गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या 'ती'ला अटक

06 Feb 2019 10:55:38



अलिगड : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणारी हिंदू महासभेची कार्यकर्ती पूजा पांडेला अखेर अलिगडच्या पोलिसांनी अटक केली आहे. तिच्यासोबत तिचा पती अशोक पांडे यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. मंगळवारी रात्री दिल्लीहून नोएडात प्रवेश करताना पोलिसांनी दोघांना अटक केली.

 

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीदिवशी देशभरातून आदरांजली वाहिली जात असताना हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी मात्र महात्मा गांधीच्या प्रतिमेवर एअर पिस्तूलने गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या प्रतिमेचे दहनही केले होते. यासर्व प्रकारचा एक व्हिडीओ देशभर पसरला होता. त्यानंतर या कृतीचा देशभरातून निषेध करण्यात येत होता. या प्रकरणी पोलिसांनी गांधी पार्क येथे पूजा आणि अशोक यांच्यासह १० जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी ७ जणांना अटक केली होती. पूजा आणि तिचा पती अशोक मात्र फरार झाले होते.

 

त्या दोघांनीही पोलिसांना चकवण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांची सर्व्हिलन्स टीम दोघांचे मोबाइल फोन लोकेशन ट्रेस करण्याच्या कामी लागली होती. दिल्लीतून नोएडात प्रवेश करताना पोलिसांनी त्यांना अटक केली. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर गोळ्या झाडल्यानंतर, महात्मा गांधींना राष्ट्रपिता संबोधणे अयोग्य आहे. जर मी नथुराम गोडसेच्या आधी जन्मला आले असते, तर मीच महात्मा गांधी यांची हत्या केली असती, असे आक्षेपार्ह वक्तव्यही पूजा पांडे हिने केले होते. या घटनेनंतर देशभरात सर्व स्तरातून निषेधाचे सूर उमटले होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0