माणूसपणाला सलाम...!

    दिनांक  04-Feb-2019   


सूर्याच्या अनुपस्थितीत अंधाराशी सामना कोण करतं? दिव्याची छोटीशी ज्योत. सूर्य म्हणून तिची आरती होणार नाही. पण त्या ज्योतीला त्याचे काही सोयरसुतक नसते. संध्या देवस्थळे-भडसावळे नावाची अशीच एक कर्तव्यमग्न कार्यज्योती...

 

सापाचे विष मानवाच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरते. या विषाच्या परिणामांवर संशोधन करायचे संध्या यांनी ठरवले होते. कारण, नेरळला गावात असताना गबाळ्या नावाच्या वनवासी बांधवाला साप चावताना त्यांनी पाहिला. नातेवाईकांनी गबाळ्याला मांत्रिकाकडे नेले. पण, त्या बांधवाचा मृत्यू झाला. दुसरीकडे त्यांच्या शेजारच्या बुधीचा गर्भपात झाला. तिला रक्तस्राव होऊ लागला. पण, तिच्या नातेवाईकांनी तिला दवाखान्यात नेले नाही. ती नवविवाहिता बुधी तडफडून तिथेच दगावली. या घटनांचा संध्यावर फार परिणाम झाला आणि समाजासाठी काम करायचे त्यांनी आयुष्याचे ध्येय ठरवले. युवा अवस्थेमध्ये घेतलेला सेवेचा वसा आजही त्यांनी टाकला नाही. आता कोणी म्हणेल त्यात काय? नेरळच्या कोतवालवाडी ट्रस्टची स्थापना केलेल्या हरीभाऊ भडसावळेंची ती मुलगी. जन्माने जातीय उतरंडीमध्ये उच्च सवर्ण वर्गातली. त्यामुळे संध्याला काय अशक्य?

 

पण तसे नाही. संध्या यांना आयुष्यात बर्‍याच कडूगोड घटनांना तोंड द्यावे लागले. असो, साप चावून परिसरात बरेचजण मृत्यूला कवटाळत. हे पाहून शेवटी संध्याने ठरवले, या विषावर शिक्षण घ्यायचे. या एका ध्येयापोटी १९७२ साली त्या नेरळहून परळच्या हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये शिकू लागल्या. बी.एस्सी, डी.एमएलटी झाल्यावर त्या सूक्ष्म जीवशास्त्र विषय घेऊन एम.एस्सी झाल्या. त्याकाळी मुंबईला शिकायला जायचे म्हणजे दिव्यच.शहर आणि खेड्यातली तफावत आणि वर्गीय स्तराची अस्पृश्यता त्यांना इथे अनुभवायला मिळाली. महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षी त्या वसतिगृहामध्ये राहू लागल्या. पण, त्यांच्यापासून इतर मुली दोन हात लांबच राहत. कारण, संध्याचे गरीब राहणीमान. त्यावेळी संध्या आईच्या साडीचा हाताने शिवलेला साधा, सैलसर, नावापुरता असलेला सलवार -कुर्ता घालत. इतर सर्वच समाजातील विद्यार्थिनींनी संध्यांना सांगितले की,“तू आमच्यात नको राहू बाई. तुझी तू वेगळ्या रूममध्ये राहा.” गरिबीतून शिकण्यासाठी आलेल्या संध्यांना याचे फार दु:ख झाले. पण, त्यांनी आपले ध्येय सोडले नाही. हाफकिनमध्ये त्या शिकल्या आणि तिथेच नोकरीलाही लागल्या.

