मित्राच्या नावाने मोबाईल एसएमएसद्वारे होतेय फसवणूक!

04 Feb 2019 18:51:19

 

 
 
 
मुंबई : तुमच्या मित्राने तुमच्या खात्यात एक हजार रुपये जमा केले असल्याचा एक बोगस मॅसेज सध्या सगळीकडे फिरत आहे. अशा आशयाचा एसएमएस मोबाईलवर अनेकांना येत आहे. या मॅसेजमध्ये एक लिंक दिलेली असते. मित्राने पाठवलेले पैसे मिळविण्यासाठी त्या लिंकवर क्लिक करण्यास या मॅसेजमध्ये सांगितले जाते. परंतु अशा मॅसेजमधील लिंक ओपन केल्यास तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते. अशाप्रकारच्या मॅसेजपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
 

गेल्या काही दिवसांपासून अनेकजणांच्या मोबाईलवर BW-GOFYND कडून एसएमएस येत आहेत. तुमच्या मित्राने तुमच्यासाठी एक हजार रुपये FYND मध्ये जमा केले आहेत. त्यासाठी VPXL63 हा कोड वापरा. खाली दिलेली लिंक डाऊनलोड करा. असे या मॅसेजमध्ये लिहिलेले असते. हा एसएमएस मिळालेल्यांना खरोखरचं आपल्या मित्राने आपल्याला पैसे पाठवले असल्याचे वाटते. संबंधित व्यक्ती या लिंकवर क्लिक करून त्याप्रमाणे पुढे जातो. अशा बोगस एसएमएसवरून तुमची फसवणूक होऊ शकते. असे सायबर तज्ञांचे म्हणणे आहे. सायबर पोलिसांनी याबाबत सतर्कता ठेवण्यास सांगितले असून अशा एसएमएसमधील लिंकवर क्लिक केल्यास तुमच्या मोबाईलमधील संपूर्ण डेटा सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचू शकतो. असे सायबर तज्ञांनी म्हटले आहे.

 

या डेटाचा वापर तुमच्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठीही केला जाऊ शकतो. असे सायबर तज्ञांनी म्हटले असून असा एसएमएस जर तुम्हाला आला असेल तर त्यामधील लिंकवर क्लिक न करता तो एसएमएस डिलीट करावा. असे आवाहन सायबर पोलीसांनी लोकांना केले आहे. या मॅसेजमधील लिंकद्वारे तुम्हाला एक अॅप इन्स्टॉल करायला सांगितला जातो. हा अॅप इन्स्टॉल करताना तुमच्या मोबाईल डेटाच्या अॅक्सेस मागितला जातो. परमिशन अलाऊ केल्यास या अॅपच्या माध्यमातून तुमचा मोबाईल नंबर, तुमचे नाव, लोकेशन, फोन स्टोरेज आणि तुमच्या विषयी तुमच्या मोबाईलमद्ये असलेली इतर माहिती अॅपच्या डेव्हलपरकडे सेव्ह होते. त्यामुळे अशा स्वरुपातील एसएमएस जर कोणाला आला असेल तर त्यामधील लिंकवर क्लिक करू नये. असे आवाहन सायबर पोलिसांनी लोकांना केले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
Powered By Sangraha 9.0