संघ सर्वाधिक धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक

06 Feb 2019 12:31:39


 


राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे संघावर स्तुतिसुमने


नागपूर : राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी रा. स्व. संघावर स्तुतिसुमने उधळली आहेत. रा. स्व. संघ सर्वाधिक धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक संघटनांपैकी एक असल्याचे राव यांनी म्हटले आहे. नागपूरच्या रामटेक येथील कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी गुरुकुलाचा शुभारंभ व नवीन शैक्षणिक भवनाचे लोकार्पण राव यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. संघाने प्रत्येक व्यक्तीचे आणि धर्माचे पालन करण्याच्या अधिकाराचा सन्मान केला असल्याचेदेखील ते म्हणाले.

संस्कृत भाषेच्या अभ्यासासाठी जागतिक स्तरावर समन्वय साधून संशोधनाला प्रोत्साहन देण्याचे आवाहन यावेळी राव यांनी केले. संघाविषयी बोलताना राव म्हणाले, "डॉ. हेडगेवार यांनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून आज जगभरात संघाच्या शाखा आहेत. तर गोकळवलकर गुरुजी एक युगपुरुष होते. १९४८ साली संघावर घातलेली बंदी उठविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे त्यांच्या नावाने विद्यापीठ परिसरात शैक्षणिक संकुल उभारणे, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे."

 

संघाची स्तुती करत असताना राव यांनी विरोधकांनादेखील टोला लगावला. संघांविषयी संघद्वेषांचे जे मत आहे अगदी याच्या उलट संघाचे कार्य आणि विचार आहेत. संघाने नेहमीच प्रत्येक व्यक्तीला आपले मत आणि धर्माचे पालन करण्याचा अधिकारच दिला नाही तर त्याचा सन्मानदेखील केला असल्याचे राव म्हणाले. यावेळी पेजावर मठाधिपती श्रीविश्वेशतीर्थ श्रीपाद, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0