 

आयुष्याला आर्थिक स्थैर्य लाभले. पण, त्यांच्या आजूबाजूचे जनजीवन त्यांना पाहवत नव्हते. त्यांनी परिसरातील वनवासी आणि वंचित भागात घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी सुरू केली. खरूज, नारू, वैयक्तिक स्वच्छता यांची त्या शिकवण देऊ लागल्या. त्याकाळी त्यांना ‘लग्नगडी’ प्रकार आढळला. इथले वनवासी समाजाचे भावी वर सावकाराकडून कर्ज घेऊन नियोजित वधूला हुंडा द्यायचे. मग त्यांचा विवाह व्हायचा. या हुंड्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या बदल्यात तो वर सपत्नीक आयुष्यभर सावकाराची वेठबिगारी करायचा. याला ‘लग्नगडी’ म्हणतात. फारच अमानुष पद्धत. या पद्धतीविरुद्ध संध्या यांनी रणशिंग फुंकले. वांगणी, नेरळ इथल्या पाड्यावर जाऊन या प्रथेविरुद्ध जनजागृती केली. त्यामुळे आज तिथे ‘लग्नगडी’ प्रथेचे मागमूसही नाही. संध्या यांचा विवाह पुढे मुंबईच्या विवेक देवस्थळे यांच्याशी झाला. पुढे पतीची बदली केनियामध्ये झाली. तेथील वास्तव्याची पाच वर्षे त्या स्वस्थ बसल्या नाहीत. तिथे एका एका महिलेला १५-१५ मुले. कारण, संततीनियोजन किंवा गर्भपात या इसाई देशात धर्माच्या नावाने अवैध होते. संध्या यांनी पाच वर्षांत तेथील शेकडो कुटुंबांना संततीनियमनाचे महत्त्व पटवून दिले. परक्या देशात, परक्या संस्कृतीमध्ये हे त्यांनी का आणि कसे केले? यावर त्या म्हणाल्या, “माझे वडील स्वातंत्र्यसेनानी. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये बालविधवेशी लग्न केले आणि निभावले. आई आणि वडील दोघेही आम्हाला सांगत, ”तुमची जात आणि धर्म मानवता आहे.” अगदी सरकारी कागदावरही ते जात लिहीत नसत.”

 

असो. या भडसावळे दाम्पत्याला दोन मुले व एक मुलगी संध्या. ही तीनही मुले कोतवालवाडी ट्रस्टच्या वसतिगृहातच शिकत. वसतिगृहाचे शौचालय साफ करण्याचे काम भडसावळेच्या अपत्यांनीच करावे, ही ट्रस्टच्या प्रमुखांची म्हणजे हरीभाऊ भडसावळेंची शिस्त. संध्या सांगतात,“आपण आर्थिकदृष्ट्या गरीब आहोत, हे त्याकाळी कळणे शक्यच नव्हते. कारण, आजूबाजूला सगळे वनवासी, वंचित जीव. पण एक दिवस गरिबीची जाणीव झाली. आई कोतवालवाडी ट्रस्टमध्ये शिक्षिका. आम्हा विद्यार्थ्यांना घेऊन ती विक्रम बोट बघायला गेली. बोट उन्हात प्रचंड तापलेली. तिच्यावर पाय ठेवणेही अशक्य. मी तर अनवाणी. आईच्या पायात साध्या स्वस्तातल्या चपला नावाला. तिने एक चप्पल काढून माझ्यापुढे ठेवली. त्या बोटीवर मी एका चपलेवर आणि आई एका चपलेवर उभे राहिलो. आईने दुसरीही चपल देऊ केली होती. तिच्या डोळ्यात पाणी होते. त्याक्षणी मला आर्थिक समस्येची, वंचितपणाची जाणीव झाली. तिच जाणीव आज मला प्रत्येक गरजू, वंचित व्यक्तीच्या मदतीला प्रेरित करते.”

 

कोतवालवाडी ट्रस्टच्या विश्वस्त, महिला विकास केंद्राच्या प्रमुख या नात्याने संध्या यांच्या कार्यातून त्यांची तळमळ सातत्याने अधोरेखित होते. गरजू, वंचितांच्या आयुष्यामध्ये स्थैर्याचा प्रकाश यावा म्हणून संध्या नावाची ही ज्योत अखंड तेवत आहे. त्या दिव्य माणूसपणाला सलाम...!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/