राष्ट्रवादीत मोठी बंडाळी, मुंबईतील चार युवक जिल्हाध्यक्षांचे राजीनामे

04 Feb 2019 21:05:31



मुंबई : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे मुंबई विभागीय अध्यक्ष अॅड. निलेश भोसले यांच्या कार्यपद्धतीला कंटाळत मुंबईतील चार जिल्हाध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत. भोसले यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून हा निर्णय घेत असल्याचा आरोप त्यांनी राजीनाम्यावेळी दिलेल्या पत्रात नमूद केला आहे.

 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई विभागीय अध्यक्ष सचिन अहीर यांना लिहीलेल्या पत्रात दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष सुनील पालवे, ईशान्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र थोरात, दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष रंगनाथन अय्यर, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष अरुण मिश्रा आदींनी मुंबई विभागीय राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अॅड. निलेश भोसले यांनी पैसे उकळल्याचा आरोप केल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

 

पत्रात म्हटल्यानुसार, मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसमधील संघटनात्मक कार्यकरताना भोसले यांच्या मनमानीला कंटाळल्याचे म्हटले आहे. पक्षश्रेष्ठींसमोर आपल्याला सतत खोट्यात पाडल्याचा आरोपही त्यात केला आहे. याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्यावर पदावरून हटवण्याच्या धमक्याही देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसमध्ये केवळ मर्जीतील पदाधिकारी काम करतील, असे त्यांना सांगण्यात आले असून आमच्याकडून वेळोवेळी पैसे मागितले गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या कार्यपद्धतीला वैतागून आम्ही राजीनामे दिल्याचे संबंधित कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई विभागीय अध्यक्ष सचिन अहीर यांना संपर्क केला असता रात्री उशीरापर्यंत संपर्क होऊ शकला नाही. हे पत्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या आ. विद्या चव्हाण यांनीही या प्रकरणावर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0