व्यक्तिस्वातंत्र्याची किंमत

06 Feb 2019 19:14:54

 

 
 
 
आनंद तेलतुंबडे या तथाकथित विचारवंताची अटक पुणे जिल्हा न्यायालयाने नुकतीच अवैध ठरवली. त्या अनुषंगाने ‘विक्टीम कार्ड’ खेळण्यासाठी या वेळेचा पुरेपूर उपयोग केला जातो आहे. मात्र, जसे भासवले जात आहे, त्याच्या अगदी विपरीत परिस्थिती आहे. प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेण्यासाठी तेलतुंबडे प्रकरणातील न्यायालयाने दिलेल्या सर्व आदेशांचा अन्वयार्थ लावून इतिहासात उद्भवलेल्या यासमान परिस्थितींचा शोध घेणे अनिवार्य ठरते.
 

एल्गार परिषदेच्या आडून योजनाबद्ध दंगल घडविण्याचा कट पुणे पोलिसांनी उघडकीस आणला. त्या चौकशीदरम्यान आनंद तेलतुंबडे या तथाकथित विचारवंताचे नाव आणि त्याच्या विरोधातील काही पुरावे समोर आले. ‘पोलीस आपल्याला अटक करणार’ हे लक्षात आल्यावर आनंद तेलतुंबडेने मुंबई उच्च न्यायालयात आपल्याविरोधातील एफआयआर रद्दबातल केली जावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. फौजदारी प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेला प्रथम माहिती अहवाल (FIR) रद्द करण्याचे, कनिष्ठ न्यायालयातील प्रक्रिया निरस्त ठरवून आरोपीची तत्काळ निर्दोष मुक्तता करण्याचे अधिकार उच्च न्यायालयाला असतात. एखादी व्यक्ती प्रथमदर्शनी निर्दोष आहे, तर त्याला निर्दोषसिद्ध होईपर्यंत न्यायालयीन प्रक्रियेची तरी शिक्षा कशाला, ही त्यामागची भूमिका. गुन्ह्याबाबतची प्रथम खबर, आरोप, पोलिसांनी गोळा केलेल्या प्राथमिक पुराव्यांचा विचार त्यावेळेस केला जातो. मुंबई उच्च न्यायालयाने आनंद तेलतुंबडेच्या विरोधातील आरोप रद्द करण्यास नकार दिला. त्यावर अपील म्हणून आनंद तेलतुंबडे सर्वोच्च न्यायालयात गेला.

 
सर्वोच्च न्यायालयानेही आरोप रद्द करण्यास नकार दिला. पण, आरोपी आनंद तेलतुंबडेस लाभलेले अटकेविरुद्धचे संरक्षण कायम ठेवले. तसेच आनंद तेलतुंबडेला स्वत:चा अटकपूर्व जामीन करून घेण्यासाठी ११ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. ‘जामिनाचा अधिकार’ हा व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे. जामिनाबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार न्यायालयास तेव्हाच प्राप्त होतो, जेव्हा आरोपी जामिनासाठी अर्ज करतो. जामीन करून घेण्याच्या प्रक्रियेसाठी पर्याप्त वेळ आरोपीला दिला जातो. आनंद तेलतुंबडेला त्याकरिता वेळ दिला गेला. त्याअनुषंगाने पुणे जिल्हा न्यायालयात आनंद तेलतुंबडेने अटकपूर्व जामीन देण्यासाठी अर्ज केला होता. आनंद तेलतुंबडेचा अटकपूर्व जामीन पुणे जिल्हा न्यायालयाकडून फेटाळून लावण्यात आला. त्यामुळे आता आरोपी तेलतुंबडेला अटक केली जाऊ शकते, असा अर्थ पोलिसांनी लावला आणि अटक केली. पण, सर्वोच्च न्यायालयाने आदेशात, तेलतुंबडेला सक्षम न्यायालयाकडून जामीन करून घेण्यासाठी ११ फेब्रुवारीपर्यंत वेळ आहे, असे नमूद केले. पुणे जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला असला तरी, त्याबाबत अपील करून उच्च आणि सर्वोच्च न्यायालय जामीन करून देण्याबाबत ‘सक्षम’ आहे. आरोपीला ११ फेब्रुवारीपर्यंतचा वेळ त्यासाठी दिला गेला पाहिजे, या तांत्रिक मुद्द्यावर आनंद तेलतुंबडेच्या वकिलांनी पुणे जिल्हा न्यायालयात युक्तिवाद केला आणि पोलिसांनी केलेली अटक अवैध ठरवली. जिल्हा न्यायालयाने पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याचं म्हटलं आहे. खरंतर पुणे पोलिसांनी ‘अवमान केला की नाही?’ हे ठरवण्याची मुभा आणि कायदेशीर अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. त्याबाबत पुणे जिल्हा न्यायालयाची टिप्पणी योग्य वाटत नाही.
 

