मुठाई माऊली माझी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Feb-2019   
Total Views |


 

 

आंबील ओढा आणि नागझरी ओढा हे मुठेच्या उजव्या बाजूने, म्हणजेच आग्नेयेकडून मुठेला येऊन मिळणारे दोन समांतर प्रवाह आहेत, ज्यांच्या अवतीभवती प्राचीन काळापासून मानवी वस्ती आणि संस्कृती स्थापन होत गेली.


डॉ. माधव गाडगीळ नेहमी एक गंमतीशीर प्रसंग सांगतात - “माझा एक पुण्यातच राहणारा जर्मन पत्रकार मित्र आहे. तो लहानपणी जर्मनीत असताना ऱ्हाईन नदीत पोहायचा. त्यानंतर ऱ्हाईन नदी प्रचंड प्रदूषित झाली. अलीकडे काही लोकांच्या प्रयत्नाने ती पुन्हा स्वच्छ करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा हा ऱ्हाईन नदीत पोहायला गेला आणि त्याला स्वच्छ झालेल्या नदीत पोहताना हर्षवायू झाला! आम्हीही लहान असताना पुण्याच्या मुळा-मुठा नदीत पोहायचो. मलाही आज तीव्र इच्छा आहे की, कधीतरी या मुळा-मुठेच्या पाण्यात सूर मारावा आणि आपल्यालाही हर्षवायू व्हावा.” मुळा आणि मुठा या पुण्याच्या जीवनदायिनी असणाऱ्या नद्या आहेत. भारतात प्राचीन काळापासून ज्याप्रमाणे नद्यांच्या किनारी नगरं वसवली गेली, त्याप्रमाणे या मुळा-मुठेच्या काठी पुणं शहर वसलं. मुळा आणि मुठा या मूलत: वेगळ्या नद्या आहेत. परंतु, संगमानंतर पुढे ही नदी 'मुळा-मुठा' म्हणून ओळखली जाते. मुळा आणि मुठा या भीमा नदी खोऱ्याचा भाग आहेत. मुठा नदी ही नैऋत्य-ईशान्य वाहते. बाबासाहेब पुरंदरेंनी तिचं वर्णन 'नैऋत्येकडून नागिणीसारखी सळसळत येणारी मुठा' असं केलं आहे. पुण्यापासून सुमारे ३५-४० किलोमीटर अंतरावर 'वेगरे' नामक एक गाव आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून साधारणत: तीन हजार फूट उंचीवर येतं. तिथे 'वेगऱ्याचा महादेव' नामक एक शिवमंदिर आहे. इथे मुठा नदीचं उगमस्थान आहे, असं मानलं जातं. या वेगरे गावाच्या थोड्याशा खालच्या भागात टेमघर आणि मुठे ही दोन गावं आहेत. काही जणांच्या मते, टेमघर गावातील कोंडजाईच्या मंदिराजवळील एका डोंगरातून मुठा नदीचा उगम होतो. वास्तविक नदी ही शेकडो छोट्या-छोट्या प्रवाहांची मिळून बनलेली असते. त्यामुळे 'ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ शोधू नये' असं म्हणतात तेच खरं. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातून वाहत वाहत मुठा नदी पुणे शहरात येते.

 

शहरात प्रवेशण्यापूर्वी टेमघर आणि खडकवासला ही दोन भलीमोठी धरणं मुठा नदी पार करते. मुंबईची लोकल जशी शहराचे 'ईस्ट' आणि 'वेस्ट' असे दोन भाग करते, तशीच पुण्याची मुठा नदी शहराचे दोन भाग करते. अंबी आणि मोशी या मुठेच्या उपनद्या. खडकवासला धरणाच्या अगोदर या नद्या मुठेला मिळतात. आंबील ओढा आणि नागझरी ओढा हे मुठेच्या उजव्या बाजूने, म्हणजेच आग्नेयेकडून मुठेला येऊन मिळणारे दोन समांतर प्रवाह आहेत, ज्यांच्या अवतीभवती प्राचीन काळापासून मानवी वस्ती आणि संस्कृती स्थापन होत गेली. आज हे ओढे त्यांच्या मूळ स्वरूपात राहिलेले नाहीत. मुळा नदी बोरघाटाच्या दक्षिणेस १५-२० किमी अंतरावर उगम पावते आणि पश्चिम-पूर्व वाहत येते. पुण्याच्या उत्तरेकडच्या 'कळस' या गावाशी मुळा नदी दक्षिणवाहिनी होते आणि पुणे शहरात येते. राम नदी, पवना नदी आणि देव नदी या मुळा नदीच्या उपनद्या होत. मुळा आणि मुठा नद्या पुण्यात शिवाजीनगरच्या जवळ असलेल्या 'कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग'पाशी एकत्र मिळतात. पुढे ही नदी मुळा-मुठा म्हणून ओळखली जाते. मुळा-मुठा नदी पूर्वेकडे वाहत जाऊन शिरूर तालुक्यात भीमा नदीला मिळते. सह्याद्री पर्वतातल्या भीमाशंकर या सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्री भीमा नदी उगम पावून पश्चिम-पूर्व वाहत येते. कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांच्या सीमा भागात भीमा नदी कृष्णा नदीला मिळते आणि कृष्णामाई शेवटी बंगालच्या उपसागराला मिळते. नद्यांवर बांधलेली धरणं, आजूबाजूला झालेलं शहरीकरण, यामुळे या सर्व जलप्रवाहांचं नैसर्गिक स्वरूप खूप बदललं आहे.

