गृहिणी ते वेलनेस ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडर

    दिनांक  06-Feb-2019 21:35:16

 

 
 
 
 
नंदुरबारमधील खेड्यात वाढलेल्या रेखा चौधरी यांनी प्रचंड मेहनतीने, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर सौंदर्योपचार क्षेत्रात विस्मयकारक यश मिळवले आहे. त्यांचा एक गृहिणी ते वेलनेस ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडरपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे.
 

नंदुरबारसारख्या ग्रामीण भागात शिक्षण झाल्याने इंग्रजीचा गंध नाही, नवीन सौंदर्योपचारांची तोंडओळखही नाही... अशी अतिसामान्य पार्श्वभूमी असतानाही रेखा चौधरी यांनी प्रचंड मेहनतीने, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर सौंदर्योपचार क्षेत्रात विस्मयकारक यश संपादित केले. ‘स्पा ट्रीटमेंट’चे आंतरराष्ट्रीय पेटंट घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. ‘वेलनेस ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडर’ रेखाताई चौधरी यांना ‘दी पिलर ऑफ हिंदुस्थानी सोसायटी’ आणि ‘फेमिना महिला विशेष अचिव्हर पुरस्कार’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मूळच्या नंदुरबारच्या आणि शिक्षणही याच ग्रामीण जिल्ह्यात घेतलेल्या रेखा चौधरींच्या घरातील वातावरण मात्र इतर घरांपेक्षा बरेच वेगळे होते. त्यांच्या समाजात मुलींना शिकवण्याची पद्धतच नव्हती. परंतु, त्यांच्या वडिलांना ही जुनाट पद्धत अजिबात मान्य नव्हती. एवढेच काय तर, त्यांच्या वडिलांनी नंदुरबारमध्ये ४० वर्षांपूर्वी मुलींची व्यायामशाळा सुरू केली आणि त्या व्यायामशाळेची पहिली सदस्य होती त्यांचीच सुपुत्री. म्हणजे, समाजाला व्यायामाचे धडे देण्यापूर्वी त्याची सुरुवात रेखाताईंच्या वडिलांनी आपल्याच घरापासून केली.

 

त्यानंतर रेखा यांचे वयाच्या १८ व्या वर्षी लग्नही झाले. त्या सिरपूर नावाच्या गावात स्थायिक झाल्या. परंतु, त्यांना सासरी आल्यावरही स्वस्थ बसवत नव्हते. मग घरातल्या घरात त्यांनी विविध छंदवर्ग सुरू केले. प्रारंभीच्या काळात त्यांच्या या छंदउद्योगांना सासरच्या मंडळींचा तितकासा पाठिंबाही नव्हता. पण, रेखाताईंनी त्याकडे फारसे लक्ष न देता ‘सौंदर्यसाधिके’चा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. दरम्यानच्या काळात त्यांना दोन मुली झाल्या. परंतु, त्यांनी आपले लक्ष्य व घरच्या जबाबदाऱ्या यांचा उत्कृष्ट समतोल साधला. ‘सौंदर्यसाधिके’चा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्यांनी आपल्या घरीच सौंदर्य प्रसाधनालय सुरू केले. आपल्या दोन्ही मुलींना चांगले शिक्षण मिळावे, असे त्यांना मनोमन वाटत होते. त्यात त्यांच्या दोन्ही मुली नीलांबरी व अपर्णा अभ्यासात हुशार. पण, हे सगळे सिरपूर या छोट्या गावात सहजशक्य नव्हते. मग काय, आपले पती अरुण व सासरच्या मंडळींना मुलींच्या शिक्षणाचे, त्यांच्या स्वत:च्या लक्ष्याचे महत्त्व पटवून रेखाताईंनी थेट स्वप्ननगरी मुंबई गाठली. रेखाताईंच्या वडिलांनी गावातील पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नव्या मुंबईत सानपाडा येथे घर घेतले होते. त्याच घरामध्ये आपल्या मुली व भावाच्या मुलांच्या शिक्षणासाठी रेखाताई २००० साली नवीन मुंबईत स्थायिक झाल्या. ग्रामीण भागात जन्मलेल्या रेखा यांना इंग्रजी भाषेचे वावडे असूनही केवळ आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी एका प्रदर्शनात तोडकीमोडकी इंग्रजी बोलून का होईना, एका फ्रेंच ब्रॅण्डचे काम पदरात पाडले. तसेच त्यांना संगणक कसा वापरायचा, याचेही ज्ञान नव्हते. त्यांना शहरी झकपक कपडे व दिखाऊ शिष्टाचाराचा गंधही नव्हता. पण, म्हणून त्या शांत बसल्या नाहीत. त्यांनी आपल्या राहणीमानात बदल केला. आपल्या मुलींकडून संगणकाचे धडे घेतले.