पुणे जिल्हा न्यायालयापासून ते उच्च न्यायालय आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयाने आनंद तेलतुंबडे या नक्षलवादी अटक प्रकरणात दिलेल्या सर्व आदेशांचे अध्ययन केल्यानंतर किमान बौद्धिक पात्रता असलेल्या माणसाला त्यात साजरं करण्यासारखे काही आढळणार नाही. उलट न्यायदेवतेसमोरील प्रत्येक पायरीवर तोंडघशी पडल्यानंतर आनंद तेलतुंबडे आणि त्याला ‘विचारवंत’ मानणाऱ्या कळपाने शरमेने माना खाली घातल्या पाहिजेत. पण, स्वत:च्या देशाच्या सेनादलांचे, पोलिसांचे मुडदे पाडणारे बंदुकधारी नक्षलवादी आणि त्यांचे वैचारिक समर्थन करणाऱ्या प्राध्यापक, संपादक, पत्रकारांच्या कळपांचा वारसाच तसा आहेसंपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेत भाजपप्रणीत सरकार, प्रशासनासह न्यायालयावरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तांत्रिक बाबीने मिळालेल्या तात्पुरत्या सुटकेचा संविधानिक संस्थांच्या विश्वासार्हतेवर हल्ला करण्यासाठी पुरेपूर उपयोग केला गेला.

 

भारतावर चीनच्या सेनेने १९६२ साली आक्रमण केले तेव्हा या अशा माओवाद्यांनी चीनची साथ देण्याचा पर्याय निवडला होता. आधीच ‘पंचशील करार’ आणि तत्सम अनेक प्रकरणांत नरमाईची भूमिका घेणाऱ्या पंडित नेहरूंच्या आंतरराष्ट्रीय धोरणाला चीनने केराची टोपली दाखवली होती. वनवासी हक्कासाठी लढण्याचे ढोंग करून सशस्त्र क्रांतीने सत्ता हस्तगत करीत चीनवर एकछत्री अंमल राबविणाऱ्या माओ-त्से-तुंगने भारतावर पूर्वेकडूनहल्ला चढवून नेहरूंच्या पाठीत खंजीर खुपसला. तेव्हा आनंद तेलतुंबडेसारखी भूमिका बजावणाऱ्या प्राध्यापकांनी, हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी भारताशी गद्दारी केली होती. चीनने आक्रमण केल्यावर कॉम्रेड डांगे वगळता राममूर्ती आणि इ.एम.एस. नाम्बोद्रीपाद या दोन विचारवंत नेतृत्वांनी चीनला ‘मित्र’ घोषित करण्याचा ठराव कम्युनिस्ट पक्षात मांडला होता. त्या ठरावास बहुतांश मार्क्स-माओवादी विचारवंतांनी पाठिंबाही दिला. चीनचे सैन्य आणि गुप्तहेर यंत्रणेसह छुपी युती करून भारतात लोकशाही मार्गाने निवडून आलेले नेहरूप्रणीत सरकार उलथून पाडण्याचा तत्कालीन फुटीरतावाद्यांचा डाव होता. त्याबाबतचे पुरावे गृहखात्याच्या हाती लागले. भारत सरकारला पाच हजारांहून अधिक तथाकथित विचारवंत, कार्यकर्ते, प्राध्यापकांना अटक करावी लागली होती. त्यासंदर्भाने १ जानेवारी, १९६५ रोजी भारताचे तत्कालीन गृहमंत्री गुलजारीलाल नंदा यांनी आकाशवाणीवरून देशाला संबोधित केले होते. गुलजारीलाल म्हणाले होते की, “आपण (देशवासी) सर्व जाणताच, देशभरातून मोठ्या संख्येने डाव्या साम्यवादी पक्षाचे अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांना गेल्या तीन दिवसांत पोलिसांकडून अटक केली गेली आहे. आम्हाला हे पाऊल देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेसाठी उचलणे अनिवार्य आहे.