 

मुळा-मुठा नद्यांमध्ये पोहणं तर खूपच दूर राहिलं, पण साधं त्यांच्या जवळपाससुद्धा जाता येत नाही, अशी आज या नद्यांची अवस्था झाली आहे. स्वत:ला स्वच्छ ठेवण्यासाठी परिसर घाण करण्याच्या माणसाच्या सवयीला भारतातल्या सगळ्याच नद्या बळी पडल्या आहेत. मुळा-मुठा नद्याही त्याला अपवाद नाहीत. समस्त पुणेकरांचं साबणयुक्त आंघोळपाणी आणि समस्त पुणेकरांचं डिटर्जंटयुक्त धुवणपाणी ही एकटी मुठाई बिनतक्रार झेलते. भरीस भर म्हणून प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, निर्माल्य, रबरी व थर्माकोलच्या टाकाऊ वस्तू हा सगळा कचरा आहेच. एकेकाळी पुण्याची जीवनवाहिनी असणारी मुठा आज 'सांडपाणीवाहिनी' झाली आहे. 'नदी ही कचरा टाकण्यासाठीच असते' अशा आविर्भावात आपण चाललो आहोत. पुण्यात नदीकिनाऱ्यावर जाऊन कुठेही दोन मिनिटे उभे राहिले की घाण वास येतो. हा वास मुठेत बेमालूम सोडलेल्या सांडपाण्याचा असतो. मुठा नदीवर बांधलेल्या कुठल्याही पुलावरून खाली पाहिलं की, काळीकुट्ट मुठा दिसते. बारकाईने निरीक्षण केलं, तर नदीतून बारीक बारीक बुडबुडे येताना दिसतात. हे बुडबुडे मिथेन वायूचे असतात. पुणे शहराचा मानवी मैला संडासातून थेट मुठाईच्या पाण्यात येतो, तिथेच तो कुजतो आणि त्यातून तयार होणारा मिथेन वायू बुडबुड्यांमधून हवेत सोडला जातो. एवढंच नव्हे, तर नदीच्या जवळ जाऊन बघितलं, तर काळे काळे गोळे तळातून वर येताना दिसतात. हा असतो कुजलेला मानवी मैला! ही अतिशयोक्ती नाही. कोणीही कधीही नदीकाठी जाऊन पाहावं, हे प्रत्यक्ष दिसेल. दोन्ही किनारी प्लास्टिक, निर्माल्याचा खच दिसतो.

 

प्रदूषणाची निदर्शक असणारी एरंडाची झाडं फोफावलेली दिसतात. प्रदूषित पाण्यावर बेसुमार फोफावणारी 'जलपर्णी' (Water Hyasynth) ही वनस्पती विशेषतः मुळा नदीत अतिप्रचंड वाढलेली दिसते. सध्या कोल्हापूरला केआयटी कॉलेजमध्ये पर्यावरणीय अभियांत्रिकी (Environmental Engineering) शिकणारा पुण्यातलाच माझा एक मित्र ओंकार गानू हा मुठा नदीचा 'डीओ' (DO = Dissolved Oxygen) किती आहे, याची नियमित चाचणी करण्याचं काम करतो. 'डीओ' म्हणजे पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचं प्रमाण. पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन किती आहे, यावर त्या पाण्याची शुद्धता ठरते. सर्वसाधारणपणे शुद्ध पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनची मात्रा ८ पीपीएम (PPM²= Parts per Million) एवढी असते. मुठा नदीच्या पाण्यातलं विरघळलेल्या ऑक्सिजनचं प्रमाण सध्या ० ते १ पीपीएम यादरम्यान आहे. म्हणजेच ही नदी जवळजवळ मृत झालेली आहे. यावरून जलप्रदूषणाच्या भीषणतेची कल्पना येईल! एकेकाळी मुठाई अशी नव्हती! आणि अजून काही वर्षानंतरही ती तशी नसेल! ती पुन्हा पूर्वीसारखीच स्वच्छ, सुंदर, खळखळाट करणारी, आजूबाजूला राहणाऱ्यांना, जाणाऱ्या-येणाऱ्यांना आनंद देणारी असेल... कशी? पाहू पुढच्या भागात!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@