 

सौंदर्यशास्त्र व सौंदर्यप्रसाधनांसंबंधित सर्व क्षेत्रांमध्ये आपले डोळे दीपून जातील, असा झगमगाट असतो. अशा या झगमगत्या चंदेरी जगतामध्ये रेखा चौधरींनी सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्रवेश केला. कारण, सौंदर्यशास्त्र, सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन आणि उत्तम प्रकृतीची जोपासना हेच त्यांचे लक्ष्य होते. सानपाड्यात स्थिरस्थावर झाल्यावर २००४ पासून रेखाताईंनी बाजारात मोठे नाव असणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादकांशी संपर्क साधायला प्रारंभ केला व त्या सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादकांचे वितरण हक्क घ्यायला सुरुवात केली. सौंदर्यप्रसाधनांच्या एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात जगप्रसिद्ध फ्रेंच ब्रॅण्ड असलेल्या रेम्युलिएची उत्पादने भारतात विक्रीचे रेखाताईंना कंत्राट मिळाले. या व्यावसायिक कराराने त्यांच्या उद्योगाला, स्वप्नांना एक भरारी दिली. नेदरलँडमध्ये स्थायिक अनिवासी भारतीय जे. सी. कपूर आणि रेखाताईंनी एकत्र येऊन २००७ च्या सुमारास ‘JCKRC Spa Destination या नावाने भागीदारीत आरोग्यधामविषयक संस्था सुरू केली. सौंदर्यविषयक व सुदृढ प्रकृतीविषयक आरोग्यधाम विकसित करणे, त्यावर संशोधन व गुंतवणुकीचे सल्ले देण्याचे काम ही संस्था करते. सांप्रत ही संस्था रेखा या आपल्या मुलींच्या मदतीने स्वत:च चालवितात. पंचतारांकित हॉटेल्स, मोठ्या रुग्णालयांमध्ये किंवा त्याच्याशी संलग्न आरोग्यधामे उभी करण्यात रेखाताईंच्या संस्थेचा खूप मोठा वाटा आहेआपल्या व्यवसायाच्या निमित्ताने व जगातील नवनवीन तंत्रज्ञान आपल्या देशात आणण्यासाठी रेखाताईंनी फ्रान्स, नेदरलँड, जर्मनी, इटली, अमेरिका अशा अनेक देशांना भेटी दिल्या आहेत.

 

ग्रामीण भागातून आलेल्या रेखा आपली सामाजिक बांधिलकी मात्र विसरल्या नाहीत. ग्रामीण भागातील मुलींना मानाने जगण्यासाठी, आपल्या पायावर उभे करण्यासाठी रेखा यांची संस्था ‘झेप’ प्रकल्प उभारत आहे. या संस्थेतर्फे शिकाऊ मुलींसाठी ‘सौंदर्यसाधिका’ बनवण्याचे अभ्यासवर्ग सुरू झाले आहेत. तसेच नजीकच्या भविष्यकाळात सुरू होणाऱ्या ‘झेप’ प्रकल्पाच्या विद्यमाने या शिकाऊ मुलींना सार्वजनिक स्वच्छता राखण्याचेही प्रशिक्षण दिले जाणार आहे. आज सौंदर्य व उत्तम आरोग्य जपणारी आरोग्यधामे या व्यवसायातील रेखा चौधरी संपूर्ण जगामध्ये भारताच्या राजदूत आहेत. त्यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे शुभेच्छा.

 

- नितीन जगताप

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/