 
या स्वतंत्र भारताच्या एखाद्या नागरिकाला व्यक्तिस्वातंत्र्यापासून वंचित ठेवणे आमच्यासाठी अतिशय क्लेशदायक आहे आणि ही कारवाई अत्यंत काळजीपूर्वक केली आहे. आपल्या सीमेलगत असलेल्या चिनी आक्रमणापासून आम्ही देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने आव्हानाला तोंड देतो आहोत आणि अशा प्रसंगीदेखील डाव्या साम्यवादी पक्षांचे लोक देशासोबत उभे राहण्यास तयार नाहीत. भारतीय साम्यवादी पक्ष चीनलाच मदत करतो आहे.” पुढे गृहमंत्र्यांनी कम्युनिस्टांना ‘देशाशी बेईमानी करणारे’ आणि ‘गद्दार’ संबोधले होते. १९६५ साली देशविरोधी कृत्यात गुंतलेल्या लोकांना अटक केल्यानंतर तत्कालीन गृहमंत्र्याला हा ‘असा’ खुलासा का करावा लागला असावा?त्याचं कारण पोलिसांनी राबविलेल्या अटकसत्राविरुद्ध व्यक्तिस्वातंत्र्याचे नगारे वाजवत जनतेला संभ्रमात टाकण्याचे कार्यक्रम विचारवंतांनी राबविले. फरक दिसतो तो केवळ १९६५ आणि २०१९ सालच्या विरोधीपक्षाच्या भूमिकेत. चिनी आक्रमणाविरोधात दोन हात करणाऱ्या नेहरूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची परिपक्वता तत्कालीन विरोधीपक्ष, जनसंघाचे दीनदयाळ उपाध्याय आणि नेहरूंशी वैचारिक मतभेद बाळगणाऱ्या रा. स्व. संघाच्या गोळवलकर गुरुजींनी दाखवली होती. दुर्दैवाने आजच्या विरोधी पक्षाने प्रगल्भ भूमिका घेण्याची आणखीन एक संधी गमावली आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अधिकृतरित्या २००८ साली देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेस सर्वात मोठा धोका म्हणून नक्षलवादाचा उल्लेख केला होता. आज त्याच नक्षलवादाचा समूळ नायनाट करण्याच्या अभियानात साथ देण्याऐवजी ‘जे जे मोदीविरोधी, ते ते शिरसावंद्य’ असा पवित्रा सर्वच विरोधीपक्ष घेताना दिसतात. नक्षलसमर्थकांना स्वता:च्या बंगल्यावर बोलवून ‘मातोश्री’समान माया देणारेही अशा भूमिकेस अपवाद नाहीत. ‘विक्टीम कार्ड’ खेळणाऱ्या आरोपी आनंद तेलतुंबडेला साथ देऊन मोदींना घेरण्याच्या नादात देशाची सुरक्षा, तपासयंत्रणाच्या सन्मानाबाबत तरी मर्यादा पाळाव्यात इतकीच अपेक्षा सामान्य नागरिक बाळगतो.
 

सततची सतर्कता ही स्वातंत्र्याची किंमत असते (eternal vigilance is the price of liberty) हे सर्वस्वीकृत विधान आहे. विघातक कृत्यांमध्ये गुंतलेल्या लोकांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा ऊहापोह करताना पोलीस दलाच्या सतर्कतेकडे दुर्लक्ष केले, तर उरलेल्या १२५ कोटी जनतेला आपले व्यक्तिस्वातंत्र्य कायमचे गमवावे लागेल. फुटीरतावाद्यांनी नक्षलग्रस्त भागातील आदिवासी आणि दलितांचे मूलभूत अधिकार हिरावून घेऊन ते सिद्ध करून दाखवले आहेच. अशा ४-जी युद्धतंत्रात प्यादी म्हणून वापरल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष बंदूकधारी माणसांना गोळ्या घालून आणि तुरुंगात टाकून प्रश्न सुटत नसतात. त्यांच्या पाठीशी असणाऱ्या पांढरपेशा म्होरक्यांच्या मुसक्या आवळणेही तितकेच आवश्यक असते. तसे करत असताना भारतासारख्या उदारमतवादी संविधान लाभलेल्या लोकशाही देशात अनेक कायदेविषयक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. आपल्या लेखणीतून संविधानप्रणीत व्यवस्था नाकारणारी तेलतुंबडेसारखी मंडळी यंत्रणेला चकवा देताना मात्र त्याच संविधानाचा आश्रय घेतात. अशा तांत्रिक घटनात्मक आव्हानांतून मार्ग काढण्यास आपली राज्यघटना सक्षम आहेच; फक्त ते मार्ग शोधताना न्यायनिर्णयांचे योग्य अन्वयार्थ लावण्याचे आणि ते सार्वभौम जनतेस समजावून सांगण्याचे कर्तव्य बुद्धिवंतांनी पार पाडले पाहिजे.

 
 - सोमेश कोलगे
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 
Powered By Sangraha 9.0