच क्षेत्रांना स्पर्श करणार्‍या कार्याला दै.‘ मुंबई तरुण भारत’चे अभिवादन!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/